संभाजीनगर ठरतेय ‘किडनी केअर हब’
डॉ. शेखर शिराढोणकर ः मधुमेहामुळे मूत्रपिंडांवर होणारा आघात रोखणे आवश्यक
(((पहिला एंट्रो)))
मराठवाड्यातील वैद्यकीय क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणारे डॉ. शेखर शिराढोणकर हे छत्रपती संभाजीनगरमधील अग्रगण्य मूत्रपिंड विकार व प्रत्यारोपण तज्ज्ञ (नेफ्रोलॉजिस्ट) आहेत. सोळा वर्षांपूर्वी जेव्हा संपूर्ण शहरात मोजकेच तज्ज्ञ उपलब्ध होते, तेव्हापासून त्यांनी या क्षेत्रात अविरत सेवा देण्यास सुरवात केली. त्या काळात मोजक्या खाटांवर होणाऱ्या डायलिसिसपासून ते आज दरमहा हजारो डायलिसिस आणि वर्षाला सुमारे दोनशे यशस्वी मूत्रपिंड प्रत्यारोपण शस्त्रक्रियांपर्यंत शहराचा झालेला वैद्यकीय कायापालट त्यांनी प्रत्यक्ष अनुभवला आणि घडवला आहे. आपल्या अनुभवातून त्यांनी छत्रपती संभाजीनगरला अवयव प्रत्यारोपणाच्या नकाशावर मानाचे स्थान मिळवून दिले आहे.
(((दुसरा इंट्रो))))
मोठ्या महानगरांच्या तुलनेत तब्बल पन्नास टक्के कमी खर्चात सर्वसामान्य रुग्णांना त्यांच्याच भागात जागतिक दर्जाचे उपचार मिळावेत, हे डॉ. शिराढोणकर यांचे प्रमुख व्हिजन आहे. केवळ उपचार करणे पुरेसे नसून समाजातील वाढत्या मधुमेहामुळे मूत्रपिंडांवर होणारा आघात रोखणे ही त्यांची मुख्य अपेक्षा आहे. तरुण पिढीने अनियंत्रित जीवनशैली, प्रोटिन सप्लिमेंट्सचा अतिरेक आणि जंक फूड टाळावे, तसेच प्रत्येकाने संतुलित आहार, योग्य टीडीएसचे पाणी आणि नियमित आरोग्य तपासणीची शिस्त बाळगावी, असे त्यांचे मत आहे. ‘प्रतिबंध आणि लवकर निदान हाच खरा जीवनमंत्र’ असल्याचे ते मानतात.
--
पूर्वी एखाद्या रुग्णाला मूत्रपिंड निकामी झाल्याचे निदान झाले, की केवळ तो रुग्णच नव्हे, तर त्याचे संपूर्ण कुटुंब मानसिक आणि आर्थिकदृष्ट्या पार खचून जायचे. नियमित डायलिसिस किंवा मूत्रपिंड प्रत्यारोपणासाठी (किडनी ट्रान्सप्लांट) मुंबई, पुणे, हैदराबाद अथवा चेन्नईसारख्या महानगरांकडे धाव घ्यावी लागायची. तिथे होणारा अफाट वैद्यकीय खर्च, राहण्या-खाण्याची परवड, कामाचा खोळंबा आणि प्रवासाचा अतोनात ताण यांमुळे अनेक सामान्य आणि मध्यमवर्गीय कुटुंबे उपचारांअभावी हात टेकायची. मात्र, गेल्या दशकभरात हे विदारक चित्र पूर्णपणे पालटले आहे. आज मराठवाड्याची राजधानी असलेले छत्रपती संभाजीनगर हे केवळ या विभागाचेच नव्हे, तर लगतच्या खान्देश, उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भातील तब्बल १३ हून अधिक जिल्ह्यांसाठी ‘किडनी केअर हब’ म्हणून देशाच्या नकाशावर ठळकपणे उभे राहिले आहे. मुंबई-पुण्यासारख्या मोठ्या शहरांच्या तुलनेत तब्बल ५० टक्के कमी खर्चात आणि तितक्याच जागतिक दर्जाच्या आधुनिक सुविधा येथे उपलब्ध झाल्याने, हजारो सर्वसामान्य रुग्णांना मोठा आर्थिक व मानसिक आधार मिळून नवे जीवनदान लाभत आहे, असे डॉ. शिराढोणकर यांनी सांगितले.
--
रुग्णसंख्या दहापटीने वाढणे हे अत्यंत गंभीर
सोळा वर्षांपूर्वीच्या परिस्थितीचा विचार केला, तर संपूर्ण शहरात मोजकेच किडनी विकार तज्ज्ञ कार्यरत होते आणि त्यात माझा क्रमांक आठवा होता. त्या काळात रुग्णालयांमध्ये डायलिसिसच्या मोजक्याच खाटा उपलब्ध असायच्या आणि रुग्णांना उपचारांसाठी ताटकळत राहावे लागायचे. आज मात्र ही परिस्थिती क्रांतिकारी पद्धतीने बदलली असून, शहरात २६ पेक्षा अधिक उच्चविद्याविभूषित व अनुभवी किडनी विकार आणि प्रत्यारोपण तज्ज्ञ अविरत सेवा देत आहेत. पूर्वी शहरात केवळ तीन रुग्णालयांत डायलिसिसची सोय उपलब्ध होती. आज अत्याधुनिक डायलिसिस केंद्रांची संख्या १५ हून अधिक रुग्णालयांत पोचली आहे. माझ्या स्वतःच्या रुग्णालयाचे उदाहरण घ्यायचे झाल्यास, पूर्वी महिन्याला जेमतेम २०० ते २५० डायलिसिस होत असत. आज हाच आकडा महिन्याला १,००० हून अधिक झाला आहे. आज शहरात दरमहा सरासरी १५ ते २० आणि वर्षभरात सुमारे दोनशे मूत्रपिंड प्रत्यारोपण शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार पडत आहेत. मराठवाड्यातील आठ जिल्ह्यांसह अहिल्यानगर, नाशिक, जळगाव, बुलडाणा, धुळे आणि नंदुरबार या लगतच्या भागांतून उपचारांसाठी येणाऱ्या रुग्णांचा ओघ छत्रपती संभाजीनगरात सातत्याने वाढतो आहे. एका बाजूला आधुनिक वैद्यकीय तंत्रज्ञान, कुशल शल्यविशारद आणि स्वस्त उपचारांचा हा मोठा दिलासा असला, तरी दुसऱ्या बाजूला अवघ्या काही वर्षांत मूत्रपिंड विकारांच्या रुग्णांची संख्या दहापटीने वाढणे ही संपूर्ण समाजाच्या आरोग्यासाठी अत्यंत गंभीर धोक्याची घंटा ठरत आहे.
----
दैनंदिन जीवनशैलीत झालेला बदल ठरतोय कारणीभूत
जागतिक स्तरावर भारताची ओळख दुर्दैवाने झपाट्याने ‘मधुमेहाची जागतिक राजधानी’ अशी होऊ लागली आहे. ही केवळ रक्तातील साखरेची समस्या राहिलेली नसून तिचे थेट आणि प्राणघातक दुष्परिणाम मानवी शरीराच्या सर्वांत नाजूक अशा मूत्रपिंडांवर होत आहेत. सध्याच्या वैद्यकीय आकडेवारीनुसार, किडनी निकामी झालेल्या एकूण रुग्णांपैकी तब्बल ४० ते ५० टक्के रुग्ण हे थेट मधुमेहाचे बळी असल्याचे निष्पन्न झाले आहे. रक्तातील अनियंत्रित साखर सूक्ष्म रक्तवाहिन्यांचे जाळे उद्ध्वस्त करते, ज्यामुळे किडनीची रक्त शुद्ध करण्याची क्षमता हळूहळू नष्ट होते. याव्यतिरिक्त वीस टक्के रुग्णांमध्ये अनियंत्रित उच्च रक्तदाब हे मुख्य कारण आढळते, तर उर्वरित ३० टक्के रुग्ण मूत्रमार्गातील खडे (किडनी स्टोन), वारंवार होणारे मूत्रमार्गाचे संसर्ग, वेदनाशामक औषधांचा अतिरेक, अनुवंशिकता आणि इतर कारणांनी ग्रस्त असतात. गेल्या दोन दशकांत आपल्या दैनंदिन जीवनशैलीत झालेला आमूलाग्र बदल यासाठी प्रामुख्याने कारणीभूत ठरला आहे. बैठ्या कामाचे स्वरूप, शारीरिक कष्टाचा व व्यायामाचा पूर्ण अभाव, जंक फूड आणि फास्ट फूडचे वाढलेले व्यसन, मानसिक ताणतणाव, पॅकबंद अन्नातील घातक रसायने आणि पाण्याचे असंतुलन यांमुळे अगदी तरुण वयातच उच्च रक्तदाब व मधुमेहाचे आक्रमण होत आहे. परिणामी, पूर्वी वयाच्या पन्नाशीनंतर आढळणारे मूत्रपिंडाचे गंभीर आजार आता तिशी-चाळिशीतील तरुणांमध्येही सर्रास दिसून येत आहेत.
-------
अतिशुद्ध केलेले पाणीही शरीरासाठी अपायकारक
शरीरातील घातक विषारी द्रव्ये नैसर्गिकरीत्या बाहेर टाकण्यासाठी पाणी हे निसर्गाने दिलेले सर्वात प्रभावी माध्यम असले, तरी पाण्याविषयी समाजात अनेक टोकाचे गैरसमज पसरलेले आहेत. प्रत्येकाने तहान लागेल तेव्हा आणि आपल्या शरीराच्या गरजेनुसार योग्य प्रमाणात पाणी पिणे आवश्यक असते. सामान्यतः निरोगी प्रौढ व्यक्तीने दिवसाला अडीच ते तीन लिटर पाणी पिणे आरोग्यासाठी पुरेसे मानले जाते. आजकाल घराघरांमध्ये ‘आरओ’ (RO) वॉटर प्युरिफायर बसवण्याची मोठी फॅशन झाली आहे; परंतु अतिशुद्ध केलेले पाणीही शरीरासाठी अपायकारक ठरू शकते, हे अनेकांना ठाऊक नसते. पाण्याचे टोटल डिझॉल्व्हड् सॉलिड्स (टीडीएस) नेहमी संतुलित असावे. पाणी अतिशुद्धही नसावे आणि अतिक्षारयुक्तही नसावे. पाण्यातील नैसर्गिक खनिजे व आवश्यक क्षार पूर्णपणे काढून टाकल्यास त्याचे दीर्घकालीन दुष्परिणाम मानवी शरीराला भोगावे लागतात. महापालिकेकडून शुद्ध करून येणारे नळाचे पाणी योग्य पद्धतीने उकळून आणि सुती कापडाने गाळून प्यायल्यास ते आरोग्यासाठी सर्वात सुरक्षित आणि उत्तम ठरते. याशिवाय सध्या तरुणांमध्ये सोशल मीडियाच्या प्रभावातून जिममध्ये जाऊन पिळदार शरीर कमावण्याची मोठी क्रेझ दिसून येते. तिथे अनेकदा अर्धवट माहितीच्या आधारे अतिरिक्त हाय-प्रोटिन पावडर आणि अनधिकृत सप्लिमेंट्सचे सेवन केले जाते. शरीराच्या नैसर्गिक पचनक्षमतेपेक्षा जास्त प्रोटिन शरीरात गेल्यास त्याचे पचन करताना मूत्रपिंडांवर प्रचंड ताण पडतो, ज्यातून अनेक तंदुरुस्त दिसणाऱ्या तरुणांच्या किडन्या अचानक निकामी झाल्याची धक्कादायक उदाहरणे आज समोर येत आहेत. म्हणूनच सकस शाकाहाराला प्राधान्य देत अतिप्रमाणात मांसाहार, प्रक्रिया केलेले डबाबंद अन्न, शीतपेये आणि अन्नातील मिठाचा अतिरेक टाळणे प्रत्येकासाठी अत्यावश्यक बनले आहे.
---
‘सायलेंट किलर’ घ्या जाणून
मूत्रपिंडाच्या आजारांचे सर्वांत मोठे आणि घातक वैशिष्ट्य म्हणजे हे आजार सुरवातीच्या टप्प्यात रुग्णाला कोणतीही ठळक वेदना किंवा लक्षण दाखवत नाहीत. सुमारे साठ ते सत्तर टक्के कार्यक्षमता संपेपर्यंत रुग्णाला स्वतःला कोणताही मोठा त्रास जाणवत नाही. यालाच वैद्यकीय परिभाषेत ‘क्रॉनिक किडनी डिसीज अननोन’ (सीकेडीयू) किंवा ‘सायलेंट किलर’ म्हटले जाते. जेव्हा प्रत्यक्ष त्रास जाणवू लागतो, तेव्हा हा आजार बऱ्याचदा शेवटच्या टप्प्यावर पोचलेला असतो. त्यामुळे लघवीच्या प्रमाणात अचानक बदल होणे, लघवीतून फेस किंवा रक्त येणे, सकाळी झोपेतून उठल्यावर चेहऱ्यावर अथवा संध्याकाळी पायांवर सूज येणे, विनाकारण सतत थकवा व अशक्तपणा जाणवणे, भूक मंदावणे, मळमळ किंवा उलट्या होणे, रात्री वारंवार लघवीसाठी उठावे लागणे आणि नेहमीचे थोडे अंतर चालतानाही छातीत धडधडून धाप लागणे, यांसारखी लक्षणे दिसल्यास त्याकडे अजिबात दुर्लक्ष न करता तातडीने तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेतला पाहिजे.
----
‘प्रतिबंध आणि वेळेत निदान’
हाच सर्वांत सुलभ, खात्रीशीर मार्ग
शरीरातील एक जरी अवयव निकामी झाला, तरी त्याचे गंभीर दुष्परिणाम संपूर्ण शरीरावर साखळीसारखे उमटतात. मूत्रपिंड पूर्णपणे निकामी झाल्यावर आयुष्यभराचे डायलिसिस किंवा अवयव प्रत्यारोपण हेच दोन पर्याय उरतात, जे आर्थिक आणि मानसिकदृष्ट्या अत्यंत आव्हानात्मक असतात. प्रत्यारोपण शस्त्रक्रिया यशस्वी झाली, तरी शस्त्रक्रियेनंतर रुग्णाला संसर्ग टाळण्यासाठी अतिशय काटेकोर स्वच्छता बाळगावी लागते आणि प्रतिकारशक्ती नियंत्रित ठेवणारी औषधे आयुष्यभर नियमित घ्यावी लागतात. त्यामुळे उपचारांच्या या गुंतागुंतीपेक्षा ‘प्रतिबंध आणि वेळेत निदान’ हाच सर्वांत सुलभ आणि खात्रीशीर मार्ग ठरतो. चाळिशी ओलांडलेल्या नागरिकांनी, तसेच ज्यांना आधीपासून मधुमेह किंवा उच्च रक्तदाब आहे आणि ज्यांच्या कुटुंबात मूत्रपिंडाच्या विकारांचा इतिहास आहे, त्यांनी वर्षातून किमान एकदा तरी रक्तातील ‘सिरम क्रिएटिनिन’, रक्तातील साखर आणि लघवीची साधी तपासणी नियमितपणे करून घेतली पाहिजे. सुरवातीच्या टप्प्यात आजाराचे निदान झाल्यास योग्य औषधोपचार, आहारातील पथ्ये आणि जीवनशैलीतील सकारात्मक बदलांच्या आधारे मूत्रपिंडाचे पुढील नुकसान सहज टाळता येते. छत्रपती संभाजीनगरमध्ये आज सर्व प्रकारच्या अद्ययावत उपचारांची सोय अत्यंत माफक दरात उपलब्ध असली, तरी रुग्णालयाची पायरी चढण्याची वेळच येऊ नये यासाठी प्रत्येकाने आपल्या रोजच्या सवयींमध्ये आजच बदल करणे आणि आपल्या आरोग्याविषयी जागरूक राहणे ही काळाची खरी गरज आहे.