esakal | ‘तो’ फक्त खातो पोलिसांच्या हातची भाकरी!

बोलून बातमी शोधा

traffic police good work
‘तो’ फक्त खातो पोलिसांच्या हातची भाकरी!
sakal_logo
By
प्रकाश बनकर

औरंगाबाद : एरव्ही रहदारीने गजबजणाऱ्या आणि आता कोरोनामुळे रहदारी कमी झालेल्या सिडकोतील वसंतराव नाईक चौक ते सिडको एन-वन येथील भक्ती गणेश मंदिरदरम्यानच्या रस्त्यावर एका बेघर व्यक्तीचा वावर असतो. कोणाला दया आली तर त्याला खायला देण्यासाठी पुढे येतात, पण तो ते घेत नाही! त्याची नजर भिरभिर शोधत असते एका वाहतूक पोलिसाला. वाहतूक पोलिस दिसताच त्यांच्याकडे जाऊन त्यांचा डबा घेऊन तो आनंदाने जेवण करतो. गेल्या तीन महिन्यांपासून हा नित्यक्रम अविरत सुरू आहे. यामुळे वाहतूक पोलिसही गेल्या तीन महिन्यांपासून स्वत:च्या डब्ब्याबरोबरच आवर्जून त्या बेघरासाठी डब्बा घेऊन येतात. यामुळे पुन्हा एकदा खाकी वर्दीतील माणुसकीचे दर्शन या उपक्रमातून घडत आहेत.

सिडको वाहतूक शाखेत कार्यरत असलले गोरखनाथ भागाजी गोल्हार यांची सिडकोतील चौकात ड्यूटी आहे. यामूळे ते कधी वसंतराव नाईक चौकात असतात, तर कधी सिडको बसस्थानकाच्या समोर, तर कधी सिडको एन-१ पिरॅमिड चौकात तैनात असतात. याच परिसरात फिरणाऱ्या एक बेघराच्या जेवणाची जबाबदारीच गोरखनाथ गोल्हार यांनी घेतली आहे. ते त्या बेघरासाठी जेवणाचा डबा आणतात. विशेष म्हणजे त्या बेघराला कोणी काहीही खायला दिले तर तो खात नाही. तो केवळ वाहतूक पोलिस भागाजी गोल्हार त्यांच्याच हाताने दिलेले अन्न घेतो. इतरांनी दिलेली पाणीही तो नाकारतो, असेही गोल्हार यांनी सांगितले.

हेही वाचा: हृदयद्रावक! मुलाच्या मृत्यूनंतर वृद्ध आई-वडीलांनाही सोडले प्राण

रोज एक ते दीडच्या सुमारास हा बेघर व्यक्ती गोरखनाथ यांचा सर्वत्र शोध घेतो. विशेष म्हणजे जेवण झाल्यानंतर डब्‍यातील एक कणही वाया जाणार नाही याची काळजी घेत डब्बा विसळून ते पाणी पितो! शुक्रवारी (ता.२३) तो गोरखनाथ गोल्हार यांचा शोध घेत आला. सिडको बसस्थानकाच्या पुढे कर्तव्यावर हजर असलेल्या गोल्हार व त्यांचे सहकारी मदन लक्ष्मण गोरे यांनी त्यास डब्बा दिला. त्यांनी जेवण करून त्यात उरलेली चपाती बाजूला ठेवली. डब्बा विसळून पाणी प्यायला. दोन्ही पोलिसांना नमस्कार करीत अनवानी पायांनी सिडकोतील चौकाकडे निघून गेला.

हेही वाचा: Corona Updates: मराठवाड्यात २४ तासांत आठ हजार रुग्ण; १७३ जणांचा मृत्यू

माझी ऑक्टोबरला सिडकोत बदली झाली. तेव्हापासून मी त्याला पहात होतो. त्याच्याशी बोलत होतो. तो इतरांकडून काही घेत नव्हता. केवळ मी दिलेले घेत होता. तेव्हापासून त्याच्याविषयी आपुलकी निर्माण झाली. आमचे एक माणुसकीचे नाते तयार झाले. या कामातून आनंद मिळतो. क्रांती चौक पोलिस ठाण्यात असताना मध्यवर्ती बसस्थानकात अनेकांना मदत केली. आता याला नियमितपणे मी जे जेवतो तेच यालाही आणतो.

-गोरखनाथ गोल्हार, वाहतूक पोलिस