Aurangabad : सत्तार, ठाकरे संघर्षात भाजपच्या भूमिकेकडे लक्ष | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

shivsena-bjp

Aurangabad : सत्तार, ठाकरे संघर्षात भाजपच्या भूमिकेकडे लक्ष

सिल्लोड : राज्यातील शिवसेनेत झालेली दुफळी बघता कृषिमंत्री अब्दुल सत्तार व ठाकरे यांच्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर सिल्लोड शहरामध्ये सोमवारी (ता.७) आदित्य ठाकरे व खा. श्रीकांत शिंदे यांच्या सभांचा आखाडा रंगणार आहे. यांच्या संघर्षात सिल्लोड तालुक्यामध्ये स्थानिक भाजपची भूमिका महत्त्वाची ठरणार असून, येत्या काळात तालुक्यातील अस्तित्व टिकविण्यासाठी भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांना चांगलाच संघर्ष करावा लागणार आहे. अन्यथा भाजपचा तालुक्यातील असलेला जनाधार शिवसेनेच्या दोन गटात विभागला जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.

शिवसेना शिंदे गट व उद्धव ठाकरे गटातील वादात सिल्लोड मतदार संघातील भाजपचे कार्यकर्ते मात्र, कात्रीत सापडले आहेत. अब्दुल सत्तार सरकारमध्ये भाजपसोबत असले तरीही सिल्लोड विधानसभा मतदारसंघात भाजप कार्यकर्ते त्यांच्या विरोधात आहेत. दुसऱ्या बाजूला उद्धव ठाकरे भाजपाच्या विरोधात आहेत. परंतु सिल्लोड मतदारसंघात भाजपचा त्यांना विरोध नसला तरी सोबत जाता येत नाही ही अडचण आहे. इकडे आड तिकडे विहीर अशा परिस्थितीमध्ये भाजप कार्यकर्ते अडकले असल्याचे चित्र आहे. ठाकरे-सत्तार संघर्षामध्ये ते ठाकरेंच्या बाजूला जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे राज्याचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी शिवसेनेच्या स्थानिक कार्यकर्त्यांना भाजपाच्या बाबतीत तालुक्यात सबुरीने घेण्याचा सल्ला दिल्याची माहिती आहे. परंतु अब्दुल सत्तारांनी उद्धव ठाकरे यांचे सोबत असताना स्थानिक भाजपवर ओढलेले आसूड भाजप कार्यकर्त्यांच्या जिव्हारी लागलेले आहेत. त्यामुळे आगामी काळात भाजप कार्यकर्तेकाय भूमिका घेतात याकडे तालुक्याचे लक्ष लागले आहे.

पंधरा वर्षांपासून या मतदारसंघात विधानसभेला भाजप उमेदवाराचा पराभव होत असला तरी कार्यकर्ते पक्षासोबतच आहेत. त्यामुळे कमीअधिक प्रमाणात ऐंशी हजार ते एक लाख दरम्यान मतदान भाजपकडे असल्याचे मागच्या तीन विधानसभा निवडणुकांच्या निकालातून स्पष्ट झाले आहे. त्यामुळे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाचा हे मतदान आपल्या बाजूला वळविण्याचा प्रयत्न सुरू आहे. यातही भाजपचा जनाधार जाणार असल्याने भाजपचेच नुकसान होणार आहे. भाजपचे काही महत्वाकांक्षी कार्यकर्ते विधानसभा निवडणूक डोळ्यांसमोर ठेवून शिवसेना ठाकरे गटाच्या संपर्कात असल्याची खात्रीलायक माहिती आहे. त्यामुळे आदित्य ठाकरे व श्रीकांत शिंदे यांच्या सभेसाठी भाजप कार्यकर्ते ठाकरेंना मदत करतात की अलिप्त राहतात यावर तालुक्याच्या राजकारणाची पुढची दिशा ठरणार आहे.

तर बसू शकतो फटका

शिवसेना शिंदे व ठाकरे पक्षाच्या सत्तासंघर्षाचा फटका भाजपला जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीत बसू शकतो. आज उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला बळ दिल्यास ते जिल्हा परिषद निवडणुकीत आपले उमेदवार उभे करून याचा फायदा घेतील. दुसऱ्या बाजूला स्थानिक पातळीवर भाजपसोबत जाणार नसल्याचे सत्तार यांनी जाहीर केल्याने भाजपचे उमेदवार निवडून आणण्यासाठी आपली ताकद सांभाळणे भाजपला गरजेचे आहे.

आमचा राष्ट्रीय पक्ष आहे. आमचे कार्यकर्ते कुठल्याही सभेस जाणार नाही. आमची तालुक्यात वेगळी ताकद आहे. आजही विधानसभेमध्ये भाजपच्या पाठीशी एक लाख मतदार आहेत.

- इद्रिस मुलतानी, प्रदेश चिटणीस भाजप.

केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे, डॉ.भागवत कराड व सहकारमंत्री अतुल सावे कार्यकर्त्यांच्या पाठीशी आहेत. अब्दुल सत्तार युतीच्या सरकारमध्ये कृषीमंत्री आहेत. त्यामुळे मंत्री आणि मतदार संघातील राजकारण हे दोन वेगवेगळे विषय आहेत. शेतकऱ्यांच्या हितासाठी सरकार दरबारी जाणे, संघर्ष करणे हे संघटनेचे कामच आहे.

- मकरंद कोर्डे,भाजप किसान मोर्चा, प्रदेश सरचिटणीस.