Aurangabad : पैशांच्या वादातून जीपचालकाचा खून | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

crime news

Aurangabad : पैशांच्या वादातून जीपचालकाचा खून

वाळूज : वाळूज येथील नगर-औरंगाबाद महामार्गावरील गरवारे कंपनीसमोरील भागात उभ्या असलेल्या जीपमध्ये शस्त्राने वार करून खून केलेल्या चालकाचा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळून आला. ही घटना उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवून यातील आरोपीच्या अवघ्या चार तासांत मुसक्या आवळल्या. तौफिक रफिक शेख (२२, रा.शाहीर अण्णा भाऊ साठेनगर, वाळूज) असे आरोपीचे नाव आहे. पैशाच्या किरकोळ देवाणघेवाणीतून हा वाद झाल्याचे पोलिसांनी सांगितले.

रांजणगाव शेणपुंजीतील मंगलमूर्ती कॉलनीतील रहिवासी सुधाकर कुंडलिक ससाणे (वय ३५) हे १३ नोव्हेंबरला सकाळी आठला जीपमधून (एमएच २०, ईवाय ५८२७) प्रवासी घेऊन जात असल्याचे सांगून घराबाहेर पडले होते. मात्र, ते सायंकाळी घरी न आल्याने त्यांच्या मोबाइलवर फोन केला. तेव्हा रिंग जात होती, मात्र ते फोन घेत नव्हते. त्यामुळे त्यांच्या नातलगांनी मंगळवारी दुपारपर्यंत त्यांचा शोध घेतला. मात्र, ते न सापडल्याने त्यांचे भाऊ सुभाष कुंडलिक ससाणे यांनी वाळूज एमआयडीसी पोलिस ठाण्यात त्याचदिवशी हरवल्याची तक्रार दिली होती.

यादरम्यान वाळूजच्या गरवारे कंपनीसमोर उभ्या असलेल्या जीपमधून दुर्गंध येत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. तेव्हा पोलिस पथकाने घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली असता जीपच्या आतील सीटवर पोत्याने झाकलेला मृतदेह आढळला. तेव्हा हा मृतदेह सुधाकर ससाणेचाच असल्याचे सुभाष ससाणे यांनी पोलिसांना सांगितले. हा मृतदेह अर्धनग्न अवस्थेत होता, तर डोक्याला शस्त्राने वार केल्याची जखम आढळून आली. हा मृतदेह पूर्णपणे कुजलेल्या अवस्थेत होता. जीपच्या खाली एक मोबाइलही मिळाला होता. यासंदर्भात, चौकशीसाठी सुधाकर ससाणे याचा मोबाइल सायबर पोलिसांकडे देण्यात आला होता. सर्व बाजूने तपास केल्यानंतर पोलिस आरोपीपर्यंत पोचण्यात यशस्वी झाले. पोलिसांनी उत्तरीय तपासणीसाठी मृतदेह घाटी रुग्णालयात पाठवला आहे. याप्रकरणी वाळूज औद्योगिक परिसर पोलिस ठाण्याचे पोलिस हवालदार राम तांदळे यांनी पोलिसात तक्रार दिली. या तक्रारीनंतर वाळूज पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध खुनाच्या गुन्ह्याची नोंद केली आहे. सहायक पोलिस निरीक्षक विनायक शेळके पुढील तपास करीत आहेत.

असा आला आरोपी जाळ्यात

मृत जीपचालक सुधाकर ससाणे हे त्यांची जीप भाडेतत्त्वावर चालवायचे, तर आरोपी तौफिक हा दोन महिन्यांपूर्वी बजाजनगरातील महाराणा प्रताप चौकात वाशिंग सेंटरचे काम करीत होता. जीपचालक ससाणे हे त्याच्याकडे जीप वॉशिंगसाठी घेऊन यायचे. अशा पद्धतीने जीप वॉशिंगचे ससाणे यांच्याकडे दोन हजार रुपये झाले होते. या दरम्यान, तौफिकने वॉशिंगचे काम सोडून तो लगतच्या दुचाकीच्या शोरूममध्ये कामाला लागला. १३ नोव्हेंबरला तौफिकला पाहुण्यांसह काही कामानिमित्त म्हैसमाळला जायचे होते. त्यामुळे त्याने ससाणे यांना शोरूमजवळ जीप घेऊन बोलावले. नंतर म्हैसमाळला जायचे सांगून भाडे विचारले. तेव्हा ससाणे यांनी तीन हजार रुपये भाडे सांगितले. त्यावर तुमच्याकडे माझे दोन हजार रुपये आहेत. आता मी तुम्हाला एक हजार रुपये देतो, आपला हिशेब बरोबर होईल,

असे म्हणताच ससाणे यांनी तौफिकच्या तोंडात लगावली. त्यामुळे चिडलेल्या तौफिकने लगतचा लोखंडी गज घेऊन तो ससाणे यांच्या डोक्यात घातला. तीन-चार वेळा त्यांच्या डोक्यात मारल्यामुळे ससाणे जागेवरच गतप्राण झाले. हा दिवस रविवार असल्याने दुचाकी शोरूम बंद असल्याने हा प्रकार कुणाच्याही लक्षात आला नाही. त्यानंतर तौफिकने ससाणेचा मृतदेह तसाच सोडून देत जीप घेऊन पळ काढला. त्याच्या नातलगांना घेऊन तो म्हैसमाळलाही जीपने जाऊन आला. त्यानंतर नातलगांना सोडून तो रात्री साडेसातच्या दरम्यान घटनास्थळी आला.

त्याने ससाणेचा मृतदेह जीपमध्ये टाकून ती जीप गरवारे कंपनीसमोरील मोकळ्या जागेत आणून उभी करून तो पसार झाला. पोलिसांनी साठेनगरातील घरातून सकाळी आठच्या सुमारास त्याच्या मुसक्या आवळल्या. त्याने गुन्ह्याची कबुली दिली. वाळूज पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक सचिन इंगोले, सहायक पोलिस निरीक्षक विनायक शेळके, पोलिस उपनिरीक्षक लक्ष्मण उंबरे यांच्यासह पथकाने कारवाईत भाग घेतला.