esakal | सिल्लोडमध्ये लसीचा साठा संपला, आतापर्यंत २० हजार ८०५ नागरिकांचेच लसीकरण
sakal

बोलून बातमी शोधा

सिल्लोडमध्ये लसीचा साठा संपला, आतापर्यंत २० हजार नागरिकांचेच लसीकरण

सिल्लोडमध्ये लसीचा साठा संपला, आतापर्यंत २० हजार नागरिकांचेच लसीकरण

sakal_logo
By
सचिन चोबे

सिल्लोड (जि.औरंगाबाद) : कोविड प्रतिबंधात्मक लसीकरणास सिल्लोड तालुक्यात जानेवारीच्या दुसऱ्या आठवड्यात सुरूवात झाली होती. यावेळी लसीकरणाबाबत सोशल मीडीयावर शंका उपस्थित केल्या जात असल्याने लसीकरणाकडे नागरिकांनी कानाडोळा केला होता. मात्र, आता प्रशासनाच्या वतीने लसीकरणाचे फायदे समजावून सांगितल्याने नागरिक मोठ्या संख्येने लसीकरणाची मागणी करीत असल्याचे चित्र आहे. मात्र, आता सिल्लोड येथील लसीचा साठा संपल्याने नागरिकांची अडचण झाली असून या लसीसाठी आणखी किती दिवस वाट बघावी, लागेल हे सध्या तरी सांगणे कठीण आहे. शासनाच्या निर्देशानुसार सुरूवातीस प्राधान्याने आरोग्य कर्मचारी, कोविड योद्धा यांचे लसीकरण करण्यासाठी तालुक्यात २२० लस उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या.

उपजिल्हा रूग्णालयात १७ जानेवारी रोजी लसीकरणाचा श्रीगणेशा करण्यात आला. त्यानंतर टप्प्याटप्प्याने शासनाने लसीचा पुरवठा केल्यानंतर उपजिल्हा रूग्णालयासह अजिंठा येथील ग्रामीण रूग्णालय, तालुक्यातील सहा प्राथमिक आरोग्य केंद्रावर कोविड प्रतिबंधात्मक लसीकरणाची मोहीम सुरू करण्यात आली. आतापर्यंत शहरासह तालुक्यात २० हजार ८०५ नागरिकांना लस देण्यात आली आहे. सुरुवातीला नागरिकांमध्ये लसीबाबत भीती होती. मात्र, आता लसीकरणासाठी उत्सुक असताना गुरूवारी (ता.१५) लसीचा साठा संपल्यामुळे लसीकरणाच्या मोहिमेस ब्रेक लागला आहे. शहरासह तालुक्यात कोरोनाचा प्रादूर्भाव झपाट्याने वाढत आहे. तर गेल्या दोन महिन्यांमध्ये तालुक्यात २६ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. कोविड प्रतिबंधात्मक लस घेण्यासाठी नागरिक शहरासह तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रावर येत असताना लसीचा साठा संपल्यामुळे आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांना हातावर हात धरून बसण्याशिवाय दुसरा पर्याय उरला नाही.

जनजागृतीनंतर मिळाला होता प्रतिसाद

लसीकरण केल्यानंतर अनेकांना त्रास होत असल्याच्या अफवा सुरूवातीस उठल्यानंतर नागरिकांनी लस घेण्याकडे पाठ फिरविली होती. त्यानंतर आरोग्य विभागाच्या वतीने लसीकरणासाठी जनजागृती करण्यात आली. नागरिकांचा प्रतिसाद मिळू लागल्यानंतर आता लसीचा साठा संपल्यामुळे शासनाने आरोग्य विभागास लसीचा पुरवठा तातडीने करण्याची मागणी होत आहे. लसीसाठी आणखी किती दिवस वाट बघावी लागेल हे सांगणे कठीण असल्याने नागरिक संभ्रमात सापडले आहेत.

तालुक्यात झालेले लसीकरण

उपजिल्हा रूग्णालय - ६ हजार.

सहा प्राथमिक आरोग्य केंद्रे - १३ हजार ४८५.

ग्रामीण रूग्णालय, अजिंठा - १ हजार ३२०.

एकूण - २० हजार ८०५.