Aurangabad : शेतात काम करणाऱ्या शेतकऱ्यावर बिबट्याचा हल्ला | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बिबट्या
Aurangabad : शेतात काम करणाऱ्या शेतकऱ्यावर बिबट्याचा हल्ला

Aurangabad : शेतात काम करणाऱ्या शेतकऱ्यावर बिबट्याचा हल्ला

अजिंठा (जि.औरंगाबाद) : शेतात काम करणाऱ्या शेतकऱ्यावर बिबट्याने हल्ला करून गंभीर जखमी केल्याची घटना वसई (ता.सिल्लोड) येथे रविवारी (ता.१४) सकाळी आठच्या सुमारास घडली. शेतकऱ्याने आरडाओरड केल्याने बाजुचे शेतकरी मदतीला धावल्याने त्याचा जीव वाचला. येथील दिलीप नारायण सरोदे (वय ४८) हे नेहमीप्रमाणे आपली पाळीव जनावरे घेऊन वसई शेतशिवारातील आपल्या शेतात गेले. जनावरांना चारा टाकून शेतात काम करीत असतांना बिबट्याने त्यांच्यावर (Aurangabad) समोरच्या बाजूने हल्ला चढवला. यात त्यांना डोक्याला छातीला गंभीर इजा झाली आहे. त्यांनी आरडाओरड केल्यावर वरच्या बाजुला असलेले शेतकरी मुकुंदा सखाराम आरके हे त्यांच्या मदतीला धावले. तसेच शेतातील दोन कुत्र्यांनी बिबट्यावर धावून गेल्याने बिबट्याने तेथून पळ काढला व नशीब बलवत्तर म्हणून शेतकऱ्याचे प्राण वाचले. जखमी अवस्थेतील दिलीप सरोदे यांना तात्काळ मुकपाठ गावचे पोलिस पाटील प्रकाश शिंदे, माजी तंटामुक्ती अध्यक्ष भास्कर सरोदे, आकाश चव्हाण, गजानन वाघ, गणेश सोनवणे, अजय यांनी अजिंठा ग्रामीण रुग्णालयात भरती केले. (Leopard Attack)

हेही वाचा: देशात भाजप पेटवा-पेटवीचे राजकारण करित आहे, संजय राऊतांची टीका

येथे त्यांच्यावर वैद्यकीय अधिकारी सुरेखा तोतला, सहकारी नितीन खडके, भीमराव बोरडे यांनी उपचार केले. घटनेची माहीती समजताच अजिंठा येथील वनपरिक्षेत्र अधिकारी निलेश सोनवणे, वनपाल एच. एच. सय्यद, वनरक्षक एस.एम. सागरे, कैलास जाधव, भारती मचके यांनी रग्णालयात येऊन जखमीची भेट घेतली. घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. दरम्यान जखमी शेतकऱ्यास तात्काळ शासकीय मदत मिळवून देऊन हल्लेखोर बिबट्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी प्रकाश शिंदे व भास्कर सरोदे यांनी केली आहे. तसेच आमच्या भागात पाळीव प्राण्यांवर बिबट्याच्या हल्ल्याचे प्रमाण वाढले असून, पंचनामे करण्यास विलंब होत असल्याचा आरोपही त्यानी यावेळी केला.

loading image
go to top