Aurangabad: पत्नीस जाळणाऱ्या पतीस जन्मठेप | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पोलिस कोठडी

वैजापूर : पत्नीस जाळणाऱ्या पतीस जन्मठेप

वैजापूर : चरित्र्यावर संशय घेऊन पत्नीस रॉकेल टाकून जिवंत जाळणाऱ्या पतीस वैजापूर येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाने जन्मठेप व दहा हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. दंड न भरल्यास सहा महिने साधी कैद तसेच शारीरिक छळ केल्याच्या आरोपाखाली तीन वर्ष सक्तमजुरी व दोन हजार रुपये दंड, दंड न भरल्यास एक महिना साधी शिक्षा असे आदेशही न्यायालयाने दिले आहेत.

प्रभाकर गंगाधर लोखंडे (वय ५०, रा. रांजणगाव शेणपूंजी ता.गंगापूर) असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे. १७ मे २०१७ रोजी ही घटना घडली होती. अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश एम मोईउद्दिन एम ए. यांनी बुधवारी (ता. १०) हा निकाल जाहीर केला. आरोपी प्रभाकर लोखंडे रांजणगाव शेणपूंजी येथे पत्नी संगीता व राहुल, शुभम या मुलांसह राहत होता. तो कंपनीत काम करत होता तर पत्नी संगीता ही घरकाम करत होती. काही दिवस कंपनीत काम केल्यानंतर प्रभाकरन काम सोडले व तो दारूच्या आहारी गेला.

हेही वाचा: एक कॅच सुटला अन् पाकिस्तानचं झालं T20 वर्ल्ड कपमधून 'पॅक-अप'

१७ मे २०१७ रोजी संगीताने कार्यक्रमाला बाहेर जाण्यासाठी ५०० रुपये मागितले. त्यावर प्रभाकरन तू माझे दहा हजार रुपये चोरले असे म्हणत चारित्र्यावर संशय घेत पत्नीला मारहाण केली. यानंतर रॉकेल टाकून पेटवून दिले. मुलगा राहुल याने पाणी टाकून आग अटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला व आईला सरकारी दवाखान्यात दाखल केले.

सहायक पोलिस उपनिरीक्षक एकनाथ वारे, (वाळूज पोलिस स्टेशन) यांनी दुसऱ्या दिवशी संगीताचा जवाब नोंदवला. दुसरा मृत्युपूर्व जवाब विशेष न्यायदंडाधिकारी मुनिरोड्डिन शेख खाजा यांनी नोंदवला. याप्रकरणी तपास करून पोलिसांनी न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले.

याप्रकरणाची सुनावणी झाली असता सरकारी वकील नानासाहेब जगताप यांनी सहायक पोलिस उपनिरीक्षक एकनाथ वारे, मुनिरोड्डीन शेख खाजा, शुभम लोखंडे, संगीताचे वडील बाजीराव काटकर, तपास अमलदार व्ही. एम. राजपूत, सुशीलकुमार जमधडे यांच्यासह आठ जणांच्या साक्ष तपासली. गुन्हा सिद्ध झाल्याने न्यायालयाने आरोपीस जन्मठेप व दहा हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली. या प्रकरणात वाळूज ठाण्याचे विठ्ठलसिंह राजपूत यांनी सहकार्य केले.

loading image
go to top