
औरंगाबाद : अडीच लाखांचा गुटखा, सुगंधित पानमसाला जप्त
औरंगाबाद : किराणा दुकानातून बेकायदेशीररित्या गुटखा आणि सुगंधित तंबाखूची विक्री करणाऱ्या दुकानदारास गुन्हे शाखेच्या पोलिसांनी गुरुवारी (ता. तीस) रात्री अटक केली. त्याला ३ जुलैपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश प्रथमवर्ग न्याय दंडाधिकारी श्रीमती ए. एस. वानखेडे यांनी दिले आहेत. नासेर खान यकीन खान पठाण (वय ३०, रा. न्यू. बायजीपुरा) असे आरोपी दुकानदाराचे नाव आहे. अन्न व औषध प्रशासनाचे अन्नसुरक्षा अधिकारी निखिल सूर्यकांत कुलकर्णी यांनी तक्रार दिली होती.
गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अमोल मस्के यांना मिळालेल्या माहितीवरून गुन्हे शाखेचे पोलिस कर्मचारी तसेच अन्न व औषध प्रशासनाचे कर्मचारी यांच्या पथकाने गुरुवारी (ता. तीस) दुपारी दोन वाजेच्या सुमारास न्यू बायजीपुरा येथील हिना किराणा स्टोअर्स या दुकानावर छापा मारला. त्यावेळी दुकानांमध्ये विविध कंपन्यांचा बेकायदेशीर गुटखा आणि सुगंधित पान मसाला असा दोन लाख ५७ हजार १८६ रुपयांचा साठा जप्त करण्यात आला. पोलिसांनी या प्रकरणात दुकान मालक आरोपी नासेर खान याला रात्री साडेआठ वाजता अटक केली. याप्रकरणी जिन्सी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. आरोपीला शुक्रवारी (ता. एक) न्यायालयात हजर करण्यात आले होते. न्यायालयात सरकारी वकील समीर बेदरे युक्तीवाद केला. आरोपीला पोलिस कोठडी देण्यात यावी अशी विनंती सरकारी वकील समीर बेदरे यांनी केली. सुनावणीनंतर न्यायालयाने आरोपीला तीन दिवस पोलिस कोठडी ठेवण्याचे आदेश दिले.
Web Title: Aurangabad Police Seize Gutka Pan Masala Accused Arrested
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..