औरंगाबाद : भाविकांवर 'पाणी विकत' घेण्याची वेळ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Paithan water scarcity citizen buying water financial crisis

औरंगाबाद : भाविकांवर 'पाणी विकत' घेण्याची वेळ

पैठण : पैठण हे शहर शांतिब्रह्म संत एकनाथ महाराजांची जन्मभूमी असून या नाथांच्या भूमीत नाथ महाराजांनी उन्हात तडफडत अवस्थेत पडलेल्या गाढवाला पाणी पाजून आदर्श घालून दिला. त्या नाथांच्या पुण्यभूमीत आज एकही पाणपोई नसल्याचे निदर्शनास आले असून भर उन्हात नागरिकांना घोटभर पाणी विकत घेण्याची वेळ आली आहे.

पूर्वी पैठण शहरात मुख्य रस्त्यासह जागोजागी दिसणाऱ्या पाणपोईमधून सर्वसामान्य नागरिकांना मोफत थंडगार पाणी पिण्यास मिळत होते. परंतु, सध्या पैठण परिसरातून पाणपोई गायब झालेली दिसत आहे. त्यामुळे नागरिकांना भर उन्हात घोटभर पाणी विकत घेण्याची वेळ आली आहे. अनेक शहर व ग्रामीण भागात उन्हाळा आला म्हणून अनेक स्वयंसेवी संस्था पक्ष्यांसाठी पिण्याच्या पाण्याची सोय करण्यासाठी साद घालताना दिसत आहेत. परंतु, माणसांना पिण्याच्या पाण्याची सोय कुणीही करायला तयार नसल्याचे चित्र आहे.

वाटसरूला पाणी पाजणे हे पुण्य कर्म मानले जाते. यासाठी अनेक व्यक्ती व स्वयंसेवी संस्था पूर्वी अशा सार्वजनिक पिण्याच्या पाण्याची सोय करत होत्या. परंतु, आजकाल या संस्था याबाबतीत उदासीन दिसून येत आहेत. त्यांच्या या उदासीनतेचा लाभ मिनरल वॉटर विक्रेत्यांना होत असून आता जार व्यावसायिकांचे पण चांगले फावले आहे. तहानलेल्या जिवांना घशाची कोरड भागविण्यास पंधरा ते वीस रुपये मोजावे लागत आहेत.

पैठण हे तालुक्याचे केंद्र असल्याने कामानिमित्त शहरात सर्वसामान्य, कष्टकरी नागरिक येतात. त्यांना तहान भागविण्यासाठी विकतचे पाणी घेणे कितपत परवडणारे आहे. हा प्रश्न उपस्थित होत आहे. याबाबत पैठण शहरात फेरफटका मारला असता सार्वजनिक पिण्याच्या पाण्याच्या सोई कुठेच दिसून येत नसल्याचे वास्तव समोर आले आहे. मे महिन्यात येत्या आठवड्यात आणखी तापमान वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे आतातरी शहरात ठिकठिकाणी पाणपोई सुरू करण्यासाठी कुणी पुढाकार घेईल का, असा प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे.

वाटसरूंना पाणी पाजण्याच्या संस्कृतीचा विसर

पाणपोई नसल्याने हॉटेलमध्ये पाणी पिण्याखेरीज पर्यायच दिसत नाही. पाणी हेच जीवन, पाण्याचे काम पुण्याचे काम असे जरी म्हटले जात असले तरी आज पिण्याच्या पाण्याच्या कृत्रिम टंचाईने नाथांच्या नगरीत पाण्यासाठी सर्वसामान्य नागरिकांची अडचण झाली आहे. त्यामुळे वाटसरूस पाणी पाजण्याची आपली संस्कृतीच लयास जात असल्याचे चित्र आहे.

Web Title: Aurangabad Paithan Water Scarcity Citizen Buying Water Financial Crisis

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top