esakal | याकडे दुर्लक्ष कराल तर वाढतील या समस्या!
sakal

बोलून बातमी शोधा

File Photo

सकाळ-संध्याकाळ दात ब्रशने घासा व दातांसह तोंडाची काळजी घ्या, असा सल्ला दंत व मुखरोगतज्ज्ञ डॉ. बाळासाहेब बोनगे यांनी दिला.  मौखिक आरोग्य उत्तम असेल तर प्रकृतीही उत्तम असे समीकरण आहे. याकडे दुर्लक्ष केले व तोंडाची नीट काळजी घेतली नाही तर विविध आजार जडतात. बहुतांश रुग्ण दातांची निगा राखत नाहीत.

याकडे दुर्लक्ष कराल तर वाढतील या समस्या!

sakal_logo
By
मनोज साखरे

औरंगाबाद ः सामान्यतः दातांची निगा व तोंडाच्या आरोग्याकडे आपण लक्ष देत नाही आणि त्यामुळे मौखिक आरोग्याच्या समस्या उद्‍भवतात. त्यामुळे तंबाखूसारखे व्यसन सोडा.

सकाळ-संध्याकाळ दात ब्रशने घासा व दातांसह तोंडाची काळजी घ्या, असा सल्ला दंत व मुखरोगतज्ज्ञ डॉ. बाळासाहेब बोनगे यांनी दिला.  मौखिक आरोग्य उत्तम असेल तर प्रकृतीही उत्तम असे समीकरण आहे. याकडे दुर्लक्ष केले व तोंडाची नीट काळजी घेतली नाही तर विविध आजार जडतात.

बहुतांश रुग्ण दातांची निगा राखत नाहीत. त्यामुळे ते डॉक्टरांकडे येतात. दातांना कीड लागल्यानंतर बऱ्याचदा वेदना होत नाहीत. त्यामुळे रुग्ण दुर्लक्ष करतात. वेदना सुरू झाल्या तर तात्पुरता उपाय करतात. शेवटी विपरीत परिणाम होतात. 

...तर कॅन्सरची शक्यता 

तोंडात पांढरे चट्टे येतात. असे चट्टे गालाच्या आतील बाजू, जीभ व टाळूवर असू शकतात. या चट्‍ट्यांकडे दुर्लक्ष केल्यास ते वाढत जातात. काहीअंशी ती तोंडाच्या कॅन्सरची सुरवात असू शकते. त्यापैकी पाच टक्के लोकांना कॅन्सरची शक्यता असते. वेळीच उपचार घेतल्यास महिनाभराच्या उपचारानंतर चट्टे जातात व संभाव्य रोगांपासून मुक्तता मिळू शकते. 

हे वाचा आणि उपाय करा... 

  • तोंडाच्या संक्रमणाला ५७ ते ६० टक्‍के तंबाखूजन्य पदार्थ कारणीभूत 
  • ग्रामीण भागात लहान मुलांमध्ये दातांची कीड; वयस्करांमध्ये हिरडी रोग 
  • मधुमेहाच्या रुग्णांतही हिरडी रोगाचे प्रमाण अधिक 
  • दुर्लक्षच मौखिक आरोग्य बिघडायला कारणीभूत. त्यातून कर्करोगाचा धोका. 
  • दात दुखणे-ठणकणे, हिरड्यांतून रक्त येत असेल तर लगेच डॉक्टरांकडे जावे. 
  • दात किडण्याकडेही बरेचदा दुर्लक्ष होते. त्यामुळे आजार वाढतात. 
  • घरगुती उपचार करू नका, त्याचे विपरीत परिणाम होऊ शकतात. 


दात व तोंडाची निगा राखण्यासाठी सकाळी व संध्याकाळी दोनवेळा दात घासायलाच हवेत. दात घासण्यासाठी ब्रशचा वापर करावा. व्यसन असेल तर तातडीने बंद करा. डॉक्टरांकडे जाऊन निदान करा. व्यसनाधीनतेमुळे तोंडाच्या कर्करोगाची शक्यता कैकपटीने वाढते. तंबाखूजन्य पदार्थ सेवनामुळे तोंड उघडणे कमी होते. त्यामुळे डॉक्टरांना अशा रुग्णांवर उपचार करताना अडचणी येतात. 
- डॉ. बाळासाहेब बोनगे, दंत व मुखरोगतज्ज्ञ. 
 

loading image