esakal | Aurangabad | विद्यार्थी आले शाळा, हाचि दिवाळी, दसरा!
sakal

बोलून बातमी शोधा

Aurangabad | विद्यार्थी आले शाळा, हाचि दिवाळी, दसरा!

Aurangabad | विद्यार्थी आले शाळा, हाचि दिवाळी, दसरा!

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

औरंगाबाद : तब्बल दीड ते ते दोन वर्षांनंतर अखेर ‘शाळेचा दिनू’ उजाडला अन् विद्यार्थी, पालक, शिक्षकही हरखून गेले. सकाळी सकाळी शाळा-शाळांतून घंटेचा नाद ऐकू आला. विद्यार्थी येताच लेझीम, तुतारी अन् ढोल ताशांचा एकच आवाज घुमला. फुलांच्या पाकळ्यांची उधळण करत तर कुठे औक्षण करुन मिठाई भरवून विद्यार्थ्यांचे स्वागत झाले. इतक्या वर्षांनंतर शाळा अन् शिक्षकांना याची देही, याची डोळा पाहून विद्यार्थ्यांचा उत्साहही दुणावला होता, तर त्यांच्या किलबिलाटाने शाळांमध्ये दिवाळी असल्यासारखे वातावरण होते.

गप्पागोष्टी अन् ओळख परेड

शहरातील सर्व माध्यमांच्या शाळेतील वर्गावर्गातून ज्ञानाचा आणि विद्यार्थ्यांचा किलबिलाट सोमवारी सकाळी सातपासूनच ऐकायला मिळत होता. गेल्या दीड-दोनवर्षापासून बंद असलेल्या शाळांच्या भिंतीही मुलांच्या सहवासाने बोलक्या झाल्या होत्या. शाळेचा पहिलाच दिवस असल्याने सर्वच शाळांनी मुलांच्या स्वागताची जय्यत तयारी केली होती. शाळेच्या गेटपासून फुलांची रांगोळी, बॅंडपथक, तुतारी, लेझीम आणि ढोलताशांचा आवाज करत प्रवेशोत्सव साजरा झाला. विद्यार्थ्यांवर फुलांच्या पाकळ्यांची उधळण, औक्षण करुन वर्गात ‘वेलकम’ करण्यात आले. शिक्षक, मुख्याध्यापकांनी प्रत्येक विद्यार्थ्याला मिठाईचे वाटप केले. तब्बल दोनवर्षानंतर वर्गमित्रांना पाहून विद्यार्थ्यांच्या आनंदालाही पारावार उरला नाही. पहिलाच दिवस असल्यामुळे वर्गात केवळ गप्पा, गोष्टी, नवीन विद्यार्थ्यांची ओळख परेड, कोरोनाविषयी मार्गदर्शन अशाच तासिका घेण्यात आल्याचे जिजामाता शाळेच्या मुख्याध्यापिका परीमला बिदरकर यांनी सांगीतले.

विद्यार्थी, शिक्षक म्हणतात...

सहावीला असताना कोरोनामुळे लॉकडाऊन लागले होते. आता आठवीला आल्यानंतरच मी शाळा पाहिली. गेली दोन वर्ष मी घरीच होते. या काळात घरी राहून ऑनलाईन तासिकेबरोबच आईला घरकामात मदत करता-करता संपूर्ण स्वयंपाक करायचे शिकले.

-रेणुका कुलकर्णी, विद्यार्थिनी, जिजामाता शाळा

शाळा सुरु झाल्यामुळे खूप आनंद झाला. मित्रमैत्रिणी, शिक्षक खूप वर्षानंतर भेटले, त्यांना भेटल्याने खूप आनंद झाला. आता अशीच शाळा सुरु राहावी, पुन्हा शाळेला ब्रेक नको. नाहीतर खूप नुकसान होईल.

-सिद्धी कुलकर्णी, विद्यार्थिनी, संत मीरा स्कूल

शाळा सुरु करण्याबाबतचा निर्णय झाल्यापासून आम्ही शाळेत विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीकोनातून सर्व तयारी केली. दोनवर्षानंतर विद्यार्थ्यांना शाळेत येताना पाहून खूप आनंद झाला. विद्यार्थ्यांचा उत्साह पाहून शाळेत दिवाळीसारखे वातावरण होतं. लवकरच शासनाने प्राथमिकचे वर्ग देखील सुरु करावेत.

-अनिल पाटील, पर्यवेक्षक, संत मीरा विद्यालय

३६७

शहरातील शाळा सुरु

३३,११३

विद्यार्थी उपस्थिती

loading image
go to top