esakal | AURIC: ‘ऑरिक’मध्ये लघु उद्योजकांचीही ‘एंट्री’
sakal

बोलून बातमी शोधा

Aurangabad Industrial City

AURIC: ‘ऑरिक’मध्ये लघु उद्योजकांचीही ‘एंट्री’

sakal_logo
By
प्रकाश बनकर

औरंगाबाद: मोठ्या उद्योगांबरोबरच औरंगाबाद इंडस्ट्रीयल सिटीत (ऑरिक सिटी) सूक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योजकांनीही (एमएसएमई) आता एंट्री केली आहे. ऑरिक सिटीत मोठ्या कंपन्याबरोबर स्थानिक गुंतवणूक वाढत आहे. यात २२ लघु, मध्यम उद्योजकांनी ऑरिकमध्ये जागा घेतली आहे. नुकतीच एमएसएमईच्या या बावीस उद्योजकांना भूखंडांचे वाटप करण्यात आले आहे, अशी महिती ‘ऑरिक’चे व्यवस्थापकीय संचालक जितेंद्र काकुस्ते यांनी शुक्रवारी (ता.९) दिली. वाळूज एमआयडीसीत भाडेतत्त्वावर जाग घेऊन त्यावर युनिट चालविणाऱ्या काही उद्योजकांचा यात समावेश आहे. लवकरच ते ‘ऑरिक’मध्ये मिळालेल्या भूखंडांवर युनिट सुरु करणार असल्याचेही श्री. काकुस्ते यांनी सांगितले.

दरम्यान, यातून स्थानिक, स्वदेशी आणि विदेशी उद्योगांची सांगड घालत ‘आरिक सिटी’ला जागतिक टच देण्याचा प्रयत्न यातून होत आहे. ‘ऑरिक सिटी’त आंतरराष्ट्रीय दर्जाच्या पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. यामुळे बड्या कंपन्या गुंतवणुकीसाठी चाचपणी करीत आहेत. रेकिट बेन्कीझर ग्रूप (आरबी ग्रुप) या डेटॉलचे उत्पादन करणाऱ्या कंपनीसह रशियन स्टीलची ‘एनएलएमके’ या कंपन्यांना ‘ऑरिक’मध्ये जागा मिळाली आहे. यातच एमएसएमईच्या उद्योजकांची एंट्री सर्वांसाठी उपयोगाची ठरणार आहे. छोट्या उद्योजकांनाही जागा देण्याची मागणी सातत्याने होती. आता ती मागणी पूर्ण होत प्रत्यक्षात २२ सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योजकांना भूखंड मिळाले आहेत. विशेष म्हणजे, हे सर्व उद्योजक स्थानिक आहेत.

हेही वाचा: परभणी जिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांसह परिचारिकांवर गुन्हा दाखल

ऑटोपार्ट मॅन्युफॅक्चरिंग, प्लास्टिक उत्पादक यासह वाळूज एमआयडीसीत भाडे तत्त्वावर युनिट चालविणाऱ्या उद्योजकांचा यात समावेश आहे. शेंद्रा एमआयडीसीतील मोठ्या उद्योजकांचे काही जण वेंडर आहेत. या उद्योजक लवकरच युनिट सुरु करण्याविषयी हालचाली सुरू केल्या आहेत, असेही श्री. काकुस्ते यांनी सांगितले. शिवाय पुनर्वसनातील प्लॉटबाबत लवकरच निर्णय घेण्यात येणार असल्याचे त्यांनी नमूद केले.

loading image