Aurangabad : छळ केल्याने सहजामीनदाराची आत्महत्या | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

crime news

Aurangabad : छळ केल्याने सहजामीनदाराची आत्महत्या

औरंगाबाद : मूळ कर्जदारावर रिक्षा जप्‍तीसह कोणतीही कारवाई न करता सहजामीनदार रिक्षाचालकाला कर्ज भरण्याच्या नोटीसा पाठवून तसेच त्यांच्या घरी जाऊन वारंवार छळ केला. याला कंटाळून रिक्षाचालकाने गळफास घेतला. या प्रकरणात पोलिसांनी तब्बल वर्षभरानंतर छळ करणाऱ्या दोघा आरोपींना रविवारी सायंकाळी बेड्या ठोकल्या. जावदे साबेर कुरेशी (३३, रा. सिल्लेखाना, पैठणगेट) आणि अंकुश रामराव कांबळे (४२, रा. चौधरी कॉलनी, दत्तनगर, चिकलठाणा) अशी त्या दोघा आरोपींची नावे आहेत. तर संतोष कडूबा पावसे (३२, रा. रामनगर) असे मृत रिक्षाचालकाचे नाव आहे.

याप्रकरणी मृत पावसेंच्या पत्‍नी कोमल पावसे (२७, रा. रामनगर) यांनी दिलेल्या फिर्यादी‍यानुसार पावसे यांनी परमीटधारक शेख इम्रान याच्या नावावर बजाज फायनान्समधून कर्ज घेऊन दोन वर्षांपूर्वी एलपीजी रिक्षा (क्र. एमएच-२०-ईके-००५७) खरेदी केला होता. तेव्हा अंकुश कांबळे हा एजंट होता. लॉकडाऊनमुळे व्यवसाय न झाल्याने हफ्ते थकले. त्यात तगादा सुरु झाल्यामुळे शेख इम्रानने ही रिक्षा जावेद कुरेशीला विकली. तसेच हफ्ते जावेद कुरेशीने भरण्याबाबत करारनामा करण्यात आला.

मात्र, जावेदनेही हफ्ते भरले नाहीत. त्यावर संतोष यांना फायनान्सच्या नोटीस येऊ लागल्या. मुळात नोटीस या शेख इम्रानला यायला हव्या होत्या. नोटीस आल्यावर आणि फायनान्सचे एजंट घरी आल्यावर ते करारनामा दाखवित होते. मात्र, त्यांनी संतोषलाच छळले. त्यामुळेच संतोषने २५ सप्टेंबरला राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. प्रकरणात मुकुंदवाडी पोलीस ठाण्‍यात आत्‍महत्‍येस प्रवृत्त केल्याप्रकरणी शेख इम्रान शेख अब्दुल माजिद (रा. दादा कॉलनी, कैलासनगर) आणि जावेद साबेर, अंकुश कांबळे तसेच बजाज फायनान्‍सचा वकील अनंत लऊळकर (रा. एरंडवणे, ता. पुणे) यांच्‍याविरोधात गुन्‍हा दाखल करण्‍यात आला होता.

गुरुवारपर्यंत पोलिस कोठडी

पोलिसांनी वरील दोघा आरोपींना अटक करुन सोमवारी न्यायालयात हजर केले असता, सहायक सरकारी वकील भागवत काकडे यांनी आरोपींकडून गुन्‍ह्यातील रिक्षा हस्‍तगत करायची आहे. गुन्‍ह्यात मृताला घरी जावून वारंवार शिवीगाळ करुन दमदाटी करणारा बजाज फायनान्‍सचा कोणता कर्मचारी होता, याचा तपास करायचा आहे. अंकुश कांबळे हा बजाज फायनान्‍स कंपनीचा एजन्‍ट असून त्‍याने अशा प्रकारे आणखी किती गुन्‍हे केले आहेत याचा देखील तपास बाकी असल्याने आरोपींना पोलीस कोठडी देण्‍याची विनंती न्‍यायालयाकडे केली असता आरोपींना २९ सप्‍टेंबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्‍याचे आदेश प्रथम वर्ग न्‍यायदंडाधिकारी एस.एम. बोहरा यांनी दिले.