
औरंगाबाद : दरोडेखोरांच्या टोळीतील एक जेरबंद
औरंगाबाद - धुळे सोलापूर महामार्गावरील आडगाव जावळे आणि दाभरुळ (ता.पैठण) परिसरात सात ते आठ दरोडेखोरांनी काठ्या चाकू, कोयत्याच्या धाकाने दरोडा टाकून धुमाकूळ घालत विविध ठिकाणी सहाजणांना गंभीर मारहाण केली होती. तसेच त्यांच्याकडील दागिने, रोख व मोबाईल चोरुन नेले होते. ही घटना २२ जूनच्या मध्यरात्री दोन वाजेच्या सुमारास घडली होती. या घटनेमुळे परिसरात दहशतीचे वातावरण पसरले होते. या दरोड्यातील एकाच्या मुसक्या आवळण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश मिळाले आहे. शाहरुख आमऱ्या पवार (रा. टाकळी अंबड, ता. पैठण) असे त्या दरोडेखोराचे नाव असून उर्वरित सहा ते सात दरोडेखोर अद्याप फरार आहेत.
यासंदर्भात पोलिस अधीक्षक मनीष कलवानिया यांनी बुधवारी (ता.२०) ‘सकाळ’ शी बोलताना सांगितले की, रवींद्र भास्करराव कुलकर्णी (३८, रा.हर्सुल) हे कुटूंबातील सहाजणांसह कारने देवदर्शनासाठी तुळगापूर, गाणगापूर येथून परत येत होते. परत येताना रात्री साडेबारा वाजेच्या सुमारास आडगाव जावळे (ता.पैठण) येथील पेट्रोल पंपाजवळील रस्त्यालगत असलेल्या आयआरबीच्या स्वच्छता गृहाजवळ स्ट्रीट लाईटचे उजेडात लघुशंकेसाठी थांबले असताना त्यांच्या व्हॅनजवळ अचानक रोडच्या खालून अनोळखी सात-आठ दरोडेखोरांनी फिर्यादीला कारबाहेर ओढून रस्त्याच्या खाली नेत कोयत्याने वार करत रोकड सातहजारासह मोबाईल हिसकावला.
तसेच रवींद्र यांच्या आईवरही कोयत्याने वार करुन गळ्यातील सोन्याचे एक तोळ्याचे मंगळसूत्र (किंमत अंदाजे २० हजार रुपये) हिसकावून घेतले तसेच वैशाली कुलकर्णी यांना मारहाण करून मोबाईल व सोन्याचे मंगळसूत्र घेतले. कारमधील अनंत कुलकर्णी यांनाही कोयत्याच्या मुठीने मार देऊन ३९०० रुपये काढून घेत पोबारा केला. त्यानंतर त्याच दरोडेखोरांनी आपला मोर्चा दाभरुळ (ता.पैठण) येथील गजानन नाथा जावळे (२७ वर्ष) यांच्याकडे वळवित त्यांना मारहाण केली.
ओरडल्यास कापून टाकू अशी धमकी देत चांदीचे ब्रेसलेट, सोन्याची चैन, रोख दहा हजार, मोबाईल असा एकूण २८ हजार रुपयांचा ऐवज चोरुन नेत गावातील पद्माबाई विनायक गायकवाड यांच्या गळ्यातील सोन्याची पोत चोरट्यांनी चोरुन नेली होती. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने दरोडेखोर पवार याच्या मुसक्या आवळत त्याच्याकडून रोकडसह, मोबाईल असा ७ हजार ३०० रुपयांचा ऐवज जप्त केला आहे. विशेष म्हणजे आणखी दरोडेखोर साथीदार फरार असून ते कितीजण आहेत, यासंदर्भात गुन्हे शाखेचे निरीक्षक रेंगे यांच्याशी संपर्क केला असता होऊ शकला नाही.
Web Title: Aurangabad Robbers Gang One Arrested By Police On Dhule Solapur Route
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..