
Aurangabad Crime : करमाड पोलिस ठाण्यासमोरच चोरी
करमाड : कोयता व लाकडी दांड्याचा धाक दाखवून मारहाण करीत चोरट्यांनी चक्क करमाड पोलिस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या बंगला परिसरातील एका बंगल्यातून दागिन्यांसह जवळपास नव्वद हजारांचा ऐवज लंपास केल्याची घटना सोमवारी (ता.१३) मध्यरात्री घडली. विशेष म्हणजे या घटनेत चोरांचा प्रतिकार करणारे भाडेकरू पोलिस कर्मचारीही जखमी झाले आहे.
याबाबत पोलिसांनी सांगितले की,. संतोष दादाराव ठोंबरे (३०, बंगला परिसर, करमाड ता.औरंगाबाद) यांनी मंगळवारी (ता.१४) याबाबत फिर्याद दिली. त्यात नमुद केले की, श्री. ठोंबरे हे पत्नी, आई-वडील व मुलासह आणि वरच्या मजल्यावर करमाड पोलिस ठाण्यातच कार्यरत असलेले श्री. मारकवाड हे पोलिस कर्मचारी असे सर्वजण बंगला परिसरात राहतात.
सोमवारी (ता.१३) मध्यरात्री सुमारे चार ३० ते ३५ वयोगटातील चोरट्यांनी घरात प्रवेश केला. त्यांनी हॉल मध्ये झोपलेल्या श्री. ठोंबरे यांचा मुलगा, आई-वडिलांना या लाकडी दंडुक्यांनी मारहाण करीत कोयत्याचा धाव दाखवीत जीवे मारण्याची धमकी दिली. तसेच आईच्या गळ्यातील सोन्याचे दागिने हिसकावले.
तसेच श्री. ठोंबरे यांच्या खोलीत प्रवेश करून त्यांच्या पत्नीच्या गळ्यातील दागिने ओरबाडून घेत फिर्यादी संतोष ठोंबरे यांच्या खिशातून रोख दोन हजार हिसकावून पोबारा केला.
यावेळी आवाज आल्यानंतर येथील भाडेकरु पोलिस कर्माचारी हे बाहेर आले असता त्यांनाही चोरट्यांनी मारहाण करुन जखमी केल्याची घटना घडली. याप्रकरणी अज्ञात चोरट्यांविरुद्ध करमाड पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांची भेट
सदरील चोरीत आई जनाबाई ठोंबरे, रेणुका ठोंबरे यांचे दागिने व रोख दोन हजार अशा एकूण ८६ हजारांचा ऐवज चोरून नेला आहे.
याबाबत माहिती मिळताच मंगळवारी (ता.१४) अतिरिक्त पोलिस अधीक्षक सुनील लांजेवार, उपअधीक्षक जयदत्त भवर यांनी भेट दिली. यावेळी वरिष्ठांनी पाहणी करून पोलिस निरीक्षक मुरलीधर खोकले यांना काही सूचना केल्या.
हिवरा येथूनही तीन बकऱ्या चोरी
सोमवारी (ता.१३) मध्यरात्रीच हिवरा या गावातूनही तीन बकऱ्या चोरीस गेल्याची घटना घडली. जडगाव-हिवरा या जोडरस्त्यावरील शिवाजी कुबेर यांच्या शेतवस्तीवरून अज्ञात चोरट्यांनी या बकऱ्या पळविल्या. यानंतर चोरट्यांनी बाबासाहेब पोफळे यांची दुचाकी चोरून नेली.
दरम्यान दुचाकी घेऊन जात असताना समोरून गावातील काही जण पिकास पाणी देऊन घरी दुचाक्यावरून परतत असताना या चोरट्यांनी त्यांच्याकडील दुचाकी रस्त्याच्या कडेच्या फेकून देत पोबारा केला.
त्यानंतर श्याम पोफळे यांच्या आखाड्यावरून दुचाकी चोरीचा प्रयत्न केला गेला. मात्र, या वस्तीवर झोपलेल्यांना जाग आल्याने प्रयत्न अपयशी ठरला. दरम्यान, करमाड येथे हाकेच्या अंतरावर असलेल्या करमाड ठाण्यासमोर चोरी झाल्याने चोरट्यांनी एकप्रकारे पोलिसांना आव्हान दिल्याची चर्चा आहे.