औरंगाबाद : दलालांनी पोखरला नगररचना विभाग | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Aurangabad Planning Department Bribery

औरंगाबाद : दलालांनी पोखरला नगररचना विभाग

औरंगाबाद : नगररचना विभागाचे शाखा अभियंता व गुंठेवारी कक्षप्रमुख संजय चामले यांना लाचलुचपत प्रतिबंध विभागाने शुक्रवारी रात्री लेआऊट मंजुरीसाठी तीन लाखांची लाच घेताना रंगेहाथ पकडले. या प्रकारानंतर महापालिकेत खळबळ उडाली आहे. नगररचना विभाग अनेक वर्षांपासून दलालांच्या विळख्यात असून, आता या दलालांचेही धाबेही दणाणले आहेत. महापालिकेचा नगररचना विभाग अनागोंदी कारभारामुळे नेहमीच चर्चेत असतो. बांधकाम परवान्यासाठी सर्वसामान्य नागरिकांना खेट्या माराव्या लागतात. दलालांमार्फत फाइल गेल्यास मात्र विनात्रास परवानगी मिळते.

ले-आऊट, मोठ्या घरकुल योजनेच्या फाइल अडवून ठेवल्या जातात, याविषयी वारंवार स्थायी समिती, सर्वसाधारण सभेत ओरडही झाली; पण कारभार सुधारलेला नाही. त्यात शाखा अभियंता संजय चामले यांच्या घरी शुक्रवारी रात्री लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने छापा मारला. त्यात चामले तीन लाख रुपयांची लाच घेताना पकडले गेले. सातारा भागातील एक ले-आऊट मंजूर करण्यासाठी ही लाच घेतली. नगररचना विभागालाच दलालांचे ग्रहण लागले आहे. दलालांमुळे नगर रचना विभागात भ्रष्टाचार बोकाळला असल्याचे बोलले जात आहे.

आवक-जावक विभागातील फायली हाताळण्यापासून विविध शाखा अभियंता, उपअभियंत्यांच्या टेबलावरच्या, कपाटातल्या फायली हाताळण्यापर्यंतचे काम दलाल करतात. वादग्रस्त जमिनीच्या फायली दाखल होताच हे दलाल सक्रिय होतात. दलाली मोडीत काढण्यासाठी शासनाने ऑनलाइन बांधकाम परवानगी सक्तीची केली पण त्याला म्हणावा तसा प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे नगररचना विभागातील दलालांची रेलचेल सुरूच आहे.

एकाच विभागात वर्षानुवर्षे ठाण

महापालिकेच्या महत्त्वाच्या विभागात अनेक अधिकारी वर्षानुवर्षे ठाण मांडून आहेत. बदल्याच होत नसल्यामुळे असे अधिकारी निर्ढावले आहेत. संजय चामले नगररचना विभागात शाखा अभियंता असले तरी त्यांच्याकडे गुंठेवारी कक्ष प्रमुख म्हणून काम देण्यात आले होते. सातारा-देवळाईचा परिसरात ले-आऊटला मंजुरी, बांधकाम परवानगी, भोगवटा प्रमाणपत्र देणे अशी कामे चामले यांच्याकडे होती. मात्र फाइलवर लवकर निर्णय न घेता त्रास दिला जात होता, असे नागरिकांचे म्हणणे आहे. सध्या गुंठेवारी कक्षाकडे प्रलंबित असलेल्या १४२७ प्रकरणांपैकी बहुतांश फायली सातारा-देवळाई भागातील असल्याचे सूत्रांनी सांगितले.

बचावासाठी अनेक जण सक्रिय

चामले यांना लाचेच्या प्रकरणात अटक होताच महापालिकेच्या काही अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. प्रकरण वाढू नये यासाठी ते सक्रिय झाले. त्यासोबत काही राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी मध्यस्थी केल्याची चर्चा महापालिका वर्तुळात सुरू आहे. त्यामुळेच चामले यांच्यावरील कारवाईची माहिती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने जाहीर केलेली नाही, असे सूत्रांनी सांगितले.