esakal | औरंगाबाद : दर्शनासाठी पहाटेपासूनच रांगा
sakal

बोलून बातमी शोधा

दर्शनासाठी पहाटेपासूनच रांगा

दर्शनासाठी पहाटेपासूनच रांगा

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

औरंगाबाद : शहरात नवरात्रोत्सवाला गुरुवारपासून (ता.७) नवचैतन्याच्या वातावरणात प्रारंभ झाला. आनंददायी वातावरणात घरोघरी घटस्थापना करण्यात आली. शहराचे आराध्य दैवत असलेल्या कर्णपुरा देवी, बीड बायपास परिसरातील रेणुका माता, जळगाव रोडवरील रेणुका माता, गारखेड्यातील कालिंका माता, हर्सूल येथील हरसिद्धी माता मंदिरात पारंपरिक पद्धतीने घटस्थापना करीत महाआरती करण्यात आली. यात पहिल्याच दिवशी सर्वच मंदिरात दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी झाली होती.

पहिल्याच माळेला कर्णपुरासह सर्वच देवींच्या मंदिरात भक्तांची मांदियाळी दिसून आली. कर्णपुरा देवीची सकाळी सनई चौघड्यांच्या निनादात, भक्तिमय वातावरणात आमदार अंबादास दानवे यांच्या हस्ते महाआरती व पारंपरिक पद्धतीने घटस्थापना करण्यात आली. भाविक नवरात्रात दुर्गा देवीच्या वेगवगेळ्या रूपांची नऊ दिवस पूजा करतात. पहिल्या दिवशी महिलांनी पिवळ्या रंगाचे कपडे परिधान केले होते. बाजारपेठेतही बुधवारपासून खरेदीसाठी मोठी गर्दी झाली होती.

हेही वाचा: पावसामुळे शेतीची माती, ऐन दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांची दिवाळे

कर्णपुऱ्यातील कार्यक्रमास नवरात्र उत्सव समितीचे संतोष दानवे, संतोष मरमट, राजू दानवे, राजू राजपूत, अभिजित पगारे, पराग कुंडलवाल, लक्ष्मण बताडे, जगन्नाथ दानवे, पोपट दानवे, सर्जेराव दानवे, अंकुश दानवे, सुरेश दानवे, आकाश दानवे, धर्मराज दानवे, शुभम दानवे, संतोष भाकडे, रोहित दानवे, बाळू दानवे, बंटी दानवे, सुमित दानवे, अजय दानवे, रमेश दानवे, निखिल दानवे, नंदू लबडे, बद्रीनाथ ठोंबरे, वेदांत हरसूलकर, हिरालाल बिरुटे, संजय बारवाल, सुनीता आऊलवार, अरुणा भाटी उपस्थित होते.

द्वार उघडले, चेहरे खुलले

कोरोनामुळे दोन वर्षापासून राज्यातील सर्व मंदिरे बंद होती. त्यामुळे भाविकांच्या आनंदावर विरजण पडल्याने नाराजी होती. मात्र, नवरात्र उत्सवानिमित्त राज्यातील सर्व मंदिरांची दारे गुरुवारी (ता.७) उघडल्याने भाविकांमध्ये विशेषतः महिलावर्गामध्ये आनंदाचे वातावरण आहे.

नवरात्र उत्सवाच्या पहिल्याच दिवशी सरकारने सर्व धार्मिक स्थळांची दारे खुली केल्याने वाळूज महानगर परिसरातील ठिकठिकाणच्या महिलांनी मंदिरात जाऊन देवीचे मनोभावे दर्शन घेत कोरोनाचे संकट टळो, अशी मनोभावे प्रार्थना केली. यात प्रामुख्याने पंढरपूर येथील माँ वैष्णोदेवी मंदिर, विठ्ठल रखुमाई मंदिर, बजाजनगर येथील मोहटादेवी मंदिर, विठ्ठल रखुमाई मंदिर, तुळजामाता मंदिर, रांजणगाव (शेणपुंजी) येथील लक्ष्मी माता मंदिराचा समावेश आहे. भाविकांच्या सोयीसाठी हे मंदिर सकाळी ६ ते रात्री १० वाजेपर्यंत खुले असणार आहे, असे पंढरपूर येथील विठ्ठल रखुमाई मंदिर समीतीचे अध्यक्ष राजेंद्र पवार म्हणाले.

कोरोनाचा प्रसार होऊ नये म्हणून मंदिर समितीच्यावतीने निर्बंध घालून देण्यात आले आहे. पिण्याचे पाणी बंद करण्यात आले असून फक्त हात पाय धुण्यासाठीच पाणी आहे. नारळ फोडण्यास व प्रसाद वाटण्यास बंदी असून सुरक्षित अंतर व मास्क सर्व भाविकांना अत्यावश्यक केले आहे, असे पंढरपूर येथील वैष्णोदेवी मंदिर समितीचे संस्थापक अध्यक्ष ओमप्रकाश गर्ग यांनी सांगितले.

loading image
go to top