Aurangabad murder case : पत्नीने काढला पतीचा काटा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

 murder case

Aurangabad murder case : पत्नीने काढला पतीचा काटा

किल्लारी : अनैतिक संबंधात अडथळा ठरणाऱ्या पतीचा प्रियकराच्या मदतीने पत्नीनेच काटा काढल्याची घटना बुधवारी (ता. दोन) निदर्शनास आली. पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार तपसे चिंचोली (ता.औसा) येथील एका विवाहितेचे तिच्या मामाच्या मुलाशी अनैतिक संबंध होते. या संबंधात अडथळा ठरणाऱ्या भोळसर पतीचा प्रियकराच्या मदतीने काटा काढण्याचा कट त्यांनी रचला.

त्यांनी इतर दोघांना सोबत घेऊन गाडवेवाडी शिवारात नेऊन त्याचा गळा दाबून खून केला. जिल्हा पोलिस अधीक्षक सोमय मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलिस अधिकारी मधुकर पवार, सहायक निरीक्षक सुनील गायकवाड, उपनिरीक्षक राजपूत यांनी घटनास्थळाला पंचनामा केला.

कुमार बळिराम बलसुरे (रा. तपसे चिंचोली, ता. औसा) यांच्या मृत्यू प्रकरणी आज दुपारी पोलिसांत नोंद झाली. अकस्मात मृत्यू म्हणून नोंद केल्यावर दोन तासांत तपास करून किल्लारी पोलिसांनी गुन्ह्याचा उलगडा केला. सुनील गायकवाड, बिट जमादार सचिन उस्तुर्गे, गुबाळचे बीट जमादार मर्डे, आबासाहेब इंगळे यांनी परिसरामध्ये सखोल चौकशी संबंधित संशयिताला ताब्यात घेतल. मृताचा भाऊ भागवत बळिराम बलसुरे यांच्या फिर्यादीवरून मृताची पत्नी, विष्णू शंकर लांडगे, विजय (शेरू) साहेबराव गवळी, योगेश बळी कांबळे या संशयितांविरुद्ध किल्लारी पोलिसात गुन्हा नोंदविण्यात आला. उपनिरीक्षक राजपूत तपास करीत आहेत.

या प्रकरणी एका संशयिताला ताब्यात घेतले असून त्याने गुन्ह्याची कबुली दिली आहे. याबाबत गुन्हा नोंदवला आहे. संशयितास गुरुवारी सकाळी न्यायालयासमोर हजर केले जाणार आहे.

- सुनील गायकवाड, सहायक पोलिस निरीक्षक