Aurangabad : कोट्यवधींची कापूस बाजारपेठ यंदा ठप्प | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Cotton Loss

Aurangabad : कोट्यवधींची कापूस बाजारपेठ यंदा ठप्प

वैजापूर : पांढऱ्या सोन्याचा माहेरघर म्हणून प्रसिद्ध असलेल्या बाजारपेठेवर यंदा मंदीचे सावट पसरले आहे. तालुक्यात दरवर्षी दसरा आणि दिवाळीच्या मुहूर्तावर कापसाच्या बाजार पेठेत कोटीच्या घरात उलाढाल असायची. यंदा मात्र, परतीच्या पावसाने पीक वाया गेल्याने बाजारपेठेत अजूनही पांढऱ्या सोन्याची आवक म्हणावी तशी सुरु न झाल्याने बाजारपेठेत सर्वत्र शुकशुकाट आहे.

तालुक्यात यंदा परतीच्या पावसाने खरीप हंगामातील कपाशी पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. येथील कापसाच्या खासगी बाजारपेठेत नवरात्रीच्या मुहूर्तावर कापूस खरेदी मुहूर्त साधणाऱ्या या बाजारपेठेत दसऱ्यापासून कापसाची आवक जोरदार असायची आणि ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात खरेदीला सुगीचे दिवस असायचे.

दररोज हजार ते दीड हजार क्विंटलपर्यंत कापसाची खरेदी व्हायची. यंदा परतीच्या पावसाने अशी मार दिली की कापसाचे बोंडदेखील नवरात्रोत्सव काळात शेतकऱ्यांच्या घरात आले नाही. त्यामुळे एकाही व्यापाऱ्याने नवरात्रोत्सवाचा मुहूर्त साधला साधला नाही.

यानंतर दिवाळीच्या काळात येथील व्यापाऱ्यांनी तुरळक प्रमाणात येणाऱ्या कापसावर खरेदी सुरू केली. कापसाची आवक पाहता व्यापाऱ्यांचा दैनंदिन खर्चही निघत नाही. दिवसभरात संपूर्ण शहरात फक्त २५ ते ३० क्विंटलची आवक आहे, तर तालुक्यात ही आवक १०० ते १५० क्विंटलच्या घरात आहे.

एकंदरीतच परतीच्या पावसाने कापसाचे उत्पन्न मोठ्या प्रमाणात घटविल्याने येथील बाजारपेठेच्या इतिहासात प्रथमच एवढी मंदी आली असल्याचे चित्र आहे. शेतकरी उत्पादनाअभावी हवालदिल झाले आहे तर कापसाच्या बाजारपेठेतील पूर्ण अर्थ चक्र कोलमडले आहे. मजुरांच्या हाताला काम नाही. दुसरीकडे तालुक्यात गेल्या दोन वर्षांपासून शासकीय कापूस खरेदीला मुहूर्त निघालेला नाही. त्यामुळे येथील शेतकरी खासगी बाजार पेठेवरच अवलंबून आहे. यंदा कापूस ओला येत असल्याने ७१०० ते ७२०० रुपये क्विंटलचे दराने कापसाला बाजारात दर मिळत आहे.

पांढऱ्या कापसाचे काळे वास्तव

एकवेळ होती की कापसाची वेचणी करून घरी आणल्‍यानंतर त्‍यावर पाणी मारून घरात ठेवले जायचे. जेणेकरून कापसाचे वजन जास्‍त भरेल आणि फायदा होईल.

व्यापारी देखील कापूस खरेदी करताना वाहनात पाणी मारून भरत असे. पण आता परिस्‍थिती उलटी झाली असून, अतिपावसामुळे वेचणीवर आलेला कापूस ओला होत आहे. हा कापूस उन्हात टाकून सुकविल्यानंतरच शेतकरी व व्यापाऱ्यांना विक्री करावे लागत असल्याचे चित्र आहे.

यंदा परतीच्या पावसामुळे कापसाच्या उत्पन्नावर ५० टक्के फरक पडणार आहे. त्यात ओला कापूस बाजारात येत असल्याने कापसाचे बाजार ७००० ते ७२०० वर लॉक झाले आहे. तसेच गुजरात मध्ये अजूनही कापसाची खरेदी सुरु झालेली नाही व जिनिंग सुरु झालेले नसल्याने बाजार थंडावलेले आहे.

- भागवत घोडेकर (कापसाचे व्यापारी)