Aurangabad : आयुष्याची जमापुंजी गेली,आता परताव्याची प्रतीक्षा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पैसे

Aurangabad : आयुष्याची जमापुंजी गेली,आता परताव्याची प्रतीक्षा

औरंगाबाद : राज्यभर गाजत असलेल्या ३०ः३० घोटाळ्यात आयुष्यभर पै पै करत साठविलेली जमा पुंजीच गेल्याने गरीब लोकांसह शेतकऱ्यांना अजूनही किमान परतावा तरी मिळेल, याची आस लागलेली आहे. डीएमआयसीत जमीन गेल्यानंतर लाखो करोडो रुपयांत पैसे मिळाले होते.

हीच संधी हेरुन आरोपी संतोष राठोड याने ३०ः३० चे आमिष दाखवत अनेकांना गंडविले होते. २५ ते ३० टक्के व्याजाचे आमिष दाखवत काही दिवस परतावा दिला खरा, मात्र आरोपीने परतावा बंद केल्यानंतर अखेर एका महिलेने पोलीसांत धाव घेतली होती, अन् तिथूनच आरोपी राठोडचा खरा चेहरा समोर यायला सुरवात झाली.

तक्रारदाराने पोलिसांत धाव घेतल्यानंतर रात्रीत दहा लाख रुपये मिळाल्यानंतर तक्रार मागे घेतल्या गेली, मात्र पैठण तालुक्यातील निलजगावच्या दौलत राठोड यांनी तक्रार दिल्यानंतर आरोपी संतोषसह त्याचे दोन साथीदार पंकज चव्हाण आणि कृष्णा राठोड या तिघांविरोधात २१ जानेवारी रोजी गुन्हा दाखल झाला होता.

कोण आहे राठोड?

संतोष राठोड हा कन्नड तालुक्यातील मुंडवाडी तांडा येथील रहिवासी आहे. विशेष म्हणजे, ३०ः३० मध्ये लोकांना विश्वास बसण्यासाठी लॉकडाऊनच्या काळातही त्याने भावाचा साखरपुडा हजारो लोकांच्या उपस्थितीत शाही थाटात केला होता. इतकेच नव्हे, तर सोन्या चांदीच्या भेटवस्तूही साखरपुड्यात वाटप केल्याने या गोष्टीची चर्चा जिल्हाभर झाली होती.

रात्रीत करोडपती बनले पण...

डीएमआयसीमध्ये जमीन गेल्यानंतर शेतकरी रात्रीत लखपती, करोडपती बनले होते. पैशांवर काय काय करायचे याचा विचार करण्याआधीच संतोष राठोडने पैसा घेतला. विशेष म्हणजे, राठोड याला अटक झाल्यानंतर पोलिस तपासात त्याच्याकडे कोणत्याही प्रकारची गुंतवणूक नसल्याचे समोर आले, त्यामुळे आजवर कोट्यवधी रुपये लाटून त्याने नेमके या पैशांचे केले काय? यावर तर्कवितर्क लावले जात आहेत.