esakal | वृक्षतोडीमुळे गावरान आंब्याची चव झाली दुर्मिळ.... !
sakal

बोलून बातमी शोधा

mango tree in rural

वृक्षतोडीमुळे गावरान आंब्याची चव झाली दुर्मिळ.... !

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पाचोड (औरंगाबाद): आजी - आजोबांनी लागवड केलेली तर कोठे नेसर्गिक उगवण झालेल्या शेतातील गावरान आमवृक्षांची मोठ्या प्रमाणावर तोड झाल्याची दिसत आहे. गावरान आमराया नष्ट होऊन आमरसाची चव दुर्मिळ झाल्याचे चित्र पाचोड (ता.पैठण) सह सर्व ग्रामीण भागात पाहावयास मिळते.

पूर्वी "दादा लगाए आम और खाये पोता" म्हणीप्रमाणे प्रत्येक गावागावात नामांकित गावरान आमराया अस्तित्वात होत्या. प्रत्येक शेतकऱ्याकडे बांधा बांधावर लागवड केलेली तर काही नैसर्गिक उगवण झालेली गावरान आंब्याची शंभर - पन्नास झाडे मोठ्या ताठ मानेने उभे होते. मात्र अलीकडील काळात शेतकऱ्यांनी झाडाखाली पिके वाढत नसल्याने गावरान आंब्याची विस्तीर्ण झाडे तोडून नवीन संकरित, कलमीकरण केलेली विविध आंब्याच्या झाडाची लागवड केली. त्यामुळे ग्रामीण भागात आता गावरान आंबे दुर्मीळ झाले.

हेही वाचा: वाळूजमध्ये खासगी रुग्णालयाकडून होतेय आर्थिक लूट

सध्या क्वचितच एखाद्या ठिकाणी गावरान आंब्याची झाडे दृष्टीस पडतात. परिणामी शेंद्रया, शेप्या, खऊट, दश्या, तोतापरी आदी मौल्यवान गावरान आंब्याची सर्रासपणे सुरू झालेली वृक्षतोड आमराया दुर्मिळ होण्यास कारणीभूत ठरली. फळांचा राजा म्हणून प्रसिद्ध असलेल्या गावरान आंब्याला आता उतरती कळा लागली असून पूर्वी घराघरांमध्ये गावरान आंबे पिकविण्यासाठी लगबग असायची. घरात प्रवेश करण्यापूर्वीच पिकविण्यासाठी टाकलेल्या गावरान आंब्याच्या आढयांचा सुगंध जिभेला पाणी आणत. पाहुणे आल्यावर त्याचेसमोर आंबे, बादलीभर पाणी, व टोपलेभर आंबे समोर ठेवले जात.

आमरस अन् पोळी हा विशेष पाहुण्यांचा पाहूणचाराचा खास मेणू असायचा. मात्र हे सर्व कालबाह्य झाले. शंभर - दिडशे रुपये किलोप्रमाणे आता बाजारातून आंबे खरेदी करून पाहुण्याची हौस भागवावी लागत आहे. कलमीकरण व उत्पन्नाच्या लालसेपायी गरिबांच्या खिशाला भुर्दंड सोसावा लागत आहे. पूर्वी आंबा थोडा जरी आंबट लागला की त्याला फेकून दिले जात. वादळी वारे आले की लहान मुलं सकाळीच पिशव्या घेऊन आमरायाकडे धूम ठोकत. काही वेळेतच पिशवीभर पाड घेऊन येत. वादळी वाऱ्यामुळे पडलेले पाडात वेगळीच मजा असे.

हेही वाचा: औरंगाबादमध्ये आढळली बेवारस कार; बॉम्बशोधक पथक घटनास्थळी दाखल

गावागावात सामायिक आमराया अस्तित्वात होत्या. शेतातील गावरान आंबे पिकवण्यासाठी गव्हाचे काड, भूशाचा वापर होत असे. आठ -दहा दिवसानंतर पिकू घातलेले आंबे पिवळे धमक होऊन साखरेलाही लाजवील अशी चव चाखावयास मिळत. मात्र अलीकडील काळात उत्पन्नाची वाढती लालसा, वातावरणाचा बदलामूळे निसर्गाचा समतोल बिघडले. एकंदरीत आमराया दुर्मिळ झाल्याने सर्वांचा ओढा तोतापरी, निलम,हापूस, केशरकडे वाढल्याचे पाहावयास मिळते.

(बातमीदार- हबीबखान पठाण)