
औरंगाबाद : महापालिकेच्या CBSE शाळेसाठी पालकांच्या उड्या
औरंगाबाद : महापालिकेच्या सीबीएसई अभ्यासक्रमाच्या शाळांना पालकांनी प्रतिसाद दिला असून, पहिल्याच दिवसी ३९० विद्यार्थ्यांची नोंदणी झाली आहे. महापालिकेने गतवर्षी सीबीएसई अभ्यासक्रमाच्या दोन तर यंदा तीन शाळा सुरू केल्या आहेत. महापालिकेतर्फे गतवर्षी उस्मानपुरा व गारखेड्यात सीबीएसई अभ्यासक्रमाच्या शाळा सुरू करण्यात आल्या होत्या. इतर शाळांच्या भरमसाठ शुल्काचा विचार करता पालकांनी या दोन्ही शाळांना प्रतिसाद दिला. त्यामुळे चालू शैक्षणिक वर्षापासून आणखी तीन शाळा सुरू करण्याच्या सूचना प्रशासक आस्तिककुमार पांडेय यांनी शिक्षण विभागाला केल्या होत्या.
त्यानुसार प्रियदर्शनी मयुरबन कॉलनी, सिडको एन-७ व चेलीपुरा येथे सीबीएसई अभ्यासक्रमाच्या शाळा सुरू करण्यात आल्या आहेत. याठिकाणी ज्युनिअर केजी व सिनियर केजी तसेच उस्मानपुरा व गारखेडा येथील शाळांमध्ये फक्त ज्युनिअर केजीला सोमवारी प्रवेशासाठी विद्यार्थ्यांची नोंदणी करण्यात आली. २०० जागांसाठी ३९० विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे.
नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांनी मंगळवारी कागदपत्रांची पूर्तता करून अर्ज दाखल करायचा आहे. त्यानंतर अर्जांची छाननी केली जाणार आहे. गारखेडा, उस्मानपुरा येथे ज्युनिअर केजीसाठी प्रत्येकी २५ विद्यार्थी, प्रियदर्शनी, सिडको एन-७, चेलिपुरा येथे प्रत्येकी २५ विद्यार्थ्यांची निवड करण्यात येणार आहे. ही निवड प्रक्रिया विभाग प्रमुख तथा उपायुक्त नंदा गायकवाड, शिक्षणाधिकारी रामनाथ थोरे, सांस्कृतिक अधिकारी संजीव सोनार, समन्वयक शशिकांत उबाळे, समग्र शिक्षा अभियानाचे कार्यक्रम अधिकारी ज्ञानदेव सांगळे यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात येणार आहे, असे शिक्षणाधिकारी रामनाथ थोरे यांनी सांगितले.
Web Title: Aurangabad Municipal Corporation Cbse School 390 Student Registration
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..