औरंगाबाद : परवान्याविना वाहन विमा असून नसल्यासारखाच! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Motor Insurance Policy Claims

औरंगाबाद : परवान्याविना वाहन विमा असून नसल्यासारखाच!

औरंगाबाद - वाहनासाठी जसा विमा (मोटार इन्शुरन्स) महत्वाचा आहे, तसाच विम्यासाठी आणि वाहनासाठीही वाहन चालवण्याचा परवाना आवश्यक आहे. तुमच्याकडे वाहनाचा विमा आहे, आणि जर वाहन परवाना नसेल तर विमा असून नसल्यासारखा आहे. वाहनाचा विमा आणि वाहन चालवण्याचा सक्षम परवाना या दोन्ही बाबी पूरक तसेच कायदेशीरही आहेत. विनापरवाना वाहन चालवले तर दंड होऊ शकतो, मात्र दंडापेक्षाही परवाना नसेल आणि अपघात झाला तर आयुष्य उध्वस्तही होऊ शकते याचे भान ठेवणे आवश्यक आहे.

वाहनधारक किंवा वाहन चालविणारा व्यक्ती हा वाहन चालविण्यास योग्य आहे. तसेच त्याने तसे प्रशिक्षण घेतलेले आहे, हे वाहन चालक परवाना सुनिश्चित करते. वाहन अधिनियम १९८८ अन्वये सार्वजनिक ठिकाणी वाहन चालविण्यासाठी वाहन परवाना (लायसेन्स) अनिवार्य असते. वाहन परवान्याचे तब्बल २४ विविध प्रकार आहेत.

काय होऊ शकते?

विनापरवाना वाहन चालविणाऱ्यास नविन मोटार वाहन कायद्यानुसार ५०० रुपयांऐवजी पाच हजार रुपये दंडाची तरतूद आहे. हा दंड तब्बल १० पट वाढविण्यात आला आहे. विनापरवाना वाहन पकडले तर दंड भरुन सुटका होऊ शकते, मात्र वाहन परवाना नसताना तुमच्याकडून अपघात झाला तर मात्र मनस्तापाशिवाय काहीही पर्याय नाही. अपघात किरकोळ असेल तर वाहनाचे नुकसान भरून कदाचित सुटका होईल, मात्र अपघातात कुणाचा मृत्यू झाला तर वसुलीच्या दाव्याला सामोरे जावे लागते.

विमा क्लेम नाकारला जातो

वाहन चालकाकडे वैध वाहन परवाना असणे ही विमा मिळवण्यासाठीची प्रमुख अट आहे. वाहन परवाना नसेल तर कदाचित विमा पॉलिसी मिळेल पण क्लेम देण्याची वेळ आल्यानंतर विमा कंपनी वैध परवाना नसल्याचे कारण देत हात वर करणार हे निश्चित आहे.

वाहन चालवणाऱ्याकडे वैध आणि सक्षम वाहन परवाना आवश्यक आहे. विनापरवाना वाहन चालवणे कायदेशीर गुन्हा ठरतो तसेच विम्याचा क्लेमही नाकारला जातो. त्यामुळे अपघात न्यायधिकरणाने ठरवलेली दाव्याची लाखोंची रक्कम वाहन चालकाला स्वतः भरावी लागू शकते.

-अरुण बेलवंकी, संकेत मोटार्स

Web Title: Aurangabad Motor Insurance Policy Claims Loss Driving License

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top