औरंगाबाद : जुन्या पाणी योजनेसाठी १९३ कोटींचा प्रस्ताव | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

water supply

औरंगाबाद : जुन्या पाणी योजनेसाठी १९३ कोटींचा प्रस्ताव

औरंगाबाद : शहराच्या १६८० कोटी रुपयांच्या पाणीपुरवठा योजनेचे काम कासवगतीने सुरू असताना आता जुन्या ५६ एमएलडी पाणीपुरवठा योजनेचे नूतनीकरण करण्यासाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने १९३ कोटी रुपयांचा प्रस्ताव तयार केला आहे. सध्या या प्रस्तावाची छाननी जीवन प्राधिकरणाच्या सेंट्रल प्लॅनिंग अँड डिझाइन ऑथॅरिटीच्या माध्यमातून सुरू आहे. छाननी पूर्ण झाल्यानंतर महापालिकेच्या माध्यमातून प्रस्ताव राज्य शासनाला सादर केला जाणार आहे.

शहराला पाणीपुरवठा दोन्ही योजना जीर्ण झाल्या आहेत. पहिली योजना १९७५ मध्ये झाली तर दुसरी योजना १९९१ मध्ये कार्यान्वित करण्यात आली. जुन्या योजनेची क्षमता ५६ एमएलडी असून, ४५ वर्षांपूर्वीची ही योजना सध्या सलाईनवर आहे. नव्या १६८० कोटी रुपयांच्या पाणीपुरवठा योजनेचे काम सध्या कासवगतीने सुरू आहे. त्यामुळे ही योजना पूर्ण होण्यास मोठा अवधी लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे या काळात नागरिकांना पाणी कसे द्यायचे असा प्रशासनासमोर प्रश्‍न आहे. त्यामुळे ५६ एमएलडी योजनेचे पाइप बदलण्यासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतलेल्या बैठकीत अधिकाऱ्यांनी प्रस्ताव दिला होता.

दरम्यान आठ जूनला विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांच्याशी मुख्यमंत्र्यांनी चर्चा केली. त्यावर मुख्यमंत्र्यांनी निधी देण्याचे आश्‍वासन दिले. सध्या महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने १९३ कोटींचा प्रस्ताव तयार केला आहे. हा प्रस्ताव सेंट्रल प्लॅनिंग अँड डिझाइन ऑथॅरिटीकडे पाठवला जाणार आहे. ऑथॅरिटीकडून या प्रस्तावाची छाननी केली जाणार आहे. छाननीच्या दरम्यान सुचवण्यात आलेल्या सुधारणांची पूर्तता करून अंतिम प्रस्ताव तांत्रिक मान्यतेसह महापालिकेकडे पाठवला जाणार आहे. महापालिकेच्या माध्यमातून तो राज्य शासनाला सादर केला जाईल, असे सूत्रांनी सांगितले.

८० एमएलडीपर्यंत वाढविणार क्षमता

जुन्या पाणीपुरवठा योजनेच्या बाजूनेच नवी पाइपलाइन टाकण्याचा प्रशासनाचा प्रस्ताव आहे. त्यामुळे औरंगाबाद शहरासाठी काही काळ काही ठिकाणी चार पाइपलाइन होतील. ५६ एमएलडीच्या समांतर नवी ८० एमएलडीची पाइपलाइन टाकली जाईल. तसेच जुनी १०० एमएलडी पाइपलाइन असेल. त्यासोबतच १६८० कोटी रुपयांच्या पाणीपुरवठा योजनेची पाइपलाइन असेल. त्यासोबतच जायकवाडी व फोराळा येथील पंपहाऊसमधील पंप बदलून त्या ठिकाणी नवीन पंप बसवले जाणार आहेत.

Web Title: Aurangabad Maharashtra Jeevan Pradhikaran 193 Crore Proposal For Water Scheme

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..