Aurangabad : घर सुरक्षित पण माता अ‘सुरक्षित’च | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

mother

Aurangabad : घर सुरक्षित पण माता अ‘सुरक्षित’च

औरंगाबाद : कुटुंबाचा आधार असलेली महिला इतरांची काळजी घेताना स्वतःच्या आरोग्याकडे मात्र दुर्लक्ष करते. त्यामुळे राज्य शासनातर्फे ‘माता सुरक्षित तर घर सुरक्षित’ अभियान राबविले जात आहे. नवरात्रापासून सुरू झालेल्या या अभियानात शहरात आत्तापर्यंत १८ वर्षावरील सुमारे सव्वादोन लाख महिलांची आरोग्य तपासणी करण्यात आली. त्यातून अनेक महिलांचे विविध आजार समोर आले आहेत. यात १२०० धोकादायक आजाराच्या महिलांची नोंद झाली आहे.

कुटुंबातील स्त्री म्हणजे ती आई असेल किंवा पत्नी, बहिण, आजी. प्रत्येक महिला कुटुंबासाठी अहोरात्र कष्ट घेते. दिवसभराची ठरलेली कामे उरकताना तिची दमछाक होते व आरोग्यकडे दुर्लक्ष होते. अनेकवेळा आजाराने गंभीर स्वरूप घेतल्यानंतर लक्षणे समोर येतात. त्यामुळे प्रत्येक घरातील महिला सुरक्षित असेल तर घर सुरक्षीत असेल या हेतूने राज्य शासनाने ‘माता सुरक्षित तर घर सुरक्षित’ अभियान सुरू केले आहे. शहरात या अभियानाला चांगला प्रतिसाद मिळत आहे.

महापालिकेच्या आरोग्य विभागातर्फे १५ नोव्हेंबरपर्यंत हा उपक्रम राबविण्यात येत असून, आत्तापर्यंत सुमारे सव्वा दोन लाख महिलांची आरोग्य तपासणी करण्यात आली आहे. त्यात बीएमआय, रक्तदाब, मधुमेह, एचबी, रक्तगट, टीडी यासह इतर तपासण्यांचा समावेश आहे.

तपासणीतून आजार समोर आलेल्या महिलांना पुढील उपचार दिले जात असल्याचे महापालिकेचे आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. पासर मंडलेचा यांनी सांगितले. या अभियानात हायरिस्क महिलांच्या देखील नोंदी केल्या जात आहेत. त्यात आत्तापर्यंत १२०० महिलांची नोंद झाली असल्याचे नोडल अधिकारी डॉ. सुमय्या सईदा यांनी सांगितले.

चाचण्यांसाठी खासगीत हजारो रुपयांचा खर्च

या अभियानात मोफत तपासणी केली जात आहे. ज्या चाचण्यांसाठी खासगी रुग्णालयात हजारो रुपये लागतात. स्तनाचा कॅन्सर ओळखण्यासाठी आवश्‍यक असलेली मॅमोग्राफीची १८८ महिलांची तपासणी करण्यात आली. पॅप स्मिअरच्या ५६ महिलांची तपासणी करण्यात आली. या तपासणीसाठी खासगी दवाखान्यामध्ये दीड हजारांचा खर्च येऊ शकतो. गर्भाशय मुखाचा कर्करोग निदान करण्यासाठी पॅप स्मिअर ही तपासणी आहे. त्यासाठी ७०० पर्यंत खर्च येऊ शकतो. ही तपासणी मोफत करण्यात येत आहे. रक्ततपासणीसाठी २००० पर्यंत खर्च येऊ शकतो. ही तपासणीही मोफत होत आहे. आजपर्यंत इतर लॅब तपासण्या एकूण १३,८१८ रुग्णांची तपासणी करण्यात आली आहे. आजपर्यंत एकूण ५०२ मातांची सोनोग्राफी व २२८ चेस्ट एक्सरे ची तपासणी करण्यात आली आहे.

आत्तापर्यंत तपासण्या झालेल्यांची संख्या

उंची व बीएमआय १,८३,८४९

रक्तदाब १,६१,२३५

मधुमेह १२,७६८

एच.बी ३१,७९२

रक्तगट ९,५०३

टीडी ६,८०२

दंतरोग तपासणी १,०८४

रक्त तपासणी २१,४०१