मद्यपाश तोडून बनले तीनदा ‘आयर्नमॅन’!

नितीन घोरपडेंची सिनेस्टाइल यशकथा : ‘अल्कोहोलिक्स ॲनॉनिमस’मुळे ‘ट्रान्स्फॉर्मेशन’
Aurangabad Nitin Ghorpade Success Story
Aurangabad Nitin Ghorpade Success Story

औरंगाबाद : वयाच्या सोळाव्या वर्षांपासून दारूचे व्यसन. प्रचंड गरिबीमुळे बूट पॉलिश, पॉपकॉर्न विकणे, गाड्या पुसणे, पेपर टाकण्यासारखी कामे करण्याची वेळ. वयाच्या तिशीत तर आयुष्याची सर्वांगीण धूळधाण उडालेली. त्यात लिव्हर सिरॉसिस जडलेला. आता काही आठवड्यांपुरताच ‘पाहुणा’ म्हणून डॉक्टरांनी दवाखान्यातून घरी पाठविलेला हा माणूस...! आज हाच ‘माणूस’ मद्यमुक्त होऊन यशस्वी व्यावसायिक म्हणून जीवन जगतोय. त्याने जिद्दीने मद्यपाश तोडून तब्बल तीनदा ‘आयर्नमॅन’ किताबही पटकावला आणि तो आता इतरांना मद्यमुक्त करण्यासाठी धडपडतोय!

कुटुंबाचे पाठबळ आणि ‘अल्कोहोलिक्स ॲनॉनिमस’मुळे ‘ट्रान्स्फॉर्मेशन’ झालेल्या नितीन घोरपडे यांची ही यशकथा अगदी सिनेमातल्यासारखीच आहे. मूळ पुण्याचे असलेले नितीन घोरपडे यांचे बालपण औरंगाबादेत गेले. मध्यवर्ती बसस्थानकासमोर ते बूट पॉलिश, वाहने पुसायचे काम करायचे. नंतर रोज ३०० घरांमध्ये पेपर टाकायचे. असा संघर्ष करीत त्यांनी स्वतःचा ट्रान्स्पोर्टचा व्यवसाय उभारला. ज्याला दोन वेळच्या जेवणाची भ्रांत, तोच नितीन बऱ्याच ट्रक्सचा मालक बनला होता. याचदरम्यान मद्याच्या व्यसनाने त्यांना विळखा घातला.

व्यवसायातून बॅंक बॅलन्स वाढला, तसे मद्यप्राशनही वाढले. २००१ मध्ये लग्न झाले. संसारवेलीवर दोन गोंडस फुले आली. २००७ पर्यंत सुरळीत सुरू होते. नंतर मात्र दारूने अंमल गाजवायला सुरुवात केली. त्यात आर्थिक मंदीमुळे व्यवसाय कमी झाला, कर्ज लाखोंच्या घरात गेले. पण, दारू वाढतच होती. अशातच मोठे अपघात झाले, आठवेळा फ्रॅक्चर आणि चार कारचा चुराडा झाला. २०१० मध्ये तर नितीन यांची आर्थिक आणि शारीरिक स्थिती खूपच खालावली होती.

‘लिव्हर सिरॉसिस’ झाल्याने रुग्णालयात दाखल करावे लागले. आता हा काही आठवडेच जगणार, दारूचा एक घोट जरी घेतला तरी मृत्यू येऊ शकतो, असे डॉक्टरांनी त्याच्या घरच्यांना स्पष्टपणे सांगितले. याचवेळी त्यांचा एक बालपणीचा मित्र रुग्णालयात भेटला. त्याने ‘अल्कोहोलिक्स ॲनॉनिमस’ (ए. ए.) या संस्थेविषयी माहिती दिली. कुटुंबीयांनीही नितीनला डिस्चार्ज मिळाल्यानंतर ‘एए’मध्ये जाण्यास प्रवृत्त केले.

नितीन म्हणतात, चार एप्रिल २०१० हा दिवस माझ्या कायम स्मरणात राहील. याच दिवशी ए. ए.ची पायरी चढलो. तेव्हापासून या संस्थेशी जुळलोय. इथे मद्यपाशात अडकलेले लोक एकत्र येतात. ‘फक्त आजचा दिवस दारूच्या घातक घोटापासून दूर राहूया’, अशी सामुदायिक भावना जागृत केली जाते. मद्यासक्तांच्या नावांबाबत गुप्तता पाळतात. त्यामुळे सर्वजण आपापले अनुभव खुलेपणाने ‘शेअर’ करतात.

‘अल्कोहोलिक्स ॲनॉनिमस’विषयी…

  • अमेरिकेतील बिल डब्ल्यू आणि डॉ. बॉब यांनी केली ए.ए.ची सुरुवात

  • १८० देशांमध्ये ए.ए. समूह, २० लाखांवर मद्यपींना काढले विळख्याबाहेर

  • भारतात ए.ए. चे २००० पेक्षाची जास्त समूहांद्वारे मद्यमुक्तीचे कार्य

  • मद्यपानापासून स्वतः दूर राहून इतरांना मदत करणे हे ध्येय

  • ‘एकता, सेवा, मुक्तता’ हे ब्रीदवाक्य, अनुभवांचे शेअरिंग

  • धर्म, राजकारणाशी संबंध नाही, विशिष्ट विचारसरणीचा प्रचारही नाही (आपली, मित्र, नातेवाइकांची दारू ही समस्या बनली असेल तर संपर्क साधू शकता, विनामूल्य मदत, संपर्कासाठी क्रमांक ः ७७४१०४१४५०)

असाही बहुमान...

नितीनला बालपणापासूनच धावणे, सायकलिंग, पोहण्याची आवड. मद्यमुक्तीनंतर त्यांनी हाच छंद जोपासला. २०१८ मध्ये जर्मनीत, २०१९ ला डेन्मार्कमध्ये झालेल्या आयर्नमॅन स्पर्धेत बाजी मारली. ६ ऑगस्ट २०२२ रोजी एस्टोनिया येथे खुल्या पाण्यात ४ किलोमीटर पोहणे, १८० किलोमीटर सायकलिंग, ४२ किलोमीटर रनिंग करून तिसऱ्यांदा आयर्नमॅनचा किताब नावावर केला. मराठवाड्यातील असा पहिला खेळाडू बनण्याचा बहुमानही मिळविला!

समाजऋण फेडताना...

नितीन आता यशस्वी ट्रान्स्पोर्ट व्यावसायिक, सायकल स्टोअरचे मालक आहेत. शिवाय ते मद्यमुक्तीसाठी इतरांना प्रोत्साहित करतात. ए. ए. च्या व्यसनमुक्ती मोहिमेत त्यांनी आतापर्यंत शेकडो मद्यासक्तांना स्वानुभवातून मार्गदर्शन केले आहे. पुण्यातील ‘मुक्तांगण’ या संस्थेच्या उपक्रमांत त्यांचा सक्रिय सहभाग असतो. आरोग्यपूर्ण जीवनशैलीसाठी ते चर्चासत्रे घेतात. एवढेच नव्हे, तर लेफ्टनंट कर्नल विजय नायर यांच्या ‘दे इन्स्पायर’ या पुस्तकात त्यांच्या प्रेरणादायी आयुष्यावर एक संपूर्ण प्रकरणच लिहिलंय!

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com