esakal | आर्थिक वादातून १५ वर्षीय मुलाचा खून; पोलिसांनी आरोपीला पाठलाग करून केलं जेरबंद
sakal

बोलून बातमी शोधा

aurangabad crime news

आर्थिक वादातून १५ वर्षीय मुलाचा खून; पोलिसांनी आरोपीला पाठलाग करून केलं जेरबंद

sakal_logo
By
प्रमोद सरवळे

जायकवाडी (जि.औरंगाबाद) : टेकडी तांडा (ता.पैठण) येथे पैशांच्या वादातून एका १५ वर्षीय मुलाचा धारधार शस्त्राने वार करून खून झाला आहे. ही घटना मंगळवार (ता.१३ ) रोजी रात्री १०:३० वाजेच्या सुमारास घडली. यामध्ये मृत मुलाचे आई-वडील गंभीर जखमी झाले आहेत. या प्रकरणी पैठण एमआयडीसी पोलिसांनी एका आरोपीस अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा फाटा येथून ताब्यात घेतले आहे.

या बाबत पैठण एमआयडीसी पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, टेकडी तांडा (ता.पैठण) येथील मयत संकेत ज्ञानेश्वर पवार (वय १५ वर्ष) रा.टेकडीतांडा याच्या वडिलाने आरोपी विष्णू पवार (वय-४० रा.टेकडीतांडा) यास उसने पैसे दिले होते. मंगळवार (ता.१३ )रोजी सायंकाळी मयताचे कुंटूब व आरोपी यांच्यात टेकडीतांडा येथे पैशाच्या देवाण-घेवाणीवरुन आप-आपसात वाद झाले होते.

मयताचे कुटूंब व आरोपी दोघेही याबाबतची तक्रार करण्यासाठी एमआयडीसी पोलिस ठाण्यात आले होते. दोघांनी परस्पराविरुद्ध अदखलपात्र गुन्हा नोंद करुन दुचाकीवरुन मयत संकेत पवार, वडील ज्ञानेश्वर पवार (वय -४५) आई हिरा पवार (वय -३७) घरी परत जात असतांना कारकीन रस्त्यावर रात्री १०:३० वाजेच्या सुमारास आरोपी दबा धरून बसले होते. आरोपी विष्णू पवार याने मयताची दुचाकी बघताच त्यांच्यावर समोर येऊन धारधार चाकूने वार करुन गंभीर जखमी केले. यामध्ये मयत संकेत पवार याच्या पोटात धारधार शस्त्राचे वार झाल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला.

त्याचे आई-वडील गंभीर जखमी झाले. त्यानंतर घटनास्थळावरुन आरोपी पसार झाला. या बाबतची माहिती एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या सहाय्यक पोलिस निरिक्षक अर्चना पाटील यांना मिळताच त्यांनी पोलिस कर्मचाऱ्यांसह तातडीने घटनास्थळी धाव घेतली. मयत व गंभीर जखमींना औरंगाबाद येथील शासकीय रुगण्लयात दाखल केले असून यामध्ये गंभीर जखमी मयताची आई हिरा पवार यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.

मयत संकेत पवार याच्यावर औंरगाबाद येथील शासकीय रुग्णालयात शविच्छेदन करण्यात आले. त्याच्यावर टेकडीतांडा येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. या प्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रकिया सुरु होती. पुढील तपास औंरगाबाद ग्रामीणच्या पोलिस अधीक्षक मोक्षदा पाटील, पैठणचे सहाय्यक पोलिस अधीक्षक गोरख भांबरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक अर्चना पाटील, पोलिस जमादार राजु जावळे, शरद पवार, दिनेश दाभाडे, राहूल बचके, बोर्डे करीत आहेत.

मोबाईल लोकेशनच्या आधारे २ तासात आरोपी जेरबंद-

आरोपी विष्णू पवार हा गुन्हा करुन दुचाकीवरुन फरार होत असताना एमआयडीसी पैठण पोलिस ठाण्याच्या सहाय्यक पोलिस निरीक्षक अर्चना पाटील, पोलिस कर्मचारी शरद पवार, दिनेश दाभाडे, राजु जावळे यांनी दोन तासात मोबाईल लोकेशनच्या आधारे आरोपीचा पाठलाग करीत मोठ्या शिताफीने त्यास नेवासा फाटा येथून ताब्यात घेतले.