औरंगाबाद : मॉन्सूनपूर्व कामांना सुरवात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Aurangabad Pre monsoon Repair by mseb for power supply during monsoon

औरंगाबाद : मॉन्सूनपूर्व कामांना सुरवात

औरंगाबाद : वीज ग्राहकांना पावसाळ्यात अखंडित व सुरळीत वीजपुरवठा करण्यासाठी महावितरणने कंबर कसली आहे. महावितरणचे कर्मचारी भर उन्हात चटके सहन करत देखभाल व दुरुस्तीच्या मॉन्सूनपूर्व कामाला लागले आहेत. महावितरणने पावसाळ्यापूर्वी वीज यंत्रणा सक्षमीकरण करण्यासाठी नियोजन करून शुक्रवारी किंवा इतर दिवशी ठराविक वेळेत वेगवेगळ्या भागात वीजपुरवठा बंद ठेवून मॉन्सूनपूर्व कामे सुरू केली आहेत.

वादळी वाऱ्याने व मुसळधार पावसात झाडे किंवा झाडाच्या फांद्या वाहिन्यांवर कोसळून वाहिन्या तुटतात. तसेच विजेच्या तारा, खांब व डीपी पडल्याने महावितरणचे आर्थिक नुकसान होते. परिणामी या भागातील वीजपुरवठा खंडित झाल्याने या भागातील वीज ग्राहकांना अंधारात राहावे लागते. तसेच भूमिगत वाहिन्यांमध्ये पाणी शिरून वीजपुरवठा खंडित होतो. वीज ग्राहकांना अखंडित व सुरळीत २४ तास वीजपुरवठा देण्यासाठी दर शुक्रवारी अथवा इतर दिवशी वीजपुरवठा बंद ठेवून महावितरण देखभाल व दुरुस्तीच्या कामात उच्चदाब व लघुदाब वाहिन्या, रोहित्रांची देखभाल व दुरुस्तीची कामे तसेच डिस्क इन्सुलेटर बदलणे, तारा ओढणे, उपकेंद्र देखभाल, वाकलेले खांब सरळ करणे, गंजलेले, तुटलेले वीज खांब बदलणे, ब्रेकर्सची दुरुस्ती, बॅटरी चार्जिंग, ऑइल फिल्टरेशन, वीज तारांजवळील झाडांच्या फांद्यांची कटाई, फ्यूज बदलणे, भूमिगत केबल टाकणे, खांब आणि तारांचे मजबुतीकरण, वीजतारा बदलणे इत्यादी कामे केली जात आहेत. तसेच उपकेंद्रात पावसाळ्यात पाणी साठल्याने वीज यंत्रणेला धोका निर्माण होतो. त्यासाठी उपकेंद्रात भराव टाकून त्यांची उंची वाढविणे आदी कामे करण्यात येत आहेत.

आठ जिल्ह्यांत कामांना सुरवात

प्रादेशिक कार्यालयाच्या औरंगाबाद, लातूर व नांदेड परिमंडलातील आठ जिल्ह्यांत पावसाळ्यात वीज ग्राहकांना दर्जेदार, अखंडित वीजपुरवठा करण्यासाठी मॉन्सूनपूर्व देखभाल व दुरुस्तीची कामे पूर्ण करण्याच्या सूचना महावितरणचे सहव्यवस्थापकीय संचालक डॉ. मंगेश गोंदावले यांनी दिल्या आहेत. या कामांमुळे काही काळ वीजपुरवठा खंडित होत असल्याने महावितरणे दिलगिरी व्यक्त केली आहे.

Web Title: Aurangabad Pre Monsoon Repair By Mseb For Power Supply During Monsoon

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top