औरंगाबाद : जायकवाडीतून सोडले पाणी

१० ते २७ क्रमांकाचे दरवाजे अर्धाफूट उघडले
Jayakwadi Dam Water
Jayakwadi Dam Water
Updated on

पैठण - जायकवाडी प्रकल्पाच्या नाथसागराच्या पाणीसाठ्यात पाणलोट क्षेत्रातून पाण्याची सतत आवक होत आहे. त्यामुळे धरण प्रशासनाने धरणाच्या एकूण २७ दरवाजांपैकी १० ते २७ क्रमांकाचे दरवाजे अर्धाफूट उघडून एकूण ९ हजार ४३२ क्यूसेक पाण्याचा विसर्ग गोदापात्रात सोमवारी सायंकाळपासून सुरू केला. उघडण्यात आलेल्या प्रत्येक दरवाजांतून ५२४ क्यूसेक पाणी सोडण्यात येत आहे. यावेळी जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांच्या हस्ते दरवाजांचे पूजन करण्यात आले. दरम्यान, तालुका प्रशासनाने पाणी सोडल्यामुळे गोदाकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.

धरणातून ऑगस्ट, सप्टेंबर महिन्यात पाणी पातळीत मर्यादेपर्यंत पाण्याची वाढ पाहून पाणी सोडण्यात येते. परंतु, यंदा मात्र जुलै महिन्यातच पाणी पातळीची वाटचाल शंभर टक्क्यांकडे सुरू झाल्यामुळे जुलै महिन्यातच यंदा पाणलोट क्षेत्रात दमदार झालेल्या पावसामुळे पाणी सोडावे लागले आहे. धरणात यंदा पावसाळ्यात जून महिन्यात पाणलोट क्षेत्रात पाऊस न झाल्याने पाणी पातळीत वाढ होऊ शकली नाही. त्यामुळे महिना निरंक पाणी पातळी गेल्याने चिंता वाढली होती. परंतु, जुलै महिना उजाडता पावसाने नाशिक जिल्ह्यातील भागात धुमाकूळ घातला.

परिणामी, या पावसामुळे गोदावरीला पूर आला होता. त्यामुळे या पुराच्या पाण्यासह पाणलोट क्षेत्रात दमदार पाऊस झाला व या भागातील धरणे भरण्यास सुरुवात झाली व या धरणात ही पाणी साठा वाढत गेल्यामुळे नांदुमध्यमेश्वर, भंडारदरा, निळवंडे आदी छोट्या मोठ्या धरणातून पाण्याचा विसर्ग गोदापात्रात सुरू झाला व हे सोडण्यात आलेले पाणी जायकवाडी प्रकल्पाच्या नाथसागराच्या दिशेने झेपावले. त्यामुळे नाथसागर धरणाच्या पाणी पातळीत दिवसेंदिवस लक्षणीय वाढ झाली. पाणीसाठा ९० टक्क्यांपर्यंत पोचला.

त्यामुळे आज गोदापात्रात पाण्याचा विसर्ग धरणाच्या दरवाजाच्या सांडव्याद्वारे धरण प्रशासनाला करावा लागला. यावेळी उपविभागीय अधिकारी डॉ. स्वप्निल मोरे, तहसीलदार दत्तात्रय नीलावाड, उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. विशाल नेहुल, पोलिस निरीक्षक किशोर पवार, लाभत्रेत्र विकास प्राधिकरण अधीक्षक अभियंता सबनीडकर, जायकवाडी पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता प्रशांत जाधव, शाखा अभियंता बी. वाय. अंधारे, तांत्रिक सहायक गणेश खराडकर, आबासाहेब गरुड, अब्दुल बारी गाझी आदींची उपस्थिती होती.

आवक वाढल्यास आणखी दरवाजे उघडणार!

धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पाण्याची आवक सुरू असून, या पाण्याची आवक वाढल्यास धरण प्रशासन धरणाचे आणखी दरवाजे उघडून पाणी सोडणार असल्याचे जायकवाडी पाटबंधारे विभागाच्या सूत्रांनी सांगितले. धरणात येत असलेल्या पाणी पातळीची अचूक नोंद धरण नियंत्रण कक्षातील यंत्रणा घेत आहे. रात्रभरात वाढणाऱ्या पाणी पातळीची नोंद वेळोवेळी घेण्यात येत असल्याचेही सूत्रांनी स्पष्ट केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com