esakal | अंध विद्यार्थ्यांना बोर्डाकडून दृष्टीहिन प्रमाणपत्राची सक्ती, अंधत्व सिद्ध करण्यासाठी धडपड

बोलून बातमी शोधा

null

अंध विद्यार्थ्यांना बोर्डाकडून दृष्टीहिन प्रमाणपत्राची सक्ती, अंधत्व सिद्ध करण्यासाठी धडपड

sakal_logo
By
संदीप लांडगे

औरंगाबाद : एचएससी बोर्डाच्या परीक्षेला दृष्टी बाधित विद्यार्थ्यांना लेखनिक मदत करतात. या विद्यार्थ्यांकडे अपंगत्वाचे मूळ प्रमाणपत्र आहे. मात्र, आता परीक्षेसाठी बोर्डाने अपंगत्वाचे वेगळे (दृष्टीहिन) प्रमाणपत्र आणण्याचे आदेश दिले आहे. कोरोनाच्या काळात या दृष्टी बाधित विद्यार्थ्यांना जिल्हा रुग्णालयात जावून डॉक्टर्सची सही आणि शिक्का आणणे धोकायदायक आहे. या परीस्थितीत जिल्हा रुग्णालयात जाणे विद्यार्थ्यांच्या जीवावर बेतू शकते. आधीचे अपंग प्रमाणपत्र असताना वेगळ्या प्रमाणपत्राचा हट्ट का? असा सवाल दृष्टी बाधित विद्यार्थ्यांनी उपस्थित केला आहे.

राज्यात सध्या कोरोना महामारीचा विळखा आहे. त्यामुळे शिक्षण विभागाने दहावीच्या परीक्षा रद्द केल्या व बारावीच्या परीक्षा पुढे ढकलल्या आहेत. बारावीच्या परीक्षेसाठी अंध विद्यार्थ्यांना पेपर लिहिण्यासाठी लेखनिकची गरज असते. मात्र, लेखनिक देण्यासाठी शिक्षण मंडळाने विद्यार्थ्यांना वेगळे प्रमाणपत्र (दृष्टीहिन) आणण्याच्या सूचना दिल्या आहेत. लेखनिक मिळवण्यासाठी या विद्यार्थ्यांना दृष्टी बाधित असल्याचे प्रमाण पत्राद्वारे सिद्ध केल्यानंतरच लेखनिक घेता येणार आहे. मुळात या विद्यार्थ्यांकडे अपंगत्वाचे प्रमाणपत्र असतानाही बोर्डाने दिलेल्या प्रमाणपत्रावर जिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांची स्वाक्षरी आणायला सांगितले जात आहे. कोरोनाच्या या भयंकर काळात या दृष्टी बाधित विद्यार्थ्यांनी जिल्हा रुग्णालयात जाणे धोकादायक ठरु शकते. कदाचित विद्यार्थ्यांच्या जीवावरही बेतू शकते. आधीच अपंग प्रमाणपत्र असताना शालेय शिक्षण विभाग आमच्या जिवाशी का खेळत आहे? असा सवाल या दृष्टी बाधित विद्यार्थ्यांनी उपस्थित केला आहे.

हेही वाचा: गोविंद, अरे गोविंदा!, अशी हाक मी किती वेळा मारली असेल, पंकजा मुंडेंची भावनिक पोस्ट

सुकेशनी गोविंदे (विद्यार्थिनी, इयत्ता बारावी) : मी यशवंत महाविद्यालय नांदेड येथे बारावीत आहे. माझ्याकडे शंभर टक्के अपंग प्रमाणपत्र आहे. तरीही वेगळे प्रमाणपत्र देवून त्यावर जिल्हा रुग्णालयातून स्वाक्षरी आणण्याचे सांगीतले आहे. सध्याची परिस्थिती पाहता जिल्हा रुग्णालयात जाऊ शकत नाही. माझ्याकडे स्वतःचे प्रमाणपत्र असताना हे दुसरे प्रमाणपत्र कशासाठी? स्वतःच्या प्रमाणपत्रावर मला लेखनिक द्यावा.

माधव गोरे (शिवाजी विद्यामंदिर लातूर) : १८ मार्च २०१४ रोजी प्रकाशित झालेल्या दिव्यांगांच्या परीक्षा संदर्भात शासन निर्णयात जिल्हा रुग्णालयाने दिलेले अपंग प्रमाणपत्र परीक्षा यंत्रणांनी मान्य करावे, अशा सूचना असतानाही बोर्डाकडून वेगळे प्रमाणपत्र मागविण्यात येत आहे. बोर्डाने याबाबत आत्मपरीक्षण करायला हवे.

गणेश साकळे (अंध विद्यार्थी संघटना, राज्य संघटक) : दृष्टी बाधीत विद्यार्थ्यांना येणाऱ्या अडचणी संदर्भात आम्ही शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांना बैठकीत अडचणी सांगितल्या. यावेळी त्यांनी अडचणी सोडविण्याचे आश्वासन दिले होते. परंतु अजूनही ते आश्वासन पाळले नाही. या अडचणी सोडवाव्यात, अन्यथा 'अंध विद्यार्थी संघटनेकडून आंदोलन करण्यात येईल.