पती-पत्नीच्या खुनाने हादरले शहर; कुजलेले मृतदेह सापडले घरात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Aurangabad murder rotting bodies found in house Suspected to son

पती-पत्नीच्या खुनाने हादरले शहर; कुजलेले मृतदेह सापडले घरात

औरंगाबाद : शहरातील पुंडलिकनगर भागात सोमवारी सकाळी पती-पत्नीचा खून करण्यात आल्याची घटना उघड झाली. शहरात खुनाची मालिकाच सुरू आहे. गेल्या चार दिवसांतील हा पाचवा खून आहे. यामुळे शहरात खळबळ उडाली आहे. दरम्यान, घटनेपासून फरार झालेल्या मुलानेच हा खून केल्याचा संशय आहे. पोलिसांनी त्याला शिर्डीत ताब्यात घेतले, मात्र शहरात आणल्यानंतर खरा प्रकार उघड होणार आहे.

श्यामसुंदर हिरालाल कलंत्री (वय ६०), अश्‍विनी श्यामसुंदर कलंत्री (३८, रा. गल्ली क्र. ४, पुंडलीकनगर, गजानननगर) अशी मृतांची नावे आहेत. शामसुंदर यांचे कापड दुकान आहे. त्यांचे तीन लग्न झालेले आहेत. पहिली पत्नी किरण हिचा मृत्यू झाल्यामुळे त्यांनी दुसरे लग्न केले, मात्र दुसऱ्या पत्नीने त्यांची फसवणूक करुन पलायन केले. त्यामुळे शामसुंदर यांनी तिसऱ्यांदा अश्‍विनी यांच्याशी २००० मध्ये लग्न केले. त्यांना पहिल्या पत्नीचा मुलगा देवेंद्र आणि तिसऱ्या पत्नीची मुलगी वैष्णवी अशी दोन अपत्ये आहेत.

मुलगा गायब

देवेंद्र हा अश्‍विनी कलंत्री यांचा सावत्र मुलगा आहे. पंधरा दिवसांपूर्वी त्याचा वडील श्यामसुंदर यांच्याशी दुकानातील पैसे घेतल्यावरुन वाद झाला होता. त्यामुळे वडिलांनी त्याचा मोबाईल काढून घेतला होता. दरम्यान, कलंत्री यांची सध्याची पत्नी अश्विनी हिची मुलगी वैष्णवीला शनिवारी वडील शामसुंदर कलंत्री यांनी महाविद्यालयात नेऊन सोडले होते. त्यानंतर दुपारी सावत्र भाऊ देवेंद्रने वैष्णवीला वडिलांच्या फोनवरुन, पप्पाच्या मित्राचे निधन झाल्याने आम्ही सगळे जण धुळ्याला जात आहोत. त्यामुळे तू संध्याकाळी बजरंग चौक येथील मोठ्या आईकडे (काकू) मुक्कामी जा असे सांगितले. त्यामुळे वैष्णवी ही संध्याकाळी काकूकडे मुक्कामी गेली. त्यानंतर सायंकाळी वडिलांना बोलायचे म्हणून वैष्णवीने वडिलांना फोन लावला.

परंतु, देवेंद्रने कारणे सांगत वडिलांशी बोलणे करुन दिलेच नाही. दुसऱ्या दिवशी रविवारीही वडिलांच्या आवाजात तिच्याशी संभाषण साधले, तेव्हा वडिलांच्या आवाज काढत देवेंद्रने आज धुळ्याहून घरी येत असल्याचे सांगत दिशाभूल केली. त्यानंतर वैष्णवी हिने पुन्हा दुपारी कॉल केला, तेव्हा चाळीसगाव जवळ आहे, बसमध्ये आवाज येत नाही असे सांगत वडिलांना फोन न देता दिशाभूल केली. संध्याकाळी पुन्हा कन्नडजवळ, त्यानंतर वाळूजजवळ असल्याचे सांगत दिशाभूल केली. साडेसहा वाजता पुन्हा वैष्णवीने फोन केला, तेव्हा आम्ही पोचत आहोत, तू घरी ये असे सांगीतले. त्यानंतर फोन बंद केला.

नंतर घरी आलेल्या वैष्णवीने कुणाचेच फोन लागत नसल्याने आणि घरी आई-वडील कुणीही आलेले नसल्याने घराजवळच्या एका मैत्रिणीकडे मुक्काम केला. सोमवारी सकाळीच ती मैत्रिणीच्या आईला घेऊन घरी आली. त्यावेळी घराला कुलूपच होते. अखेर घराचे कुलूप तोडण्याचा प्रयत्न केला. मात्र, कुलूप तुटले नाही म्हणून शेजारच्या गच्चीवरील खिडकीतून वैष्णवी घरात गेली, तेव्हा हा भयंकर खुनाचा प्रकार उघड झाला.

दोन दिवसात पाच खून!

शहरामध्ये खुनाच्या घटनांचे सत्र सुरु आहे. एकापाठोपाठ भयंकर खुनाच्या घटना घडत आहेत. कायदा व सुव्यवस्था आहे की नाही, अशीच परिस्थिती आहे. दोन दिवसांपूर्वी नारेगाव येथे प्रियकराने रुमवर बोलावून प्रेयसीचा खून केला. त्यानंतर दुसऱ्या घटनेत, कटकटगेट भागात साबिर शहा कासीम शहा यास धारदार हत्याराने भोसकण्यात आले. तर तिसऱ्या घटनेत जवाहरनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत दोन मित्रांमध्ये झालेल्या वादानंतर बियरच्या फुटलेल्या बाटलीच्या काचेने गळा चिरून शेख नासिर शेख बशीर याचा खून करण्यात आला. चौथ्या घटनेत, देवगिरी महाविद्यालयाजवळे कशीश नावाच्या महाविद्यालयीन तरुणीचा भरदिवसा गळा चिरण्यात आला. सोमवारी पुन्हा पुंडलीकनगरातील पती-पत्नीच्या दुहेरी खुनाने शहर हादरुन गेले आहे.

मृतदेह वेगवेगळ्या ठिकाणी

श्यामसुंदर आणि अश्‍विनी या दोघांचे मृतदेह घरात वेगवेगळ्या ठिकाणी कुजलेल्या अवस्थेत पडले होते. यापैकी श्यामसुंदर यांचा मृतदेह गच्चीवरील खोलीत तर अश्‍विनी यांचा मृतदेह खालच्या खोलीतील दिवाणमध्ये पोत्यात भरून ठेवलेल्या अवस्थेत होता. दोघांच्याही चेहऱ्यावर रॉडने मारहाण केल्याच्या आणि नंतर धारदार शस्राने त्यांचा खून करण्यात आल्याच्या खुणा होत्या. घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी पोलिस उपआयुक्त दीपक गिऱ्हे, सहायक पोलिस आयुक्त विशाल ढुमे, पोलिस निरीक्षक अविनाश आघाव, पुंडलीकनगर ठाण्याचे निरीक्षक दिलीप गांगुर्डे, सहायक निरीक्षक मनोज शिंदे यांनी भेट दिली. त्यानंतर तातडीने तपासाला वेग दिला.

शिर्डीत ठोकल्या बेड्या

सावत्र आई आणि वडिलांचा खून केल्यानंतर देवेंद्र फरार झाला होता. खुनाचा प्रकार उघड झाल्यानंतर गुन्हे शाखेचे निरीक्षक अविनाश आघाव, पुंडलीकनगर ठाण्याचे निरीक्षक दिलीप गांगुर्डे यांच्या मार्गदर्शनाखाली पथके तपासासाठी रवाना केली होती. गुन्हे शाखा व पुंडलीकनगर पोलिसांच्या संयुक्त पथकाने तांत्रिक माहितीच्या आधारे संशयित आरोपी देवेंद्र याला शिर्डीमध्ये ताब्यात घेतल्याची माहिती श्री. गांगुर्डे यांनी दिली.

Web Title: Aurangabad Murder Rotting Bodies Found In House Suspected To Son

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top