esakal | परभणी जिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांसह परिचारिकांवर गुन्हा दाखल
sakal

बोलून बातमी शोधा

crime

परभणी जिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांसह परिचारिकांवर गुन्हा दाखल

sakal_logo
By
गणेश पांडे

परभणी: प्रसुती झालेल्या महिलेच्या प्रकृत्तीकडे डॉक्टरांसह परिचारिकांनी दुर्लक्ष केल्याने सदर महिलेचा मृत्यु झाल्याची घटना दोन वर्षापूर्वी जिल्हा रुग्णालयात घडली होती. या प्रकरणी चौकशी समितीच्या अहवालात ही या डॉक्टरांसह परिचारिकांवर ठपका ठेवण्यात आला आहे. या प्रकरणी शुक्रवारी, ता. नऊ जुलै रोजी येथील नानलपेठ पोलिस ठाण्यात मयत महिलेच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

परभणी जिल्हा शासकीय रुग्णालयातील प्रसुती विभागात ता. २४ एप्रिल २०१९ रोजी काजल नितीन धापसे (वय १९) या विवाहितेस प्रसुतीसाठी दाखल करण्यात आले होते. ता. २५ एप्रिल २०१९ रोजी सदर महिलेवर शस्त्रक्रिया करून प्रसुती करण्याचा निर्णय तेथील डॉक्टरांनी घेतला. त्यानंतर सदर महिलेची प्रसुती होऊन तिला बाळाला जन्म दिला. त्याच दिवशी रात्री ९ वाजण्याच्या सुमारास काजल धापसे हिची प्रकृती बिघडली. त्यानंतर तेथे उपस्थित असणाऱ्या परिचारिकेने काजल धापसेला इंजक्शन दिले. रात्री ११ वाजता काजलची प्रकृती अधिकच बिघडली. त्यामुळे तेथील परिचारिकेने डॉक्टरांना फोन करून माहिती दिली. परंतू रात्रपाळीसाठी असणारे डॉक्टर काजल धापसेला तपासण्यासाठी आलेच नाहीत. रात्री दोन ते अडीच वाजण्याच्या दरम्यान डॉक्टर येवून काजल धापसे हिला तपासले असता ती मरण पावल्याचे डॉक्टरांनी नातेवाईकांना सांगितले.

हेही वाचा: नांदेड जिल्ह्यात ८८ टक्के पेरणी; दुबार पेरणीची शक्यता कमीच

या प्रकरणी जिल्हा शल्यचिकित्सकांकडे नातेवाईकांनी तक्रार दाखल केली होती. या तक्रारीची दखल घेवून प्रकरणाची चौकशी करण्यात आली. या प्रकरणी तब्बल दोन वर्षानंतर मयत काजल धापसे हीची आई कविता माणिक झोडपे यांच्या तक्रारीवरून नानलपेठ पोलिस ठाण्यात महिला डॉ. शेळके, अधिपरिचारिका अनुजा नरवाडे, डॉ. दुरेशेवार गुलाम जिलानी (समरीन), डॉ. अरूणा राठोड यांच्या विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

हेही वाचा: उस्मानाबाद-सोलापूर रेल्वेमार्गाचे काम कधी मार्गी लागणार?

चौकशी समितीच्या अहवालात ही ठपका

मयत काजल धापसे हीच्या नातेवाईकांनी मुलीच्या मृत्यु प्रकरणी जिल्हा शल्यचिकित्सकांकडे तक्रार दाखल केली होती. या तक्रारीवरून महिला डॉ.शेळके, अधिपरिचारीका अनुजा नरवाडे, डॉ. दुरेशेवार गुलाम जिलानी (समरीन) व डॉ. अरुणा राठोड यांची चौकशी करण्यासाठी तज्ञ डॉक्टरांची तीन सदस्यीय समिती स्थापन करून चौकशीचे आदेश दिले. या समितीमध्ये डॉ. नरेंद्र वर्मा, डॉ. किशोर सुरवसे व डॉ. संदीप काला यांचा समावेश होता. या समितीनेही त्यांच्या अहवालात प्रसुती कक्षात हजर असणाऱ्या डॉक्टरासह इतर कर्मचाऱ्यांनी योग्य काम केले नाही. कामात हयगय व निष्काळजीपणा केला असे नमुद केले होते.

loading image