औरंगाबाद महापालिकेतच हवी नोकरी... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Aurangabad Municipal Corporation

औरंगाबाद महापालिकेतच हवी नोकरी...

औरंगाबाद - महापालिकेच्या शिक्षण विभागात आम्हाला सामावून घ्यावे म्हणून राज्यभरातील तब्बल ८३ शिक्षकांनी अर्ज केले आहेत. याउलट वर्षभरात फक्त तीन शिक्षक औरंगाबादेत महापालिकेची नोकरी सोडून इतरत्र गेले आहेत. औरंगाबाद महापालिकेच्या शिक्षण विभागात काम करण्यासाठी एवढी मागणी कशासाठी, असा प्रश्‍न उपस्थित केला जात आहे.

महापालिकेतर्फे शहरात मराठी व उर्दू माध्यमाच्या अनुक्रमे ४६ व १७ शाळा चालविल्या जातात. त्यासोबतच सीबीएसई अभ्यासक्रमाच्या पाच शाळा सुरू करण्यात आल्या आहेत. या शाळेत १९ हजार ८६१ मुले शिक्षण घेतात. मराठी माध्यमासाठी शिक्षकांची ३०६ तर उर्दू माध्यमासाठी १४९ पदे मंजूर आहेत. यातील ३६ पदे रिक्त आहेत. या रिक्त पदांवर इतर जिल्ह्यांतून आलेल्या शिक्षकांना सामावून घेतले जाते.

त्यासाठी तब्बल ८३ अर्ज आल्याचे प्रभारी शिक्षणाधिकारी संजीव सोनार यांनी सांगितले. त्यात डोंबिवली, मालेगाव, अमरावती, पालघर, भिवंडी, पिंपरी-चिंचवड, रत्नागिरी आदी भागांतून आलेल्या अर्जांचा समावेश आहे. महापालिकेत ३६ पदे रिक्त असली तरी राज्य शासनाकडून उर्दू माध्यमासाठी पाच शिक्षक पोर्टलच्या माध्यमातून पाठविले जाणार आहेत.

बिंदू नामावलीचा अडसर

शिक्षकांच्या पदस्थापनेसंदर्भात बिंदू नामावली तयार नसल्याने हे शिक्षक अद्याप वेटिंगवर आहेत. बिंदू नामावलीसाठी अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात आली होती; पण संबंधित अधिकाऱ्याने आयुक्तांच्या नावाने आदेश नसल्याचा मुद्दा उपस्थित केला. आयुक्तांच्या नावाने पत्र दिल्यानंतर काम सुरू करण्यात येईल, असे संबंधित अधिकाऱ्याचे म्हणणे होते. बिंदू नामावलीनंतर काही शिक्षकांना नियुक्ती मिळू शकते, असे सोनार यांनी नमूद केले.

Web Title: Aurangabad Municipal Corporation Education Department Job Teachers Proposals

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..