Gram Panchayat Election : ग्रामपंचायत निवडणुकीचा धुरळा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Aurangabad Gram Panchayat Election

Gram Panchayat Election : ग्रामपंचायत निवडणुकीचा धुरळा

पैठण : तालुक्यातील २२ ग्रामपंचायतींच्या पंचवार्षिक निवडणुका लागल्या असून, या निवडणुकीची आचारसंहिता शुक्रवारपासून (ता.१८) लागू झाली आहे. २८ नोव्हेंबरपासून यासाठी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे. यामुळे भर हिवाळ्यात या गावांत वातावरण तापल्याचे चित्र आहे.

लोकशाही प्रक्रियेत सर्वाधिक चुरशीची निवडणूक म्हणून ग्रामपंचायतींची निवडणूक लढली जाते. त्यामुळे गटा-तटाचे राजकारणाला सध्या ऊत आल्याचे चित्र असून या ठिकाणी फोडाफोडीलाही वेगळेच महत्त्व प्राप्त झाले आहे.

अगदी हातावरच्या बोटावर मोजण्याइतक्या गावांत बिनविरोधसाठीचे प्रयत्न सुरू झाले असले तरी यातही छोटी- मोठी कुसपटे काढून बिनविरोधाचा प्रस्ताव मोडकळीस आणण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे दिसत आहे. निवडणुकीचा ज्वर टोकावर पोहोचू लागला असून, या ठिकाणी दोनपेक्षा अधिक गट-तट एकत्र येऊन वेगवेगळ्या जोडण्या लावण्याचे काम करीत आहेत.

गावातील राजकारणाला शेतीचे राजकारणही निगडित राहत असून, काही ठिकाणी ऊस क्षेत्रात रस्ते करण्यापासून ते रस्ते देण्यापर्यंतचे विषय यामध्ये समाविष्ट असल्याने अनेकांचे राजकारण याभोवतीच फिरत असल्याचे दिसून येत आहे. अनेक ठिकाणी तर भाऊबंदकीमध्येच अधिक प्रमाणात ईर्ष्या असल्याने कोणाकडून कोणाचा उमेदवार दिला जाणार, यावरच आगामी काळातील अन्य गणिते अवलंबून आहेत.

गेली अनेक वर्षे एकमेकांच्या विरोधात ईर्ष्या ठोकलेल्या काहींना मात्र या निवडणुकीत बिनविरोधाचीही चर्चा करणे योग्य वाटत असल्याने ग्रामीण पातळीवर यालाही वेगळे महत्त्व प्राप्त झाले आहे.

गावपातळी सोडून अन्य ठिकाणी जिल्हा परिषद असो, पंचायत समिती असो अगदी विधानसभेपर्यंत मोठे नेते एकत्र असल्याने आपण एकत्र आलो तर काय फरक पडणार, असा विचारभावही या निमित्ताने हे गावपुढारी करत आहे. त्यामुळे गावच्या राजकीयदृष्ट्या यालाही वेगळे महत्त्व प्राप्त झाले आहे.

एकीकडे गावागावांत बैठकांचा जोर वाढला असून त्यानिमित्ताने जेवणावळीही झडू लागल्या आहेत. काही ठिकाणी गोपनीय बैठका घेत असताना गावांपासून दूर असलेल्या हॉटेल्स, धाब्यांची निवड केली जात आहे. या बैठकांवर विरोधकांची नजर असल्याने त्यातूनही फोडाफोडीचे राजकारण होऊन दोन्हीकडे बैठकांना उपस्थिती लावणारेही ग्रामस्थ दिसून येत आहेत.

रेशन दुकाने, सेवा संस्था केंद्रस्थानी

-अनेक गावांमध्ये गावच्या राजकीय घडामोडींमध्ये रेशन दुकाने व सेवा संस्था ही महत्त्वाची केंद्रस्थाने ठरत आहेत. यातून मिळणारे फायदे हे आपणच दिल्याचे हे लोक दाखवीत असल्याने तसेच आगामी काळातील भीतीही यातूनच दाखवली जात असल्याने ही दोन्ही केंद्रे निवडणुकीच्या महत्त्वाच्या भूमिकेत जातात. या निवडणुकीतही याचा वापर सुरू झाल्याचे दिसून येत आहे.

उमेदवारांच्या पळवापळवीला ब्रेक!

-पूर्वी निवडून आलेल्या सदस्यांमधून सरपंचपदाची निवड होत होती. त्यामुळे आपल्या पॅनलचा सरपंच व्हावा आणि आपल्या पॅनलमधला सदस्य दुसऱ्या पॅनलकडे जाऊ नये, यासाठी निवडून आलेल्या सदस्यांना गावापासून दूर अंतरावर ठेवले जात होते. मात्र, थेट ग्रामपंचायत निवडणूक सरपंच निवडीने सदस्यांची पळवापळवी आता बंद झाली आहे.