esakal | दूषित पाण्याची थेट पोलिसांकडे तक्रार, प्रशासक पांडेय यांच्या विरोधात कारवाईची मागणी

बोलून बातमी शोधा

आस्तिककुमार पांडेय
दूषित पाण्याची थेट पोलिसांकडे तक्रार, प्रशासक पांडेय यांच्या विरोधात कारवाईची मागणी
sakal_logo
By
माधव इतबारे

औरंगाबाद : अनेक महिन्यांपासून नळाला दूषित पाणी (Polluted Water) येत असल्याने व महापालिका (Aurangabad Municipal Corporation) दखल घेत नसल्याने पहाडसिंगपुरा भागातील नागरिकांनी थेट पोलिस ठाणे गाठून महापालिकेचे प्रशासक आस्तिककुमार पांडेय (Astikkumar Pandey) व अधिकाऱ्यांच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे. या सर्वांच्या विरोधात कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी बेगमपुरा पोलिस ठाण्यात (Begumpura Police Station) दिलेल्या तक्रारीत करण्यात आली आहे. शहरात गेल्या काही दिवसांपासून नळाला दूषित पाणी येण्याचे प्रकार वाढले आहेत. याबाबत नागरिक महापालिकेकडे तक्रारी करत आहेत. वारंवार तक्रारी करूनही महापालिका प्रशासन दखल घेत नसल्याने नागरिकांवर पोलिस ठाणे गाठण्याची वेळ आली आहे.

हेही वाचा: पहिलीत शिकणाऱ्या चिमुरड्याचा सर्पदंशाने जागीच मृत्यू

मंगळवारी (ता.चार) पहाडसिंगपुरा भागातील नागराज गायकवाड व अन्य नागरिकांनी बेगमपुरा पोलिस ठाण्यात निरीक्षकांची भेट घेऊन निवेदन दिले. त्यात पहाडसिंगपुरा भागात अनेक महिन्यांपासून नळाला दुर्गंधीयुक्त पाणी येत आहे. याबाबत अनेकवेळा पाणी पुरवठा विभागाच्या कर्मचाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिली, मात्र दखल घेतली नाही. २२ एप्रिलला प्रशासकांना व्हॉटस्अपच्या माध्यमातून तक्रार केली, त्यांनीही दखल घेतली नाही. कोरोनाची सर्वत्र दहशत असताना नागरिकांना महापालिकेच्या दुर्लक्षामुळे दुर्गंधीयुक्त पाणी प्यावे लागत आहे. या प्रकरणी दखल घेऊन प्रशासकांसह संबंधित अधिकाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. निवेदनावर नागराज गायकवाड यांच्यासह धनराज सलामपुरे, प्रमोद मोरे, संतोष भिंगारे, मनोज भिंगारे, अनिता सलामपुरे, ज्योती सलामपुरे, करिश्मा सलामपुरे, कैलास सलामपुरे, रेखा सलामपुरे, उमा सलामपुरे, उमा मुंगसे, अशोक भिंगारे यांची नावे आहेत.