
Aurangabad News : खंडोबाच्या दरबारी,भाविकांची वारी
औरंगाबाद : सातारा परिसरातील खंडोबा यात्रेला गुरुवारी सुरवात झाली असून रविवारी हजारो भाविकांनी श्री खंडोबाचे दर्शन घेतले. यावेळी मंदिराच्या बाहेरपर्यंत भाविकांची दर्शनासाठी रांग लागली होती.
सातारा येथील प्रसिद्ध चारशे वर्षांपूर्वीच्या हेमाडपंती खंडोबा मंदिरात दरवर्षीप्रमाणे यंदाही मोठ्या उत्साहात गुरुवारी यात्रेला सुरवात झाली. मागील दोन वर्षे कोरोनाचे सावट असल्याने खंडोबा मंदिरात दर्शनासाठी भक्तांना येता आले नव्हते. मात्र, यंदा कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने मोठ्या उत्साहात यात्रा भरली आहे. रविवारी सकाळपासूनच भाविकांनी दर्शनासाठी मंदिरात गर्दी केले होती.
यावेळी रेवड्यांची उधळण, भंडारा उधळण करत येळकोट येळकोट जय मल्हारचा जयघोष केला. यावेळी संपूर्ण परिसर भक्तिमय झाला. मंदिराचे अध्यक्ष साहेबराव पळसकर, सचिव गंगाधर पारखे यांच्यासह कमिटीचे सर्व पदाधिकारी यात्रेच्या यशस्वितेसाठी प्रयत्न करीत आहेत.
मंगळवारी कलगीतुरा
खंडोबा यात्रेनिमित्त उस्ताद शहानूरखान पटेल यांच्या स्मरणार्थ मंगळवारी कलगीतुरा जंगी सामना होणार असून यामध्ये १२ जोड्या (फड) भाग घेणार आहेत. यात छंद गायले जाणार असून यात संपूर्ण धार्मिक ग्रंथांचा आधार घेतला जातो. यात जाणकार मंडळी व गायक मंडळी मोठ्या संख्येने भाग घेतात. कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजक बहादूरखान अकबर खान पटेल, शेख जिया उल्लाह शेख अकबर पटेल यांनी केले.