Aurangabad : हवन करून तुमची सत्ताच उलथवून टाकतो ; चंद्रकांत खैरे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Chandrakant Khaire

Aurangabad : हवन करून तुमची सत्ताच उलथवून टाकतो ; चंद्रकांत खैरे

औरंगाबाद : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सरकारमधील शिवसेनेचे आमदार व मंत्री पुन्हा कामाख्या देवीच्या दर्शनाला जाणार आहेत. या पार्श्वभूमीवर शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी ‘दक्षिणमुखी मारोतीसमोर आता असे हवन करतो की, तुमचे सरकार उलटे पालटे होईल’, असा इशारा शिंदे सरकारला दिला आहे.

राज्यात बंड पुकारून महाविकास आघाडी सरकार पाडल्यानंतर तत्कालीन मंत्री एकनाथ शिंदे हे आपल्या चाळीस समर्थक आमदारांसोबत गुवाहटीच्या कामाख्या देवीच्या दर्शनाला गेले होते. सरकार येऊ दे पुन्हा सगळ्यांना घेऊन दर्शनाला येईन असा नवस तेव्हा त्यांनी बोलला होता. त्यानंतर राज्यात सत्तांतर झाले व शिंदे मुख्यमंत्री झाले.

त्यामुळे चार महिन्यांनंतर श्री. शिंदे कामाख्या देवीच्या दर्शनाला जाणार आहेत. यासंदर्भात चंद्रकांत खैरे यांनी वक्तव्य केले होते. त्यावर उद्योगमंत्री उदय सामंत यांनी आमच्यासोबत कामाख्या देवीच्या दर्शनाला चला, अशी ऑफर खैरेंना दिली होती. त्यानंतर खैरेंनी सामंत यांच्यासह शिंदे सरकारला सुप्रीम कोर्टाच्या सुनावणीनंतर काय होते ते पहा? मी देखील कामाख्या देवीला जाऊन पूजा घालणार आहे, मग पहा तुमचे सरकार कसे पडते, असा इशारा दिला आहे.

श्री. खैरे म्हणाले, की उदय सामंत यांनी मला ऑफर दिली, पण मला त्याची गरज नाही, तुम्ही आता कामाख्या देवीच्या दर्शनाला जात आहात, मी २२ वर्षांपासून जातो. गद्दारीनंतर तुम्ही सत्ता आणि स्वार्थासाठी तिथे गेला होतात. त्यानंतर मी जाऊन आलो आणि उद्धव साहेब आणि शिवसेनेसाठी प्रार्थना, पूजा केली आणि तुमचे सरकार अडचणीत आले. आता तुम्ही जा ऊन आल्यानंतर मी पुन्हा तिथे जाईन आणि अशी पूजा करेल की तुमचे सरकार उलटे होऊन जाईल. सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे, त्यानंतर बघा काय होते ते? मी दक्षिणमुखी मारोतीसमोर हवन करणार आहे, त्यानंतर तुमचे सरकार राहते का? तेही पहा, असेही खैरे म्हणाले.

पूजाअर्चा खोक्यासाठी नाही

मी धार्मिक वृत्तीचा माणूस आहे, पूजाअर्चा, होमहवन एका श्रद्धेने करत असतो. खोके किंवा स्वार्थासाठी करत नाही, असा टोला देखील त्यांनी शिंदे सरकार व उद्योगमंत्री उदय सामंत यांना लगावला. मी मरेपर्यंत शिवसेनेत आणि उद्धव ठाकरे यांच्यासोबत राहणार असल्याचेही खैरे यांनी ठणकावून सांगितले.