esakal | बारदाना खाल्ला उंदरांनी, मुख्याध्यापकांची झाली पंचायत

बोलून बातमी शोधा

null
बारदाना खाल्ला उंदरांनी, मुख्याध्यापकांची झाली पंचायत
sakal_logo
By
संदीप लांडगे

औरंगाबाद : जिल्हा परिषदेच्या व खासगी अनुदानित अशा एकूण ३ हजार ३७६ शाळा आहेत. कोरोना लॉकडाऊनच्या काळात या शाळेतील पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना कोरडा पोषण आहार वाटप करण्यात आला. आता विद्यार्थ्यांना तांदूळ, धान्य माल वाटप केल्यानंतर रिकामा झालेला बारदाना पुरवठाधारकास परत करण्याच्या सूचना शिक्षण विभागाने दिल्या आहेत. त्यामुळे वर्षभराचा बारदाना शोधताना मुख्याध्यापकांची चांगलीच डोकेदुखी वाढली आहे. अनेक शाळांमधील बारदाना उंदीरांनी खाऊन टाकला असल्याचे मुख्याध्यापकांचे म्हणणे आहे.

लॉकडाऊनमुळे या वर्षात पहिली ते चौथीपर्यंतच्या शाळा भरल्याच नाहीत. पाचवी ते आठवीच्या शाळाही काही दिवसच सुरू होत्या. या वर्षी विद्यार्थ्यांना शाळेत बोलावून त्यांना शालेय पोषण आहाराचे वाटप करण्यात आले. जुलै महिन्यात ३४ दिवसांचे, त्यानंतर साठ दिवसांचे व पुढे ५६ दिवसांचा पोषण आहार वाटप करण्यात आला. वर्षभरात तांदूळ व धान्यादी माल वाटप करण्यात आला. आता विद्यार्थ्यांना तांदूळ धान्य माल वाटप केल्यानंतर रिकामा झालेला बारदाना पुरवठा धारकास परत करण्याच्या सूचना शालेय पोषण आहार अधीक्षकांनी दिल्या आहेत. बारदाना पुरवठाधारकास दिल्यानंतर त्याची पोहोच ठेवावी.

बारदाना देताना कोणत्या वाटपाचे बारदाना परत करत आहात हेही पत्रात नमूद करायचे आहे. एकूण किती बारदाना परत केला याचा अहवाल केंद्रप्रमुख व केंद्रीय मुख्याध्यापकांना द्यावयाचा आहे. मागील एक वर्षापासून शाळा बंद आहेत. पोषण आहार वाटपानंतर बारदाना शाळेत पडून होता. मात्र, पावसाळ्यात अनेक शाळा गळतात. त्या पाण्यात भिजून बारादाना खराब झाला आहे. तर काही शाळांमधील बारदाना उंदीरांनी खाऊन टाकला आहे असल्याचे मुख्याध्यापकांचे म्हणणे आहे. त्यामुळे मुख्याध्यापकांना रिकामा बारदाना सापडत नाही. मुख्याध्यापकांना हा रिकामा बारदाना सापडत नसल्यामुळे पुन्हा विकत घेऊन पुरवठा धारकांना परत करावा लागणार आहे. त्यामुळे बारदाना शोधताना मुख्याध्यापकांना चांगलीच डोकेदुखी वाढली आहे.