पिकांची काळजी घेणार ‘खेती ज्योतिष’ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Aurangabad Pitale Bandhu startup

पिकांची काळजी घेणार ‘खेती ज्योतिष’

औरंगाबाद : शेती करताना शेतकऱ्यांसमोर अनेक अडचणी येतात. तापमान, आर्द्रता, मातीचा ओलावा, सूर्यप्रकाश, वाऱ्याची दिशा आणि वेग, पाऊस किती झाला, धुके-दवबिंदू आदींबाबतचा डेटा तयार करून शेतकऱ्यांना शास्त्रशुद्ध पद्धतीने माहिती देण्यासाठी औरंगाबादेतील समीर पितळे आणि प्रतीक पितळे या सख्ख्या बंधूंनी ‘रोव्हिडो एलएलपी’ या स्टार्टअपच्या माध्यमातून ‘खेती ज्योतिष’ हे ‘आयओटी डिव्हाईस’ तयार केले आहे.

हे डिव्हाईस शेतात लावल्यावर सुमारे पाच एकर जमिनीचा विविध १६ मुद्यांच्या आधारे डेटा जमा केला जातो. त्यातून पिकांवर कोणते रोग येऊ शकतो, याचा अंदाज बांधता येतो. त्यामुळे योग्य वेळी फवारणी करून शेतकरी नुकसान टाळू शकतात, असे पितळे बंधू सांगतात. समीर पितळे हे मेकॅनिकल इंजिनिअर तर प्रतीक हे इलेक्ट्रॉनिक्समध्ये इंजिनिअर आहेत.

समीर यांनी तीन वर्षे काही कंपन्यांत नोकरी केली. प्रतीक यांचे गतवर्षीच शिक्षण पूर्ण झाले आहे. २०१८ मध्ये ‘स्टार्टअप इंडिया चॅलेंज’मध्ये ‘पोस्ट हार्वेस्ट लॉसेस’ कमी कसे करावे यासाठी स्पर्धा झाली होती. यासाठी संशोधन केल्यावर त्यांना शेतकऱ्यांच्या समस्या समजल्या. यातून त्यांनी ‘खेती ज्योतिष’ स्टार्टअप सुरू केले. ते २०१८ पासून यावर काम करीत असून सध्या हे ॲप तयार करण्याचे काम सुरू आहे.

‘खेती ज्योतिष कसे काम करते?

‘खेती ज्योतिष हे आयओटी डिव्हाईस शेतात मध्यभागी लावावे लागते. ही यंत्रणा सौरऊर्जेवर चालणारी आहे. डिव्हाइसमध्ये सीमकार्ड असून ते इंटरनेटशी जोडले आहे. त्याद्वारे शेताचे तापमान, मातीचा ओलावा, वाऱ्याची दिशा व वेग, सूर्यप्रकाश, पाऊस किती झाला, धुके, दवबिंदू आदी सोळा प्रकारची माहिती (डेटा) ‘क्लाऊड’वर गोळा होते. शेतकरी ‘खेती ज्योतिष’ खरेदी करतील त्यावेळी सोबत त्यांचा मोबाईल क्रमांक नोंद केला जाईल. या क्रमांकावर मराठी आणि हिंदी भाषेतून माहिती मिळेल.

क्लाउडवर पाठविली जाते माहिती

प्रत्येक दोन मिनिटाला ‘क्लाऊड’वर माहिती पाठविली जाऊ शकते. यातून जमा झालेल्या माहितीचा (डेटा) अभ्यास करून शेतकऱ्यांना पिकांवर येणाऱ्या रोगाचा प्रभाव कमी करण्यास तसेच कीटकनाशके वापरण्यासंबंधी शास्त्रशुद्ध माहिती मिळते. सुरवातीला डाळिंब, द्राक्ष, मिरची, मोसंबी या पिकांसाठी याचा वापर केला जाणार आहे.

‘रोव्हिडो एलएलपी’ हे स्टार्टअप डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या अटल इनक्युबेशन सेंटर, रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी, मुंबई (एआयसी), देशपांडे स्टार्टअप येथे नोंदणीकृत (इन्क्युबेट) आहे. अनिल दौड यांचे पितळे बंधूंचे मार्गदर्शन मिळत आहे.

आणखी काही वेगळे प्रयोग

समीर आणि प्रतीक यांनी याआधी औरंगाबादच्या बंजारा कॉलनीजवळ हायजेनिक पाणीपुरीचे यंत्र तयार केले होते. शुद्ध पाण्यासाठी यंत्र, ऑटोमॅटिक सॅनिटायझर यंत्र, वेटर रोबोही त्यांनी तयार केला आहे. चितेगाव (ता.पैठण) येथील एका हॉटेलमध्ये हा रोबो देण्यात आला आहे.

शेतकऱ्यांना पिके घेताना स्वतःच्या शेताविषयी डेटावर आधारित शास्त्रशुद्ध माहिती मिळत नाही. त्यामुळे आम्ही शेतीतील डेटावर काम करण्यासाठी २०१८ पासून संशोधन करत आहोत. ‘डेटा’ जवळ असला तर पिकांवर कोणता रोग येऊ शकतो किंवा पिकांना कशी हानी होऊ शकते याची माहिती मिळू शकते. त्यामुळे पिकांची काळजी कशी घेता येईल, हे ठरवता येईल.

- समीर पितळे (रोव्हीडो एलएलपी स्टार्टअप)