esakal | का घातली मुख्य रस्त्यावर हातगाड्यांना बंदी...
sakal

बोलून बातमी शोधा

Aurangabad amc news

हॉकर्स झोनचा निर्णय अंतिम होईपर्यंत पार्किंगच्या जागांचा वापर हॉकर्स झोन म्हणून केला जाणार असल्याचे महापालिका आयुक्त आस्तिककुमार पांडेय यांनी मंगळवारी (ता. तीन) सांगितले.

का घातली मुख्य रस्त्यावर हातगाड्यांना बंदी...

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

औरंगाबाद-शहरातील मुख्य रस्त्यांवर हातगाड्या लावण्यास बंदी घातली जाणार आहे. हॉकर्स झोनचा निर्णय अंतिम होईपर्यंत पार्किंगच्या जागांचा वापर हॉकर्स झोन म्हणून केला जाणार असल्याचे महापालिका आयुक्त आस्तिककुमार पांडेय यांनी मंगळवारी (ता. तीन) सांगितले. 

गुलमंडी, कुंभारवाडा भागात रस्त्यावरील अतिक्रमण हटविल्यानंतर पैठणगेट येथे वाहतूक पोलिस शाखेच्या कार्यालयात व्यापारी महासंघाच्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत पोलिस आयुक्त चिरंजीव प्रसाद, महापालिका आयुक्त आस्तिककुमार पांडेय यांची बैठक झाली. यावेळी हागाड्याच्या विषयावर खल करण्यात आला. हातगाड्यांमुळे जे व्यापारी गाळे विकत घेऊन किंवा भाड्याने घेऊन व्यवसाय करतात, त्यांच्यावर परिणाम होत आहे. त्याचबरोबर शहराच्या अनेक भागात वाहतुकीचा खोळंबादेखील होतो. त्यामुळे मुख्य रस्त्यावर हातगाड्यांना बंदी घालण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे महापालिका आयुक्तांनी बैठकीनंतर पत्रकारांना सांगितले. ते पुढे म्हणाले, ‘‘महापालिकेतर्फे हॉकर्स झोन निश्‍चित केले जातील; मात्र तोपर्यंत मुख्य बाजारपेठेलगच्या पार्किंगच्या जागा गातगाडीचालकांना दिल्या जातील किंवा त्यांना गल्ली बोळात थांबण्यास हरकत नाही.’’ 

हेही वाचा - इच्छुकांच्या गर्दीने एमआयएमचे नेते टेन्शन मध्ये...आता कुणाला द्यावे तिकीट
 
पैठणगेटवर जेसीबी राहणार तैनात 
अनेक व्यापारी आपली दुकाने पाच ते दहा फूट रस्त्यावर मांडतात. त्यांचाही बंदोबस्त केला जाणार आहे. वाहतूक शाखेच्या अधिकाऱ्यांसोबत महापालिका अधिकाऱ्यांचे पथक दिले जाणार आहे. हे पथक संयुक्तपणे रोज पाहणी करेल. कोणी रस्त्यावर अतिक्रमण केले तर संबंधितावर दंडात्मक कारवाई केली जाईल. त्यानंतर जेसीबीने अतिक्रमण हटविले जाईल. त्यासाठी एक जेसीबी पैठणगेटवर तैनात ठेवला जाणार आहे, असे आयुक्तांनी सांगितले. 
 
व्यापारी महासंघ करणार पार्किंगच्या जागा विकसित 
मुख्य बाजारपेठेत खरेदी करण्यासाठी येणाऱ्या नागरिकांना पार्किंगच्या प्रश्‍नाला तोंड द्यावे लागते. अनेक जण रस्त्यावर वाहने लावून खरेदीसाठी जातात. त्यामुळे व्यापारी महासंघाने दोन ठिकाणी पार्किंग विकसित करून महापालिकेला सहकार्य करण्याचे आश्‍वासन दिले आहे. त्यात पैठणगेट येथील जागेवर बहुमजली इमारत उभारण्याचा प्रस्ताव असून, अन्य जागेचा शोध घेतला जाईल. हॉकर्स झोनसाठी औरंगपुरा येथील जिल्हा परिषदेचे मैदान पर्याय असल्याची सूचना आम्ही केली असल्याचे व्यापारी महासंघाचे अध्यक्ष जगन्नाथ काळे यांनी सांगितले. 
 
सर्वांच्या सोयीनुसार कारवाई 
व्यापाऱ्यांसोबत पैठणगेट येथे छोटेखानी बैठक घेण्यात आली. त्यानंतर पोलिस आयुक्त चिरंजीव प्रसाद म्हणाले, ‘‘व्यापाऱ्यांच्या अडचणी जाणून घेतल्या आहेत. अधिकाऱ्यांची बैठक घेऊन योग्य तो निर्णय घेतला जाईल.’’

हेही वाचा -  अमित शहा यांचा राजीनामा घ्या पण का...

loading image