Aurangabad : आता महापालिकेत साहेब नवे, धोरण नवे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Aurangabad Municipal Corporation

Aurangabad : आता महापालिकेत साहेब नवे, धोरण नवे

औरंगाबाद : महापालिकेच्यावतीने मध्यवर्ती जकात नाक येथे सुरू केलेल्या पेट्रोल पंपाला चांगला प्रतिसाद मिळत असल्याने महापालिकेला एक शाश्‍वत उत्पन्नाचा स्त्रोत तयार झाला. यामुळे आणखी चार नवीन पेट्रोलपंप सुरु करण्याचे प्रशासनाने नियोजन केले. मात्र, तत्कालीन प्रशासकांची बदली झाली आणि नवीन प्रशासक रुजू झाले आहेत. आता महापालिकेत नवे साहेब आल्याने याबाबत पूर्वीचेच नियोजन कायम राहील किंवा नवीन धोरण ठरवले जाईल असा प्रश्‍न निर्माण झाला असून हे नवीन पंप सुरू होतील की कागदावरच राहतील याबाबत चर्चा आहे.

तत्कालीन प्रशासक आस्तिककुमार पांडेय यांनी उत्पन्नाचे स्त्रोत वाढवण्याच्या दृष्टीने महापालिकेचे स्वत:चे पेट्रोलपंप सुरु करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार शहरात पाच पेट्रोल पंप सुरू करण्याचे नियोजन पांडेय यांच्या मार्गदर्शनात करण्यात आले. पहिला पेट्रोलपंप मध्यवर्ती जकात नाक्याजवळ सुरू झाला. त्यानंतर आणखी चार पेट्रोलपंप सुरु करण्याचे प्रयत्न सुरू झाले. याबाबत एचपीसीएल पेट्रोलियम कंपनी प्रतिनिधींसोबत स्थळ पाहणी झाली. त्यानुसार हर्सूल-सावंगी जवळ महापालिकेच्या टोल नाक्याची जागा, तसेच कांचनवाडी भागातही महापालिका कर्मचारी निवासस्थानांच्या परिसरात देखील पेट्रोलपंप सुरु केला जाणार आहे. त्यासाठी कर्मचाऱ्यांची काही निवासस्थाने पाडली.

येथेही लवकरच पेट्रोल पंप सुरू केला जाणार आहे. नवीन वर्षांत सुरूवातीला हे दोन्ही पेट्रोल पंप शहरवासीयांच्या सेवेत दाखल होतील, अशी माहिती ८ डिसेंबर २०२१ रोजी उपायुक्त अपर्णा थेटे यांनी दिली होती. मात्र, आठ महिने उलटले तरी अद्याप चारपैकी एकही पंप सुरू झालेला नाही. आता प्रशासक बदलल्यामुळे हे पंप कागदावरच राहण्याची शक्यता देखील निर्माण झाली आहे.

महापालिकेच्या वाहनांना इंधन कंपनीच्या दरात

पेट्रोलपंप सुरू करणाऱ्या कंपन्यांकडून महापालिकेला जागेचे भाडे दिले जाणार आहे. महापालिकेच्या वाहनांना कंपनीच्या दरात पेट्रोल आणि डिझेल देखील दिले जाणार आहे. सर्वसामान्य नागरिकांना मात्र व्यावसायिक दराने इंधनाची विक्री केली जाणार आहे. त्यातून मिळणारा नफा महापालिकेच्या खात्यात जमा केला जाणार आहे. एका प्रकारे हा प्रकल्प महापालिकेच्या उत्पन्नात भर घालणारा आहे. मात्र, अधिकाऱ्यांच्या वेळकाढूपणामुळे पंपांचा प्रयोग अर्ध्यावरच थांबल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.

Web Title: Aurangabad Municipal Corporation New Policy Petrol Pumps

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..