esakal | यंदा वाढले केवळ बावीस विवाह, कोरोना काळातही नोंदणीला अत्यल्प प्रतिसाद
sakal

बोलून बातमी शोधा

आंतरजातीय विवाह

यंदा वाढले केवळ बावीस विवाह, कोरोना काळातही नोंदणीला अत्यल्प प्रतिसाद

sakal_logo
By
मधुकर कांबळे

औरंगाबाद : कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी मंगल कार्यालये, लॉनवर होणाऱ्या लग्नसोहळ्यांना बंदी घालून नोंदणी पद्धतीने लग्न करण्याचे प्रशासनाने आवाहन केले. मात्र, याला फारसा प्रतिसाद मिळाला नाही. पारंपारिक पध्दतीनेच विवाह करण्यावर भर दिल्याचे दिसून आले आहे. २०१९-२० च्या तुलनेत २०२०-२१ च्या कोरोना संसर्गाच्या वर्षात केवळ २२ नोंदणीकृत विवाह वाढले आहेत. धुमधडाक्यात विवाह साजरे करणे हे प्रत्येकाचेच स्वप्न असते. भरमसाठ वऱ्हाडी मंडळींची गर्दी, डिजेचा दणदणाट, पंचपक्वान्न आणि आठ-दहा दिवस पाहुण्यांचा राबता, यामुळे लग्न केल्याचे समाधान वर-वधु परिवारांना होते.

मात्र, २०२० ते २०२१ या वर्षात कोरोनामुळे यावर निर्बंध आणण्याचा निर्णय झाला. यामुळे पारंपरिक विवाह समारंभांनाही प्रतिबंध करण्यात आला होता. याऐवजी मोजक्या लोकांच्या उपस्थितीत नोंदणी विवाह (रजिस्टर्ड मॅरेज) साठी शासनाने आग्रह केला, मात्र याला नागरिकांनी मनावर न घेतल्याचे दिसून आले आहे. जिल्ह्यात कोरोना नसताना मार्च २०१९ ते एप्रिल २०२० या वर्षभरात ४४८ नोंदणीकृत विवाह झाले. त्यानंतर कोरोना प्रादुर्भाव सुरु झाला. साथरोग कायदा व आपत्ती व्यवस्थापन अधिनियमांतर्गत जिल्हा प्रशासनाने लोकांना एकत्र येण्यास प्रतिबंध कायदा लागू केल्याने विवाह समारंभ नोंदणी पद्धतीने करण्याचे आदेश जारी झाले.

तरीदेखील लोकांनी याला गांभीर्याने न घेतल्याचे दिसून आले. कोरोनाकाळात मार्च २०२० ते एप्रिल २०२१ दरम्यान ४७० नोंदणीकृत विवाह झाले. २०१९-२०च्या तुलनेत केवळ २२ विवाह वाढले आहेत. आंतरजातीय, आंतरधर्मीय विवाह करणारे, पळून जाऊन लग्न करणारे, जोडीने परदेशात जाणारे, विविध योजनांसाठी लागणारे विवाह प्रमाणपत्रासाठी नोंदणी विवाह करण्यात येतो. मात्र २०२०-२१ साली सर्वांनाच नोंदणी विवाह करण्याचे आदेश होते. त्यामुळे हा आकडा भरमसाठ वाढणे अपेक्षित होते. तो केवळ २२ ने वाढला आहे.

गेल्यावर्षी लोकांनी सरकारच्या सूचनेचे गांभीर्याने पालन केले नाही. त्यामुळे अनेकांवर कारवायाही झाल्या. मात्र यावेळी जनजागृती वाढली आहे. यंदा २०२१-२२ मधेही कोरोनाचा संसर्ग वाढत आहे,यामुळे नोंदणीकृत विवाहांकडे नागरिकांचा कल वाढणे अपेक्षित आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता नागरिकांनी शासनाला सहकार्य करावे.

- सोहम वायाळ, नोंदणी उपमहानिरीक्षक तथा मुद्रांक उपनिरीक्षक

-----

महिना................ नोंदणी विवाह

----

एप्रिल २०२० ..... ४८

मे २०२० ......... ५४

जून २०२० ......... ४०

जुलै २०२० ....... १६

ऑगस्ट २०२०...... १६

सप्टेंबर २०२० ........२९

ऑक्टोबर २०२० ........३५

नोव्हेंबर २०२०...........४७

डिसेंबर २०२०..........४९

जानेवारी २०२१..........४६

फेब्रुवारी २०२१......... ५०

मार्च २०२१.......... ४०

loading image