
एका क्लिकवर आता पाणीपुरवठ्याची माहिती
औरंगाबाद : नागरिकांना पाणी पुरवठ्याच्या वेळा आता एका क्लिकवर कळणार आहेत. स्मार्ट सिटीने त्यासाठी ''जल-बेल'' हे ॲप तयार केले असून, या ॲपवर नागरिकांना त्यांच्या भागातील वेळापत्रक पाहता येईल. सध्या सिडको एन-५ टाकीवरून होणाऱ्या भागाची माहिती या ॲपवर आहे.
महापालिकेचे प्रशासक आस्तिककुमार पांडेय यांनी शहरातील पाणी पुरवठ्याला शिस्त लावण्यासाठी विविध उपाय-योजना हाती घेतल्या आहेत. पाणी कधी येणार याविषयी नागरिकांना माहिती होत नव्हती. त्यामुळे औरंगाबाद स्मार्ट सिटीने ‘जल-बेल’ हे ॲप तयार केले आहे. एक्सपिका डेव्हलपर या स्टार्टअपद्वारे नीलेश लोणकर व अक्षय कुलकर्णी यांनी ॲप तयार करून दिले आहे. मंगळवारी स्मार्ट सिटीचे सीईओ अस्तिककुमार पांडेय, अतिरिक्त सीईओ अरुण शिंदे, प्रकल्प अभियंता फैज अली, प्रकल्प सहयोगी किरण आढे यांच्या उपस्थितीत हा ॲप खुला करण्यात आला.
यावेळी श्री. पांडेय म्हणाले, ‘जल-बेल’ लवकरच संपूर्ण शहरासाठी उपलब्ध असेल. पाणीपुरवठ्याचे लाइनमन, व्हॉल्व ऑपरेट करणारे कर्मचारी, अभियंता व अधिकारी यांच्याशी समन्वय साधून हा ॲप चालविला जात आहे. हे ॲप अँड्रॉइडवर गूगल प्ले स्टोअरवर उपलब्ध आहे.
या भागातील नागरिकांना फायदा
-चिकलठाणा, चौधरी कॉलनी, म्हाडा कॉलनी, मसनतपूर, संजयनगर, नारेगाव, मथुरानगर, सिडको एन-१, सिडको एन-६, साईनगर-शुभश्री कॉलनी, सिडको एन-१ टाऊन सेंटर, एन-६ शिवज्योती कॉलनी, आविष्कार कॉलनी, उत्तरनगरी, एन-८ गणेशनगर, एन-६ सिडको, एन-५, एन-७ के सेक्टर, गुलमोहर कॉलनी, ब्रिजवाडी, संघर्षनगर-विठ्ठलनगर, एन-३, एन-२ सिडको, एन-४ सिडको, जयभवानीनगर, संतोषीमाता नगर, रामनगर, राजीव गांधी नगर, मुकुंदवाडी, संजयनगर.
असे आहेत ॲपचे फायदे
नागरिकांना त्यांच्या भागात येणाऱ्या पाण्याची वेळ, तारीख कळेल. त्यासाठी एक नोटिफिकेशन मिळेल. पाणी येण्यापूर्वी ॲपद्वारे नागरिकांना अलर्ट मिळेल. महिनाभरात कधी पाणी आले याचे वेळापत्रक देखील या ॲपवर असेल. पाणी येण्यासाठी एक मिनीट जरी उशीर होणार असेल तरी देखील हे ॲप वापरकर्त्याला अलर्ट देईल. नागरिकांना पाण्याविषयी तक्रारी देखील नोंदवता येतील.
Web Title: Aurangabad Jel Bel Application Get One Click To Information Of Water Supply
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..