esakal | Coronavirus: नियम पाळा, अन्यथा दंड भरा, प्रत्येक वॉर्डात पथके
sakal

बोलून बातमी शोधा

Aurangabad lockdown

Coronavirus: नियम पाळा, अन्यथा दंड भरा; प्रत्येक वॉर्डात पथके

sakal_logo
By
माधव इतबारे

औरंगाबाद: कोरोना संसर्गावर नियंत्रण मिळविण्यासाठी व नियमांचे पालन व्हावे यासाठी आता प्रत्येक वॉर्ड स्तरावर एक याप्रमाणे शहरात ११५ पथके तयार करण्यात आली आहेत. यासंदर्भात जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी आदेश काढले असून, जिथे नियम पाळले जाणार नाहीत, तिथे दंड वसूल करा, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे. प्रत्येक प्रभागाचा वॉर्ड अधिकारी निरीक्षक असून, त्यांच्या सोबतीला एक पोलिस कर्मचारी व अन्य चार जण असतील, असे आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे.

शहरात फेब्रुवारी महिन्यापासून कोरोना संसर्ग झपाट्याने वाढत आहे. संसर्गावर नियंत्रण मिळविण्यासाठी प्रशासनातर्फे प्रयत्न सुरू असले तरी अद्याप यश आलेले नाही. त्यामुळे आता प्रत्येक वॉर्ड स्तरावर नियोजन करण्यात आले आहे. प्रत्येक प्रभागाच्या वॉर्ड अधिकाऱ्यावर निरीक्षक म्हणून जबाबदारी देण्यात आली आहे. त्यांच्यासोबत महापालिकेचे दोन अधिकारी व विविध सरकारी कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी व एक पोलिस देण्यात आला आहे. या पथकाने प्रत्येक वॉर्डात कोरोना संसर्ग रोखण्‍यासाठी प्रयत्न करणे तसेच नियमांचे पालन होत नसेल तर दंडात्मक कारवाई करावी, असे जिल्हाधिकाऱ्यांनी काढलेल्या आदेशात नमूद करण्यात आले आहे.

मायक्रो कंन्टेनमेंट झोनमध्ये तब्बल दहा हाजारांचा दंड-

महापालिकेने शहरात २६ कंन्टेनमेंट झोन जाहीर केले आहेत. त्यात मायक्रो कंन्टेनमेंट झोनमध्ये कोरोना संसर्ग नियंत्रित करण्यासाठी भर दिला जाणार आहे. याभागात येणाऱ्या व जाणाऱ्या नागरिकांवर गृहनिर्माण संस्थांनी नियंत्रण ठेवावे. नियम पाळले नाहीत तर तब्बल १० हजार रुपये दंड आकारला जाईल, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे. तसेच खासगी बसेसच अत्यावश्‍यक कामासाठी किंवा योग्य कारणांसाठी वापरली नाही तर एक हजार दंड, टॅक्सीमध्ये एखाद्या चालकाला मास्क बंधनकारक राहील. एखाद्या प्रवाशाने मास्क वापरला नाही तर चालकासह संबंधिताला प्रत्येकी ५०० रुपये दंड लावला जाईल.

घरपोच सेवा फक्त इमारतीच्या प्रवेशव्दारापर्यंतच असेल. रस्त्यावरील खाद्यपदार्थाच्या दुकानात नियमांचे पालन केले नाही तर ५०० रुपये दंड आकारला जाईल. बांधकाम क्षेत्राशी निगडीत सर्वांचे लसीकरण करून घ्यावे, अन्यथा विकासकाला १० हजार रुपये दंड केला जाईल, असे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी काढले आहेत.