
औरंगाबाद : राज्यात शिंदे - फडणवीस सरकारला शंभर दिवस पुर्ण झाले आहे. मात्र आतापर्यंत या सरकारने जनतेसाठी कोणतेही ठोस काम केले नाही. केवळ उथळ आणि तात्कालिक मुद्द्यांवर हे सरकार बोलत आहे. सरकार जनतेच्या कोणत्याच प्रश्नावर गंभीर नसल्याची टिका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपलनेत्या सुषमा अंधारे यांनी केली.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्यावतीने राज्यात महाप्रबोधन यात्रा काढण्यात आली आहे. या यात्रेनिमित्त सुषमा अंधारे शुक्रवार (ता.१८) पासून औरंगाबाद जिल्ह्यात आहेत. या दौऱ्यात रविवारी (ता.२०) पत्रकार परिषदेत त्यांनी शिंदे गट आणि भाजपवर जोरदार हल्ला चढविला. पत्रकार परिषदेला पक्षाचे विधान परिषदेतील विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे, जिल्हाप्रमुख किशनचंद तनवाणी, पूर्व विभागाचे शहरप्रमुख विश्वनाथ स्वामी, पश्चिम विभागाचे विजय वाघचौरे, ज्ञानेश्वर डांगे आदी उपस्थित होते.
सुषमा अंधारे म्हणाल्या, राज्यातील शिंदे फडणवीस सरकारला शंभर दिवस पूर्ण झाले आहेत. परंतु आतापर्यंत या सरकारने जनतेसाठी कोणतेही ठोस काम केलेले नाही. उथळ आणि तात्कालिक मुद्यांवर हे सरकार बोलत आहे. राज्यात बेरोजगार, महिला सुरक्षा, शेतकरी आत्महत्या यासारखे अनेक प्रश्न आहेत. पण कोणत्याच विषयावर हे सरकार गंभीर नाही. मुख्यमंत्री शिंदे हे नावापुरतेच मुख्यमंत्री आहेत. कारण वित्त, गृह यासह सर्व महत्वाची खाती फडणवीस आणि भाजपकडे आहेत.
महाप्रबोधन यात्रेतून आम्ही काही प्रश्न विचारत आहोत. या यात्रेत विचारलेले प्रश्न सत्ताधाऱ्यांच्या वर्मी लागत आहेत त्यामुळे या यात्रेचा धसका घेवून महाप्रबोधन यात्रेदरम्यान होणाऱ्या सभांना आडकाठी आणली जात आहे. जनतेचे प्रश्न मुख्य पटलावर आणणे हा या यात्रेचा उद्देश आहे मात्र त्याचीही योग्य उत्तरे मिळत नाही, असेही अंधारे यांनी सांगितले. पोझीशन आणि पॉवर या दोन वेगळ्या बाबी असून एकनाथ शिंदे नावालाच मुख्यमंत्री आहेत. त्यांच्याकडे पोझीशन आहे, मात्र पॉवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आहे. सगळी मलिद्याची खाती भाजपकडे आहे, माझे सर्व ४० भाऊ उपाशी आहेत, त्यांना केवळ त्यांची सत्ता आल्याचा भ्रम झाला असल्याचा टोलाही अंधारे यांनी लगावला.
या अनुषंगाने हीच मलिद्याची खाती महाविकास आघाडीत राष्ट्रवादी कॉंग्रेसकडे होती या प्रश्नावर अंधारे म्हणाल्या, शिवसेनेपासून वेगळे होण्याची वेगवेगळी कारणे शिंदे गटातील आमदार देत आहेत. त्यात हिंदूत्वासाठी, चांगले खाते आणि निधी मिळत नाही, शिवसेना वाचविण्यासाठी व महाराष्ट्राची अस्मिता जपण्यासाठी आम्ही वेगळे झालो अशी कारणे देत होते मात्र ही सारी कारणे तकलादू आहेत. खुर्ची उबवणे, सत्ताकांक्षा हीच महत्वाची कारणे आहेत. परंतू आता बॉम्बे टू गोवा टूर करून भाजपसोबत जाऊन यांना काय मिळाले तर काहीच नाही. मग कशासाठी केला होता हा अट्टाहास असा त्यांना सवाल केला.
हे तर वेड्याचे सोंग घेणारे नेते : दानवे
विरोधी पक्षनेते अंबादास दानवे शेतकरी संकटात असताना त्यांना सततच्या पावसाने आणि अतिवृष्टीने सप्टेंबरमध्ये झालेल्या नुकसानीची अद्याप शासनाकडून कसलीही मदत दिली गेली नाही. पीकविम्याची रक्कम दिली गेली नसल्याचे सांगून म्हणाले, शेतकरी ओला दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी करत असताना कृषीमंत्री मात्र त्याची गरज नसल्याचे बेजबाबदार वक्तव्य करत असल्याची टिका केली. तसेच शरद सहकारी साखर कारखान्यात मनिलॉन्ड्रिंग होत असल्याचा रोजगार हमी योजानामंत्री संदीपान भुमरे यांच्यावर आरोप केला. याबाबत माझ्याकडे पुरावे आहेत हे जर खोटे असेल तर श्री. भुमरे यांनी थेट चर्चा करावी असे श्री. दानवे यांनी आव्हान दिले. श्री. भुमरे म्हणतात मनिलॉन्ड्रिंग काय असते माहित नाही असे म्हणत असल्याचे निदर्शनास आणून दिल्यावर श्री. दानवे यांनी भुमरे यांना सर्व माहित आहे मात्र ते वेड्याचे सोंग घेणारे नेते असल्याचा टोला लगावला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.