Sandipanrao Bhumre : चंद्रकांत खैरे म्हणजे, संपलेला विषय! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Sandipan Bhumre

Sandipanrao Bhumre : चंद्रकांत खैरे म्हणजे, संपलेला विषय!

औरंगाबाद : शिवसेना नेते चंद्रकांत खैरे म्हणजे संपलेला विषय आहे. पुन्हा पुन्हा तेच आरोप आणि त्याच प्रतिक्रिया याला नागरिक कंटाळले आहेत. आता विकासावर चर्चा झाली पाहिजे, आम्हाला काहीही म्हणा, फरक पडत नाही. खैरे यांनी आम्ही जो विकास करतो आहे तो फक्त पाहावा, असा टोला पालकमंत्री संदीपान भुमरे यांनी शुक्रवारी (ता. सात) लगावला.

पालकमंत्री भुमरे यांनी शुक्रवारी स्मार्ट सिटी कार्यालयात महापालिकेसंदर्भातील विकासकामांचा आढावा घेतला. त्यावेळी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्‍नांवर ते पुढे म्हणाले, की खैरे हा विषय आता आमच्यासाठी संपला आहे. त्यांचे नाव काढणे सुद्धा उचित वाटत नाही. तीस वर्षे लोकांनी खैरेंना निवडून दिले; पण त्यांनी शहराचे वाटोळे केले. आता मी वॉर्डावॉर्डांत जाऊन तेथील समस्या सोडविण्यास सुरवात केली आहे. नागरिकांचा त्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे. पण त्यांच्यासमोर विकासाचा अजेंडाच नाही. त्यामुळे आम्हाला टार्गेट करून ते बोलत राहतात, असे भुमरे म्हणाले.

दसरा मेळाव्यासंदर्भात विचारलेल्या प्रश्‍नावर भुमरे म्हणाले, की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विचार ऐकण्यासाठी शेकडो किलोमीटरचे अंतर पार करून लोक आले होते. सात-आठ तास बसल्यानंतर थोडीफार हालचाल होतेच. त्याला लोक निघून जाणे असे म्हणता येत नाही. दसरा मेळावा ऐतिहासिक झाला. त्यामुळे अनेकांचे डोळे पांढरे झाले. शिवाजी पार्कपेक्षा दुप्पट क्षमता बीकेसी मैदानाची आहे. शेवटच्या माणसाला व्यासपीठ दिसत नव्हते एवढी गर्दी या ठिकाणी होती, असा दावा भुमरे यांनी केला.

एकनाथ शिंदेच आमचे पक्षप्रमुख

शिवसेना आमची असल्याचा दावा एकनाथ शिंदे यांच्याकडून केला जात आहे, त्यावर श्री. भुमरे म्हणाले, खरी शिवसेना आमचीच आहे आणि एकनाथ शिंदेच आमचे प्रमुख आहेत. त्यांच्याच नेतृत्वाखाली आमचे काम सुरू आहे. त्यामुळे ते आमच्यासाठी पक्षप्रमुखच आहेत.