
आरंगाबाद- महापालिका निवडणुकीच्या तोंडावर शहराचे संभाजीनगर नामकरण करण्याच्या विषयावरून राजकारण चांगलेच तापले आहे. शिवसेनेची कोंडी करण्यासाठी ऐरणीवर घेतलेला हा विषय भाजपच्या अंगलट येण्याची शक्यता आहे. धार्मिक तेढ निर्माण करणे हा भाजपचा अजेंडाच आहे. विकासाचे मुद्दे सोडून संभाजीनगरचा वादग्रस्त विषय कशाला आणता? दिल्लीच्या पराभवानंतर तरी जमिनीवर या, तुमचा मुख्यमंत्री असताना हा विषय का आणला नाही? या अशा शब्दांत शिवसेना व एमआयएम पक्षाने एकत्र येत मंगळवारी (ता. १८) सर्वसाधारण सभेत भाजपची कोंडी केली. छत्रपती संभाजी महाराज व औरंगजेबाचा विषय उपस्थित करून भाजप नगरसेवकांनी तणाव वाढविण्याचा प्रयत्न केला; मात्र त्यात त्यांना यश आले नाही.
महापालिकेची सर्वसाधारण सभा सुरू होताच भाजपचे राजू शिंदे, राज वानखेडे, मनीषा मुंडे, माधुरी अदवंत यांच्यासह इतर नगरसेवकांनी नामकरणाच्या विषयावर महापौरांना स्मरणपत्र दिले. त्यावर महापौरांनी तुमची भूमिका स्पष्ट करा, असे सांगत विषयाला फोडणी दिली. राज वानखेडे यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे शहराचे नामकरण करण्याचे स्वप्न होते. त्यांचे पुत्र उद्धव ठाकरे आता मुख्यमंत्री झाले आहेत. त्यामुळे नामकरणाचा विषय तातडीने मार्गी लावावा, अशी भाजपची मागणी आहे, असे नमूद केले. त्यावर एमआयएम नगरसेवक खवळले. शहरात पाणी, कचरा, रस्ते यासह विकासाचे अनेक मुद्दे आहेत. हे प्रश्न सोडविण्याऐवजी वादाचे विषय कशाला आणता, असा प्रश्न जमीर कादरी, विकास एडके, अब्दुल नाईकवाडी, अयुब जागीरदार, जफर बिल्डर, अबुलाला हाश्मी यांनी केला. महापालिका निवडणूक तोंडावर आल्यामुळे संभाजीनगरची तुम्हाला आठवण झाली का? धार्मिक तेढ निर्माण करून स्वतःची पोळी भाजून घेण्याचा भाजपचा अजेंडा आहे. दिल्लीत तुमची ही खेळी चालली नाही. तोंडावर पडलात.
आतातरी जमिनीवर या, अशी टोलेबाजी एमआयएम नगरसेवकांनी भाजपवर केली. पाच वर्षे भाजपचा मुख्यमंत्री होता, तेव्हा तुम्हाला या विषयाची आठवण का झाली नाही? अशी विचारणा नगरसेवकांनी केली. त्यावर राजू शिंदे यांनी राज्यात युतीचे सरकर होते तेव्हा जनतेला नामकरण होईल, यावर विश्वास होता, मात्र आता तुम्ही काँग्रेससोबत गेलात, त्यामुळे आम्हाला आठवण करून द्यावी लागत असल्याचे नमूद केले. एमआयएम व भाजपच्या नगरसेवकांमध्ये खडाजंगी सुरू असताना, शिवसेना नगरसेवक पदाधिकारी मात्र मजा घेत हाते. भाजपची कोंडी होत असल्याचे लक्षात आल्यानंतर राजू शिंदे यांनी ज्या औरंजेबाने छत्रपती संभाजीराजेंना हालहाल करून मारले, त्याच्याविषयी एवढा पुळका का? कोणत्या मुस्लिम घरात औरंगजेब नाव ठेवले जाते ते सांगा? असे वक्तव्य केले. त्यावर पुन्हा खडाजंगी झाली.
दरम्यान, महापौर नंदकुमार घोडेले यांच्यासह गजानन बारवाल व इतरांनी हा विषय सर्वोच्च न्यायालयापर्यंत गेलेला आहे, त्यामुळे इथे चर्चा करण्याची गरज नाही, अशी भूमिका घेतली. त्यानंतर महापौर म्हणाले, की शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासोबत सरकार स्थापन केले असले तरी, संभाजीनगरचा विषय सोडलेला नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यासंदर्भात निर्णय घेतील, माझी स्मरणशक्ती चांगली आहे, त्यामुळे वारंवार हा विषय काढण्याची गरज नाही, असा टोला भाजपला लगावला. राजू वैद्य यांनी मी सभापती असताना तत्कालीन मुख्यमंत्र्यांकडे नामांतराचा प्रस्ताव दिला होता, त्यांनी निर्णय घेतला नाही. मात्र नामकरणासाठी शिवसेना कटीबद्ध असल्याचा दावा केला.
शिवजयंतीनिमित्त महिला सुरक्षेसाठी बनवले अॅप
पक्ष बदलताच भूमिका बदलली
उपमहापौर राजेंद्र जंजाळ यांनी भाजपचे गटनेते प्रमोद राठोड यांना टार्गेट केले. २०११ मध्ये संभाजीनगर नामकरणाचा ठराव घेण्यात आला, त्यावेळी काँग्रसेमध्ये असलेले प्रमोद राठोड शांत बसून होते. आता भाजपमध्ये गेल्यानंतर त्यांना संभाजीनगरची आठवण झाली आहे. शिवसेनेचे तत्कालीन खासदार चंद्रकांत खैरे यांनी संसदेपासून ते तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे वारंवार हा मुद्दा मांडला. पाच वर्षे फडणवीस यांनी निर्णय का घेतला नाही, अशा प्रश्न जंजाळ यांनी केला.
वाघाने शेळीसोबत मैत्री का केली?
संभाजीनगर विषयाला एमआयएमचे नगरसेवक विरोध करत असताना शिवसेना ऐकून घेतेच कसे? वाघाने शेळीसोबत (काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस) मैत्री केल्यास असेच होणार अशी टीका राजू शिंदे यांनी केली. त्यावर अंकिता विधाते यांनी आक्षेप घेतला.
केजरीवालांचे अभिनंदन
शिवसेनेच्या नगरसेविका सीमा खरात यांनी दिल्लीत आम आदमी पार्टीने विजय मिळविल्याबद्दल मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या अभिनंदनाचा प्रस्ताव मांडला. तो भाजपच्या नगरसेवकांना चांगलाच झोंबला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.