Aurangabad Gram Panchayat : तीन ग्रामपंचायतींच्या निवडणुका स्थगित | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Grampanchayat

Aurangabad Gram Panchayat : तीन ग्रामपंचायतींच्या निवडणुका स्थगित

शेंदूरवादा : चुकीच्या प्रभाग रचनेमुळे तालुक्यातील तीन ग्रामपंचायतीच्या निवडणूका स्थगित केल्याचे पत्र राज्य निवडणूक आयोगाने नुकतेच काढल्यामुळे गंगापूर तालुक्यातील गुरु धानोरा, आंबेगाव, वजनापूर या तीन ग्रामपंचायतीच्या निवडणुका लांबल्या आहे.

ऐन हिवाळ्यात तापलेले राजकारणाचे वातावरण काही दिवस शांत झाले असून भावी उमेदवारांना मात्र पॅनल प्रमुख व मतदारांची मनधरणी चालूच ठेवावी लागणार आहे. या घटनेने तहसील मधील बेजबाबदार कारभार उघड झाला असून चोर सोडून संन्याशाला फाशी देण्याचा असला प्रकार अखेर थांबणार तरी कधी?असा प्रश्न उमेदवारांसह ग्रामस्थांनी केला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतीच्या निवडणूका घेण्याचे निवडणूक आयोगाने जाहीर केले. त्यात गंगापूर तालुक्यातील ३५ ग्राम पंचायती मध्ये गुरूधानोरा,आंबेगाव, वजनापूर या तीन ग्रामपंचायतीचाही समावेश होता. निवडणुका घोषित झाल्याने तीनही गावातील पुढाऱ्यांनी निवडणूक रिंगणात उतरण्याची जय्यत तयारी सुरू केली होती. तर अनेकांना सरपंच व सदस्य पदाचे डोहाळे लागले होते. काही गुडघ्याला बाशिंग बांधून तयारीत असतानाच राज्य निवडणूक आयोगाचे उपसचिव के.सुर्यकृष्णमुर्ती यांनी व जिल्हाधिकाऱ्यांना एक पत्र पाठविले आहे.

त्यात संबंधित गंगापूर तहसीलदारांच्या अहवालानुसार संगणकप्रणालीमध्ये नजरचुकीमुळे गुरूधानोरा, आंबेगावसह वजनापूर येथील प्रभाग रचना व अंतिम नमुना-३ मध्ये त्रुटी असल्याचे दाखविण्यात आले आहे. चुकीचे आरक्षण दर्शवून प्रभाग रचना का केली? याविषयीचा संबंधित अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांना खुलासाही मागविण्यात आला आहे. या प्रकरणात कुणावर काही कार्यवाही होते का? आरक्षण व प्रभाग रचनेत कोणते बदल होतील. पुढील निवडणुका कधी याकडे तमाम ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.