
औरंगाबाद : मुख्य लाइनवरील १८५५ नळ बेकायदा
औरंगाबाद : शहरातील टाक्या भरण्यासाठी असलेल्या मुख्य पाइपलाइनवरील बेकायदा नळ शोधून ते तोडण्याची कारवाई करण्याचे आदेश विभागीय आयुक्तांनी महापालिका अधिकाऱ्यांना दिले आहेत. त्यानुसार प्रभागनिहाय सर्वेक्षण करण्यात आले असता १६६३ ते १८५५ बेकायदा नळ मुख्य लाइनवर असल्याचे समोर आले आहे. मंगळवारपासून हे बेकायदा नळ तोडण्यासाठी मोहीम सुरू केली जाणार असून, संबंधितांवर थेट गुन्हे दाखल करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांना शहरातील पाणीप्रश्न सोडविण्यासाठी लक्ष घालण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार ते वारंवार बैठका घेऊन महापालिका अधिकाऱ्यांना सूचना करत आहेत. शहरात सध्या ३१ टाक्यांवरून पाण्याचे वितरण केले जाते; पण टाक्या भरण्यासाठी असलेल्या मुख्य पाइपलाइनवर नागरिक, व्यावसायिकांनी मोठ्या संख्येने बेकायदा नळ घेतले आहेत. त्यामुळे टाक्या भरत नसल्याचे समोर आले. विशेष म्हणजे बेकायदा नळ घेणाऱ्यांना २४ तास पाणी मिळत होते.
अशा बेकायदा नळांचा शोध घेऊन त्यावर कारवाई करण्याचे आदेश श्री. केंद्रेकर यांनी दिले आहेत. त्यानंतर महापालिकेने नऊ प्रभागांत मुख्य पाइपलाइनवरील बेकायदा नळांचा शोध घेतला व १६६३ ते १८५५ बेकायदा नळ मुख्य लाइनवर असल्याचा अहवाल पाणीपुरवठा विभागाचे उपायुक्त संतोष टेंगळे यांच्याकडे सादर करण्यात आला आहे. यासंदर्भात श्री. टेंगळे यांनी सांगितले की, मुख्य पाइपलाइनवरील बेकायदा नळ तोडून संबंधितांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. बेकायदा नळ तोडण्यासाठी विरोध होत असल्याने पोलिस बंदोबस्तासाठी मागणी करण्यात आली आहे. मंगळवारपासून बंदोबस्त मिळण्याची शक्यता असून, त्यानंतर कारवाई सुरू होणार आहे.
बेकायदा नळांची आकडेवारी
गांधीनगर, रविवार बाजार ते विद्यापीठ जलकुंभ लक्ष्मी कॉलनी- ११६ ते १४९
प्रभाग क्रमांक तीन-३३२
प्रभाग क्रमांक चार-१७४
प्रभाग क्रमांक पाच-७६
रामनगर ते हॉटेल दीपाली रस्ता-१८८ ते २३०
हनुमाननगर ते शिवाजीनगर-२२३ ते २५५
गजानन महाराज मंदिर ते मल्हार चौक- ४५० ते ५४०
राहुलनगर ते गुलशन अपार्टमेंट-९९ ते ११४