
औरंगाबाद : तरुणीच्या खून प्रकरणाचा तपास विशेष पथकाकडे
औरंगाबाद : देवगिरी महाविद्यालय परिसरात एकतर्फी प्रेमातून सुखप्रित कौर ग्रंथी या विद्यार्थिनीचा आरोपी शरणसिंग सेठी याने निर्घृण खून केला. या खुनाच्या गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिस आयुक्तांनी तपास विशेष पथकाकडे वर्ग केला आहे. दोन पोलिस निरीक्षक, दोन उपनिरीक्षक आणि दोन कर्मचाऱ्यांचे हे विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन केले आहे.
गुन्हे शाखेचे वरिष्ठ निरीक्षक अविनाश आघाव हे मुख्य तपास अधिकारी असून सायबर ठाण्याचे निरीक्षक गौतम पातारे, गुन्हे शाखेचे उपनिरीक्षक अजित दगडखैर, वेदांतनगरचे उपनिरीक्षक उत्तरेश्वर मुंडे हे सहायक तपास अधिकारी राहणार आहेत.
जमादार सुनील बडगुजर आणि पोलिस नाईक विरेश बने हे मदतनीस म्हणून काम पहतील असे आदेश उपायुक्त अपर्णा गिते यांनी दिले आहेत. सुरुवातीला या गुन्ह्याचा तपास वेदांतनगरचे निरीक्षक सचिन सानप यांच्याकडे होता. या गुन्ह्याचे सर्व कागदपत्र तत्काळ तपास पथकाकडे वर्ग करून तसा अहवाल सादर करण्याचे आदेश अपर्णा गिते यांनी दिले आहेत. मृत सुखप्रित कौर ग्रंथी आणि आरोपी शरणसिंग सेठी हे एकमेकांच्या ओळखीचे होते. शरणसिंग हा सुखप्रतिला त्रास देत असल्याची माहिती मिळाल्यावर सुखप्रितच्या वडील व भावाने त्याला समजावून सांगितले होते, परंतु सुखप्रित कॉलेजला गेल्यावर मित्रांना बोलते आणि मला टाळते, याचा शरणसिंग याला राग आला. त्याने २१ मे रोजी देवगिरी महाविद्यालय परिसरात सुखप्रितला ओढत बाजुला नेत, तिच्या गळ्यावर कृपाणने वार केले. पोलिसांनी त्याला लासलगाव येथे अटक केली. सध्या आरोपी शरणसिंग हा पोलिस कोठडीत आहे.
सुनावणी फास्ट ट्रॅक घ्या
औरंगाबाद देवगिरी महाविद्यालयातील विद्यार्थिनी सुखप्रीत कौर ग्रंथी हिच्या मारेकऱ्याला लवकर शिक्षा व्हावी, यासाठी प्रकरणाची सुनावणी फास्ट ट्रॅक न्यायालयात घ्यावी, अशी मागणी बुधवारी गुरुद्वारा श्री गुरु सिंग सभेतर्फे जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली.
प्रकरणात गुरुद्वारा श्री गुरु सिंग सभेच्या शिष्टमंडळाने बुधवारी जिल्हाधिकारी चव्हाण यांची भेट घेतली. यावेळी देण्यात आलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे, शहरात खुनाच्या घटना वाढल्याने कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. कायद्याचा धाक निर्माण व्हावा, तसेच अशा घटना पुन्हा घडू नयेत, यासाठी मुलींच्या सुरक्षेसाठी विशेष समिती स्थापन करावी. त्यासोबतच दामिनी पथकाच्या गस्त वाढवाव्यात, महाविद्यालय परिसरातील कॅफेवर लक्ष ठेवावे, अशी मागणी करण्यात आली आहे. यावेळी गुरुद्वारा श्री गुरु सिंग सभेचे अध्यक्ष हरविंदर सिंग बिंद्रा, उपाध्यक्ष जसपाल सिंग ओबेरॉय, सचिव कुलदीप सिंग नीर, गुरुतेक बहाद्दुर शाळेचे सचिव नवीन ओबेरॉय यांच्यासह समितीचे सभासद उपस्थित होते.
ती ओरडत होती; पण कुणी पुढे आले नाही
यावेळी मृत तरुणीचे वडील ग्रंथी प्रीतपाल सिंग उपस्थित होते. शहरवासीयांत संवेदना उरल्या नाहीत. माझी मुलगी ओरडत असतानाही कोणीच तिला वाचविण्यासाठी पुढे आले नाही, अशी खंत त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांपुढे व्यक्त केली.
Web Title: Aurangabad Murder Case Special Squad To Investicate
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..